पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतील विजयादशमी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी


विजयादशमी हा सण अन्यायावर न्यायाच्या विजयाचे प्रतीक असून तो आपल्याला सत्य आणि धर्माच्या अफाट सामर्थ्याचे स्मरण करून देतो: पंतप्रधान

आपल्यासाठी हा केवळ एक सण नसून भारतातील जीवनाची ऊर्जा आहे: पंतप्रधान

प्रभू श्रीरामांनी आपल्याला मानवतेच्या इतिहासात कशाशीही तुलना केली जाऊ शकत नाही अशा आदर्श मूल्यांचा वारसा दिला आहे : पंतप्रधान

आपल्याला गरीब आणि वंचितांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेवावे लागेल : पंतप्रधान

जर आपण सत्य आणि मानवतेच्या बाजूने उभे राहिलो, तर अखेरीस विजय आपलाच होतो: पंतप्रधान

रामाकडून राष्ट्राकडे (राम से राष्ट्र) आणि देवाकडून देशाकडे (देव से देश) हा आपण केलेला संकल्प नक्कीच पूर्ण करू : पंतप्रधान

Posted On: 20 OCT 2026 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

दिल्लीत आयोजित विजयादशमी महोत्सवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्याला त्यांनी संबोधितही केले. आपल्या संबोधनाच्या प्रारंभीच त्यांनी, माझ्याकडून संपूर्ण देशवासीयांना विजयादशमीच्या अंतःकरणापासून शुभेच्छा, अशा शब्दांत या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.  

देशभरातील प्रत्येक गाव आणि शहर सध्या रामलीलांच्या सादरीकरणांनी भारून गेले असल्याचे ते म्हणाले. हीच प्रभू श्रीरामाचे आदर्श जिवंत ठेवण्याची, अन्याय आणि दहशतीचा अंत करण्याची तसेच असत्यावर सत्याच्या विजय साकारण्याची आपली परंपरा असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशभरातील सर्व नागरिक अधर्मावर धर्माच्या विजयाचा उत्सव साजरा करत आहेत, अशावेळी सर्वांनी आपल्यासोबत या विजयोत्सवाचा जयघोष करावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आपल्यासाठी हा केवळ एक सण नाही, तर ही भारतातील जीवनाची ऊर्जा आहे असे पंतप्रधान म्हणाले.

प्रभू श्रीरामाप्रति आपल्या संस्कृतीसह पूर्वजांमध्ये हजारो वर्षांपासून असलेल्या श्रद्धेचा संदर्भही त्यांनी मांडला. ही अढळ श्रद्धा प्रभू रामांनी रावणासारख्या राक्षसावर मिळवलेल्या विजयापलिकडची आहे असे ते म्हणाले. देशाची ही अढळ श्रद्धा प्रभू श्रीरामांनी जगाला दिलेल्या कालातीत मूल्यांवर आधारित आहे असे त्यांनी सांगितले. प्रभू श्रीरामांनी आपल्याला मानवतेच्या इतिहासात कशाशीही तुलना केली जाऊ शकत नाही अशा आदर्श मूल्यांचा वारसा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभू श्रीराम यांनी सत्य आणि नैतिकतेचा मार्ग कधीही न सोडता अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला, याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृत श्लोकाचा उल्लेख केला. राज्याभिषेक आणि वनवास या दोन्ही प्रसंगी प्रभू श्रीराम यांनी दाखविलेली स्थितप्रज्ञता या श्लोकातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक संकटात प्रभू श्रीरामांनी धर्माचे पालन केले, निषादराज यांना आलिंगन दिले आणि वनवासाच्या काळात माता शबरी यांचा सन्मान केला, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “प्रभू श्रीराम यांनी दया, करुणा, प्रेम आणि सौहार्द यांचे आदर्श मानदंड प्रस्थापित केले,” असे पंतप्रधान म्हणाले.

प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा म्हणून परतल्यानंतर त्यांनी रामराज्याची स्थापना केली, याचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी रामराज्याचे वर्णन भेदभावविरहित शासनव्यवस्थेचा सर्वोच्च आदर्श असे केले. या व्यवस्थेत प्रत्येकाला न्याय आणि समान संधी मिळते, तसेच सत्तेचा उपयोग अधिकार गाजविण्यासाठी नव्हे, तर जनकल्याणासाठी केला जातो. गोस्वामी तुलसीदास यांच्या “दैहिक दैविक भौतिक तापा, राम राज नहिं काहुहि ब्यापा” या चौपाईतून रामराज्याचे हे आदर्श अजरामर झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या आदर्शांचे पालन करताना प्रशासनाने ‘नागरिक देवो भव’ या मंत्रानुसार जनतेला ईश्वरस्वरूप मानून सेवा करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “गरीब आणि वंचितांच्या सेवेचे स्थान आपण सर्वोच्च ठेवले पाहिजे,” असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

प्रभू श्रीराम यांनी समुद्र पार करून लंकेपर्यंत केलेल्या प्रवासातून आत्मनिर्भरतेचे महत्त्वपूर्ण धडे मिळतात, असे पंतप्रधान म्हणाले. संकटाच्या काळात इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी प्रभू श्रीराम यांनी जनसहभागाला चालना दिली आणि उपलब्ध संसाधने एकत्रित केली. श्रद्धा, सामर्थ्य आणि अढळ निर्धार यांच्या बळावर अशक्य वाटणारे कार्यही शक्य करून दाखविले, असे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, हा प्रभू श्रीराम यांनी दिलेला मूलमंत्र नागरिकांनी अंगीकारावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “मार्गातील अडचणी आपला प्रवास थांबवू शकत नाहीत, हे प्रभू श्रीराम यांनी आपल्याला शिकवले,” असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय प्रगतीला सांस्कृतिक वारशावर आधारित आत्मसन्मानाशी जोडत, पंतप्रधानांनी भारताची ओळख जपण्यासाठी सरकारच्या सक्रिय मोहिमेचा उल्लेख केला. या मोहिमेअंतर्गत गेल्या 12 वर्षांत 650 हून अधिक प्राचीन मूर्ती मायदेशी परत आणण्यात आल्या आहेत. त्यांनी भारताच्या सांस्कृतिक केंद्रांना जागतिक स्तरावर मिळत असलेल्या वाढत्या मान्यतेचाही गौरव केला; ज्यामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अनेक भारतीय स्थळांचा समावेश होणे आणि गेल्या वर्षी कोट्यवधी भारतीयांच्या सामूहिक इच्छाशक्तीमुळे दीपावलीचा युनेस्कोच्या मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश होणे, यांचा समावेश आहे. भविष्यातही आपल्याला याच निष्ठेने काम करत राहायचे आहे, असे मोदी म्हणाले.

विजयादशमीच्या त्या धैर्याचे स्मरण करून, जी सत्याच्या आणि मानवतेच्या बाजूने उभे राहिल्यास विजयाची खात्री देते, पंतप्रधानांनी समानो मंत्र: समिती: समानी हा वैदिक मंत्र उद्धृत केला. त्यांनी सर्व राष्ट्रीय संस्थांना आणि राजकीय पक्षांना राष्ट्रीय हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी नागरिकांना राष्ट्र प्रथम  ही शपथ घेण्याचे आवाहन केले, जेणेकरून माँ भारतीच्या शत्रूंना - विशेषतः अशा शक्तींना ज्या राष्ट्रीय सन्मानाला हानी पोहोचवतात, समाजात फूट पाडतात किंवा भारतीय संस्कृतीबद्दल द्वेष बाळगतात - त्यांना ओळखून त्यांचा पराभव करता येईल. जेव्हा आपण सत्य आणि मानवतेच्या बाजूने उभे राहतो, तेव्हा शेवटी विजय आपलाच होतो, असे पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान घेतलेल्या पवित्र संकल्पांची आठवण करून दिली आणि जय सिया राम व भारत माता की जयच्या जयघोषासह दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी राष्ट्राच्या आध्यात्मिक आणि विकासात्मक ध्येयांच्या पूर्ततेबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला. आपण पाहिलेले राम से राष्ट्र आणि देव से देश हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू, असे मोदींनी ठामपणे सांगितले.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325644) अभ्यागत कक्ष : 9