Posted On:
22 OCT 2026 11:49AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान दक्षता आणि कुशलता संपन्न हितग्राही म्हणजेच पीएम-दक्ष या केंद्रीय क्षेत्रातील योजनेची सुरुवात वर्ष 2020-21 दरम्यान करण्यात आली. कचरा वेचणाऱ्यांसह अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विमुक्त जमाती (डीएनटीज) या घटकांतील व्यक्तींच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार तसेच वेतन-रोजगारसंबंधी प्रोत्साहन देण्यासाठी सूचीबद्ध प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पुरवण्याच्या उद्देशाने ही योजना अमलात आणली गेली.
केंद्रीय सामाजिक न्याय तसेच सक्षमीकरण विभागाच्या(डीओएसजेई) अखत्यारीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (एनएसएफडीसी), राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ (एनबीसीएफडीसी) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) या तीन महामंडळांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
डीओएसजेई या महामंडळांसाठी निधी जारी करते आणि ही महामंडळे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (एमएसडीई) पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत (पीएमकेव्हीके)सूचीबद्ध असलेल्या संस्थांना योजनेची मार्गदर्शक तत्वे तसेच कार्यादेशाला अनुसरून प्रशिक्षणाचा खर्च भरुन देतात. संबंधित व्यक्तींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या संस्थांनी त्यांच्यापैकी किमान 70% प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार पुरवणे (वेतन आणि/किंवा स्वयंरोजगार) अनिवार्य असते. ही अट पूर्ण न करणाऱ्या संस्थांच्या प्रशिक्षण खर्चाचा तिसरा हप्ता म्हणजेच प्रशिक्षण खर्चाच्या 30%रक्कम जप्त करण्यात येते. तसेच, सहभागी प्रशिक्षण संस्थांनी प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित उद्योगांशी सहकार्य राखणे बंधनकारक असते. उपरोल्लेखित तिन्ही महामंडळे लक्ष्यित गटातील पात्र तरुणांना त्यांचे प्रकल्प उभारण्यात सहयोग देण्यासाठी कर्ज सुविधा तसेच इतर मदत देतात.
वर्ष 2020-21 ते 2023-2024 या कालावधीत पीएम-दक्ष योजनेसाठी देण्यात आलेल्या एकूण 276.47 कोटी निधीपैकी आतापर्यंत 309.5 कोटी रुपयांचा प्रत्यक्ष व्यय झालेला आहे.
वर्ष 2020-21 ते 2023-2024 या या काळात अनुक्रमे 1,87,305 आणि 96,162 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच त्यांना रोजगार देखील देण्यात आला.
पीएम-दक्ष योजनेचा मूल्यांकन अभ्यास या योजनेची सशक्त सुसंगतता तसेच अध्ययन परिणामकारकता दर्शवत असून या योजनेच्या 90% लाभार्थ्यांनी सदर प्रशिक्षणाचे कारकिर्दीची उद्दिष्टे, स्थानिक कामगार बाजाराच्या गरजा तसेच अपेक्षित अध्ययन परिणाम साध्य होण्याशी संरेखन नमूद केले आहे. परिणामांचे निष्कर्ष असे दाखवून देतात की या योजनेमुळे लाभार्थ्यांना, विशेषतः महिला आणि उपेक्षित गटांतील व्यक्तींना वाढीव आत्मविश्वास, आत्मसन्मान तसेच सामाजिक मान्यता यांसारखे अमूर्त लाभ मिळाले आहेत. शाश्वतता निष्कर्ष देखील मोठ्या प्रमाणात सकारात्मक असून बहुतांश लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाद्वारे मिळवलेल्या कौशल्यांचा वापर सुरु ठेवला आहे आणि त्याद्वारे त्यांच्यामध्ये उत्पन्नात दीर्घकालीन वाढ, विकासात पुनर्गुंतवणूक आणि स्वतंत्रपणे सुधारणा करत राहण्यासाठी सक्षम असल्याची भावना वाढीला लागली आहे.
पीएदक्ष योजना पीएमकेव्हीके मधील अतिरिक्त योजना असल्यामुळे आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठीची सर्व कार्यभूमिका पीएमकेव्हीकेच्याच अंतर्गत येणाऱ्या स्किल इंडिया डिजिटल हब (एसआयडीएच) पोर्टलवरुन घेण्यात येत असल्यामुळे, वर्ष 2024-25 पासून, पीएम-दक्ष योजना एमएसडीईच्या पीएमकेव्हीके योजनेत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणूनच, कोणत्याही प्रकारची द्विरुक्ती टाळण्यासाठी पीएम-दक्ष योजनेला पीएमकेव्हीके अंतर्गत सामावून घेण्यात आले.
* * *
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai