ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
गुणवत्तापूर्ण मानकांसह आयुषचा प्रसार करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोद्वारे (बीआयएस) देशभरात परस्परसंवादी सत्रांचे आयोजन
600 हून अधिक तज्ज्ञ, वैद्य आणि उद्योग क्षेत्रातील अग्रणींचा सहभाग
Posted On:
19 OCT 2026 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
भारताच्या पारंपरिक औषध प्रणालीच्या मानकीकरणाला अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) आयुष विभागाने आयुर्वेद, योग आणि सोवा-रिग्पा मधील मानकीकरणावर आधारित दोन राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले. पारंपरिक वारसा आणि वैज्ञानिक गुणवत्ता नियंत्रण यांची परस्परांशी सांगड घालून ग्राहकांमध्ये या उत्पादनांविषयीच्या विश्वासात वाढ करणे आणि आयुष क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देणे हा बीआयएस चा उद्देश आहे. या देशभरातील अभियानात 600 हून अधिक प्रमुख भागधारक एकत्र आले, ज्यामध्ये संशोधक, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, शैक्षणिक नेते आणि या क्षेत्रातील व्यावसायिकांचा समावेश होता.
प्रगती 2026: आयुर्वेद आणि योग मधील मानकीकरणावरील राष्ट्रीय चर्चासत्र
बीआयएस द्वारे केएलई श्री बीएमके आयुर्वेद महाविद्यालय आणि केएलई उच्च शिक्षण व संशोधन अकादमी यांच्या सहकार्याने कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित 'प्रगती 2026' या चर्चासत्रात आयुर्वेद आणि योग क्षेत्राला बळकटी देण्यामध्ये भारतीय मानकांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी 600 सहभागी एकत्र आले होते. या चर्चासत्रादरम्यान हाताळलेले प्रमुख विषय खालीलप्रमाणे:
- मानक पद्धती आणि शिक्षण: योग आणि आयुर्वेदमध्ये एकसमान शब्दावली, शैक्षणिक निकष आणि क्लिनिकल मार्गदर्शक तत्त्वांच्या गरजेवर भर देणे.
- उद्योग आणि स्टार्ट-अप्सना पाठबळ: बीआयएस प्रमाणपत्र स्वीकारल्याने बाजारपेठेतील पोहोच कशी वाढते आणि ग्राहकांचा विश्वास कसा निर्माण होतो, यावर उद्योगधुरीणांचे मार्गदर्शन.
- परस्परसंवादी खुली सत्रे: शिक्षण, संशोधन, उत्पादन आणि क्लिनिकल पद्धतींमध्ये मानके स्वीकारताना येणाऱ्या व्यावहारिक मुद्द्यांवर तज्ज्ञ समितीच्या चर्चेने प्रतिनिधींशी संवाद साधला, तसेच व्यापक अंमलबजावणीसाठी कोणत्या त्रुटी दूर करण्याची गरज आहे यावर चर्चा केली.
लेह, लडाख येथे सोवा-रिग्पा मानकीकरणाला गती
बीआयएस ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पा लेह येथे आपल्या 5 व्या सोवा-रिग्पा विभागीय समितीच्या बैठकीसोबत एका सखोल विचारमंथन सत्राचे आयोजन केले. यामध्ये खालील मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले:
- कच्च्या मालाची गुणवत्ता आणि सुरक्षितता: औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता, प्रयोगशाळा आणि विश्लेषणात्मक आवश्यकता, औषधकोश मानके आणि गुणवत्तेच्या हमीसह एकल वनस्पती, कच्चा माल आणि तयार औषधांसाठी कठोर चाचणी निकष स्थापित करणे.
- बौद्धिक संपदा अधिकार आणि पारंपरिक ज्ञान: गुणवत्ता मूल्यांकनासाठी पेटंट, ट्रेडमार्क आणि जीआय टॅग्जद्वारे स्थानिक ज्ञानाचे रक्षण करणे.
या उपक्रमांना देशातील प्रमुख राष्ट्रीय संस्थांचे सहकार्य लाभले. नवीन मानकीकरण प्रस्तावांसाठी सोपे ऑनलाइन सबमिशन पोर्टल उपलब्ध करून देत उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राशी सातत्याने जोडलेले राहण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा बीआयएस ने पुनरुच्चार केला.
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे, जी मानकीकरण आणि अनुरूपता मूल्यांकनाच्या सुसंवादी विकासासाठी जबाबदार आहे.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325294)
अभ्यागत कक्ष : 6