Posted On:
21 OCT 2026 6:13PM by PIB Mumbai
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी –एनएफएआय) द्वारे 22 ते 25 ऑक्टोबर 2026 दरम्यान, पुणे येथील लॉ कॉलेज रोडवरील त्यांच्या सभागृहात 'घटक: अ रेट्रोस्पेक्टिव्ह' (GHATAK: A RETROSPECTIVE) या चार दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे 4K -पुनर्संचयित केलेले चित्रपट, दुर्मिळ 35 एमएम प्रिंट्स, माहितीपट, शैक्षणिक लघुपट आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कलाकृतींचे डिजिटाइज्ड अंश प्रदर्शित केले जाणार आहेत. चित्रपट अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिक प्रेक्षकांसाठी हा महोत्सव ऋत्विक घटक यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाचा सखोल आढावा घेण्याची एक उत्तम संधी आहे; ज्यामध्ये त्यांच्या दिग्दर्शन कार्याबरोबरच , त्यांनी केलेल्या इतर कमी चर्चित विविध सर्जनशील कामांचाही समावेश असेल.
या महोत्सवाची सुरुवात 22 ऑक्टोबर रोजी 'छिन्नमूल' (1950) या चित्रपटाने होईल. नेमाई घोष दिग्दर्शित या चित्रपटात घटक यांनी अभिनेता म्हणून काम केले होते. फाळणीनंतर ग्रामीण समुदायांचे झालेले विस्थापन या चित्रपटात मांडले आहे. तसेच घटक हे प्रमुख दिग्दर्शक म्हणून ओळखले जाण्यापूर्वीच्या त्यांच्या सुरुवातीच्या सिने-प्रवासातील एका महत्त्वाच्या टप्प्याची झलक यात पहायला मिळते.
या कार्यक्रमात घटक यांच्या प्रशंसित चित्रपटांच्या 4K रिस्टोअर प्रिंट दाखवल्या जाणार आहेत. यामध्ये 'नागरिक' (1952 ), 'अजांत्रिक' (1958), 'बारी थेके पालिये' (1959), 'मेघे ढाका तारा' (1960 ), 'कोमल गांधार' (1961 ), 'सुबर्णरेखा' (1962 ), 'तिताश एकटी नदीर नाम' (1973 ) आणि 'जुक्ती तक्को आर गप्पो' (1974) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'मुसाफिर' (1957) चित्रपटाचाही समावेश आहे ज्याच्या पटकथेत घटक यांनी योगदान दिले होते . बिमल रॉय दिग्दर्शित 'मधुमती' (1958 ) चा देखील समावेश आहे ज्याच्या कथा व पटकथेत त्यांनी योगदान दिले होते. हे हिंदी चित्रपट त्यांच्या सर्जनशील योगदानाची व्याप्ती दर्शवतात आणि त्यांच्या कलाकृतींना भारतीय सिनेमाच्या व्यापक पटलावर स्थान मिळवून देतात.
या पूर्वावलोकनात बिहार के दर्शनीय स्थान (1955), फिअर (1965), राँदेवू (1965), नागरिक संरक्षण अर्थात सिव्हिल डिफेन्स (1965), माय लेनिन (1970), सायंटिस्ट्स ऑफ टुमारो (1967), पुरुलियार छाऊ (1970), आदिवासियों का जीवन, ये क्यों (1970) आणि दरबार गति पद्मा (1971) यांसारख्या माहितीपटांचा आणि लघुपटांचाही समावेश आहे. या कलाकृतींमधून घटक यांचा माहितीपट निर्मितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सांस्कृतिक प्रथा, सार्वजनिक जीवन आणि कलात्मक अभिव्यक्ती यांच्याशी असलेले नाते समजून घेता येते. त्यांचे चित्रपटविषयक कार्य केवळ पूर्ण लांबीच्या कथापटांपुरते मर्यादित नव्हते, हेही या कलाकृतींमधून स्पष्ट होते.
या कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या अपूर्ण कलाकृतींना विशेष अभिलेखीय महत्त्व आहे. यामध्ये राँगेर गोलाम, बांगलार बांगदर्शन, कतो अजानारे (1959) आणि प्रख्यात शिल्पकार रामकिंकर बैज यांच्यावरचा घटक यांचा अपूर्ण चरित्रपट यांचा समावेश आहे. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत या अपूर्ण आणि प्रत्यक्षात साकार न झालेल्या कलाकृतींचे उपलब्ध तुकडे पुनर्संचयित करून त्यांचे 2K आणि 4K डिजिटल रूपांतर करण्यात आले आहे. या तुकड्यांचे सार्वजनिक प्रदर्शन प्रेक्षकांना पूर्ण चित्रपटांच्या स्वरूपात अस्तित्वात नसलेली दुर्मीळ चित्रपटसामग्री पाहण्याची संधी देईल. पूर्ण झालेल्या चित्रपटांबरोबरच अपूर्ण आणि फारशा परिचित नसलेल्या कलाकृतींचेही जतन करणे किती महत्त्वाचे आहे, हे या तुकड्यांमधून अधोरेखित होते. अशा कलाकृतींमुळे चित्रपट दिग्दर्शकाच्या सर्जनशील प्रवासाचे अधिक व्यापक आकलन होण्यास मदत होते.
या चित्रपटांचे पुनर्संचयन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत करण्यात आले आहे. देशाच्या दृकश्राव्य वारशाचे जतन करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. अनेक दशकांपासून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांनी जतन केलेल्या मूळ चित्रपट सामग्रीच्या आधारे ही काळजीपूर्वक 4K पुनर्संचयन प्रक्रिया पार पडली. यासाठी पश्चिम बंगाल राज्य चित्रपट अभिलेखागारातल्या मौल्यवान सामग्रीचाही वापर करण्यात आला. चित्रपटांची दृश्यात्मक अस्सलता आणि घटक यांच्या मूळ चित्रपटविषयक दृष्टिकोनाशी सुसंगतता कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट छायाचित्रणकार अविक मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली रंगसुधारणा प्रक्रिया करण्यात आली. त्यांनी या पुनर्संचयन उपक्रमाची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी nfaifilmcircle@nfdcindia.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या समाजमाध्यमांवरच्या अधिकृत मंचाना भेट द्यावी.
***
Nilima Chitale / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai