संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला 'ऑस्ट्राहिंद' हा पाचवा संयुक्त लष्करी सराव तिरुवनंतपुरम येथे सुरू

Posted On: 19 OCT 2026 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

'ऑस्ट्राहिंद 2026 या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाच्या पाचव्या आवृत्तीला आज केरळमधील तिरुवनंतपुरम येथील परदेशी प्रशिक्षण केंद्रावर प्रारंभ झाला.

19 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या या सरावात भारतीय लष्कर आणि ऑस्ट्रेलियन लष्कराचे प्रत्येकी सुमारे  120 जवान सहभागी होतील. याची चौथी आवृत्ती 13 ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील इर्विन बॅरॅक्स येथे आयोजित करण्यात आली होती.

भारतीय लष्कराच्या तुकडीमध्ये गढवाल रायफल्सच्या जवानांसह इतर दलांतील आणि सेवांमधील जवानांचा  समावेश आहे, तर ऑस्ट्रेलियन लष्कराच्या तुकडीमध्ये 13 ब्रिगेडमधल्या जवानांचा समावेश आहे.

या सरावाचा उद्देश दोन्ही सैन्यांमधील आंतरकार्यक्षमता, संयुक्त कौशल्य आणि परीचालन समन्वय वाढवणे, तसेच द्वीपसमूह आणि किनारी प्रदेशातील मोहिमांसाठी डावपेच, तंत्र आणि कार्यपद्धती यांविषयी समान समज विकसित करणे हा आहे.

या सरावादरम्यान, दोन्ही देशांमधील सैनिक हवाई आणि सागरी आयामांसह प्रत्यक्ष युद्धकालीन परिस्थितीत संयुक्त नियोजन, सामरिक कवायती आणि लढाईचे प्रशिक्षण घेतील.या प्रशिक्षणात व्यावसायिक अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींच्या देवाणघेवाणीसोबतच, किनारी आणि बेटांच्या परिसरातील समन्वित कारवाया, निगराणी आणि टेहळणी,महत्त्वाच्या आस्थापनांचे संरक्षण आणि मानवतावादी मदत व आपत्ती निवारणाच्या आकस्मिक परिस्थितीतील प्रतिसाद  यावर लक्ष केंद्रित केले जाईल.प्रथमच, न्यूझीलंडचे एक निरीक्षक शिष्टमंडळही या सरावात सहभागी होणार आहे.

ऑस्ट्राहिंद 2026 या सरावामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लष्करी सहकार्य, आंतरकार्यक्षमता आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होईल.त्यामुळे हिंद - प्रशांत प्रदेशातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेप्रती असलेली त्यांची सामायिक वचनबद्धता अधिक दृढ होईल.

 

* * *

निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325313) अभ्यागत कक्ष : 8