सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकातील म्हैसूर येथे 9 दिवसीय शिल्प समागम मेळा 2026 संपन्न


12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील कारागिरांच्या पारंपरिक हस्तकला आणि हातमाग उत्पादनांचे प्रदर्शन; हजारो नागरिकांची भेट

Posted On: 20 OCT 2026 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

कर्नाटकातील म्हैसूर येथील दसरा प्रदर्शन मैदानावर आयोजित नऊ दिवसीय शिल्प समागम मेळा 2026 यशस्वीपणे संपन्न झाला. या मेळ्याचे आयोजन भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे करण्यात आले होते.

या मेळ्याचा उद्देश अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग आणि सफाई कर्मचारी प्रवर्गातील लाभार्थ्यांनी तयार केलेल्या पारंपरिक हस्तकला व हातमाग उत्पादनांसाठी एक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा होता. यामध्ये मंत्रालयांतर्गत कार्यरत तीन राष्ट्रीय महामंडळांद्वारे—नॅशनल शेड्युल्ड कास्ट्स फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, (एनएसएफडीसी), नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनबीसीएफडीसी) आणि नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसकेएडीसी)— पुरस्कृत कारागिरांचा समावेश होता.

नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन  चे उपमहाव्यवस्थापक  रजनीश बँकर यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश कारागिरांसाठी बाजारपेठेतील संपर्क अधिक बळकट करणे, पारंपरिक कौशल्य कलेला प्रोत्साहन देणे आणि संबंधित गटांसाठी उपजीविकेच्या शाश्वत संधी निर्माण करणे हा होता. ते म्हणाले की,  मंत्रालय 2022 पासून शिल्प समागम मेळा आयोजित करत आहे. आतापर्यंत आयोजित केलेल्या अशा 13 मेळ्यांच्या माध्यमातून 975 कारागिरांना लाभ मिळाला आहे. म्हैसूर येथे आयोजित हा मेळा आर्थिक वर्ष 2026-27 मधील पहिला शिल्प समागम मेळा होता. त्यांनी सांगितले की, या मेळ्यात एकूण 83 स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यापैकी 80 स्टॉल्स कारागिरांना देण्यात आले होते; यामध्ये 37 महिला कारागिरांचाही समावेश होता. याव्यतिरिक्त, अभ्यागतांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ मिळणारे स्टॉल्सही उभारण्यात आले होते.

या मेळ्यात आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ, राजस्थान, पुद्दुचेरी, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश अशा 12 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील कारागिरांनी सहभाग घेतला होता,  या प्रदर्शनात हस्तकलेच्या वस्तू, हातमाग साड्या, मसाले, लोणची, अगरबत्ती, मधापासून बनवलेली उत्पादने, ब्लॉक-प्रिंट उत्पादने, कांजीवरम साड्या, चामड्याच्या वस्तू, लाकडी खेळणी, पिशव्या व पर्स, टेराकोटा मातीची उत्पादने, कृत्रिम दागिने, रोजवूड, शिसम लाकूड पासून बनवलेल्या भिंतीवरील सजावटीच्या वस्तू, तसेच बेड कव्हर्स आणि कुशन कव्हर्स अशा विविध प्रकारच्या पारंपरिक उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले होते.

हा विचार मंच कारागिरांना त्यांची उत्पादने अधिक व्यापक ग्राहकवर्गासमोर सादर करण्याची आणि संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध करून देते. त्याचबरोबर भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक कौशल्ये यांना प्रोत्साहन देते.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, शिल्प समागम मेळा हा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या तसेच मंत्रालयाच्या तीन राष्ट्रीय महामंडळांच्या एनएसएफडीसी, एनबीसीएफडीसी आणि एनएसकेएफडीसी यांच्या योजना व कार्यक्रमांची माहिती प्रसारित करण्यासाठीही एक महत्त्वाचा विचार मंच आहे. पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सहाय्याच्या योजना आणि विकासाच्या संधींबाबत जागरूकता वाढवणे, तसेच उद्योजकता आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

   

लक्ष्यित समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांना भारतात आणि परदेशात विविध डिजिटल विचारमंचांच्या माध्यमातून अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयाने भारत टुलीप अर्थात पारंपरिक कारागीर उत्थान उपजीविका कार्यक्रम हा उपक्रमही सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत उत्पादनांची दृश्यमानता वाढवण्यासाठी आणि ऑनलाइन विक्री सुलभ करण्यासाठी त्यांना भारत टुलीप हे ब्रँड नाव दिले जाते. पारंपरिक कलाप्रकारांचे जतन करताना कारागिरांच्या उपजीविकेला बळकटी देणे आणि भारतातील समृद्ध हस्तकलेची ओळख व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

मंत्रालय कारागिरांच्या सहभागासाठी विनामूल्य दालने उपलब्ध करून देते. तसेच प्रवासखर्च, दैनिक भत्ता, वस्तूंची वाहतूक आणि दुपारचे व रात्रीचे जेवण यांसह आवश्यक सहाय्यही पुरवते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सहाय्यामुळे कारागिरांना दालनाचे भाडे आणि सहभागाशी संबंधित निर्धारित खर्च स्वतः न करता मेळ्यात सहभागी होता येते आणि आपली उत्पादने प्रदर्शित करता येतात.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिल्प समागम मेळ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी समाजातील असुरक्षित घटकांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाप्रती केंद्र सरकारची बांधिलकी अधोरेखित केली.

   

मंत्र्यांनी मेळ्यातील विविध उत्पादनांचे प्रदर्शन करणाऱ्या दालनाची पाहणी केली. यामध्ये हस्तकला वस्तू, हातमागावरील साड्या, मसाले, लोणची, अगरबत्त्या, मधापासून तयार केलेली उत्पादने, ठसा छपाई केलेल्या वस्तू, चामड्याच्या वस्तू, लाकडी खेळणी, पिशव्या, पर्स, टेराकोटा उत्पादने, कृत्रिम दागिने,  भिंतीवरील सजावटीच्या वस्तू, तसेच अंथरुणाच्या चादरी आणि उशांची अभ्रे यांचा समावेश होता. त्यांनी पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दालनांनाही भेट दिली. त्यामुळे मेळ्याला भेट देणाऱ्यांच्या अनुभवात अधिक भर पडली.

   

 

* * *

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325595) अभ्यागत कक्ष : 12