अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

भारताची अंतराळ अर्थव्यवस्था येत्या 7 ते 8 वर्षांत 40 ते 45 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्र खुले केल्यानंतर खाजगी क्षेत्रातून होणाऱ्या गुंतवणुकीत वाढ झाली असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले अधोरेखित


पायाभूत सुविधांच्या देखरेखीपासून ते शेती आणि आपत्ती व्यवस्थापनापर्यंत पृथ्वीवरील विकासाला अंतराळ तंत्रज्ञानामुळे चालना मिळत आहे - डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 17 OCT 2026 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026

 

भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेचे मूल्य सध्या सुमारे 9 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं असून, येत्या सात ते आठ वर्षांत ते 40 ते 45 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचेल अशी अपेक्षा असल्याचे, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आज अंतराळ, सार्वभौमत्व आणि नवी अर्थव्यवस्था  या विषयावर प्रसारमाध्यमांची गोलमेज परिषद झाली. या परिषदेत डॉ. जितेंद्र सिंह यांनी उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

आता भारताने केवळ स्वतःची तांत्रिक क्षमता सिद्ध करण्याच्या पलीकडे जात, जागतिक पातळीवर स्पर्धात्मक व्यावसायिक अंतराळ कंपन्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या क्षेत्रातील भारतीय उद्योग व्यवसायांची व्याप्ती विस्तारण्यासाठी तसेच जागतिक बाजारपेठेतले अस्तित्व विस्तारण्यासाठी अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, अंदाज व्यक्त करता येण्याजोगी मागणी, जलद नियामक मंजुऱ्या आणि उद्योग व्यवसायांशी संबंधित शाश्वत मॉडेल्स यापुढे अधिक आवश्यक असतील ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम या संस्थेच्या वतीने या परिषदेचे आयोजन केले गेले होते. या परिषदेत झालेल्या चर्चांमधून राष्ट्रीय हितांचे रक्षण करतानाच, प्रत्येक देश आपल्या सार्वभौम अंतराळ क्षमतेचे व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धात्मक उद्योगांमध्ये कसे रूपांतर करू शकतात, त्यासाठी खासजी क्षेत्रातून कशा रितीने भांडवल आकर्षित करू शकतात आणि कशातऱ्हेने भक्कम पुरवठा साखळी विकसित करू शकतात, याबद्दलचा आढावा घेतला गेला. या परिषदेत सहभागी झालेल्यांनी विकसित होत असलेली जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भागीदारीची भूमिका तसे; खाजगी अंतराळ उद्योग क्षेत्रांच्या व्याप्तीचा विस्तार करण्याच्या प्रक्रियेतील आव्हाने या मुद्यांवरही चर्चा केली. मंत्री म्हणाले की, भारताचा अंतराळ कार्यक्रम केवळ अंतराळातील कामगिरीमुळेच नव्हे, तर पृथ्वीवर अंतराळ तंत्रज्ञानाच्या व्यापक वापरामुळेही ओळखला जातो. उपग्रह संचार, भू-स्थानिक अनुप्रयोग आणि पृथ्वी निरीक्षण हे पायाभूत सुविधांचा विकास, प्रकल्प देखरेख, कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि संरक्षण यांना साहाय्य करत आहेत.

   

डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रकल्प मंजुरी, अंमलबजावणीच्या वेळापत्रकावर देखरेख आणि विकास कामांचे जिओटॅगिंग करण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापराचा उल्लेख केला. भारत म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या शेजारील देशांना आपत्ती व्यवस्थापनासाठी अंतराळ-आधारित माहिती आणि साहाय्य देखील पुरवत आहे. यामुळे हे दिसून येते की अंतराळ क्षमतांमधील गुंतवणूक सार्वजनिक सेवा कशा सुधारू शकते, विकासाला कशी मदत करू शकते आणि व्यावसायिक वापरासाठी संधी कशा निर्माण करू शकते.

मंत्री म्हणाले की, अंतराळ क्षेत्राचे व्यापक आर्थिक मूल्य हे तांत्रिक फलितांचा व्यावहारिक उपयोग आणि नागरिकांच्या गरजांशी जोडण्यात आहे. प्रक्षेपण याने आणि उपग्रहांसोबतच, डाउनस्ट्रीम सेवा, डेटा-आधारित उपाययोजना आणि औद्योगिक अनुप्रयोग भारतीय अंतराळ कंपन्यांसाठी बाजारपेठ विस्तारण्यात महत्त्वाचे ठरतील.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावर भर दिला की राष्ट्रीय अंतराळ क्षमता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य ही परस्परविरोधी उद्दिष्टे असण्याची गरज नाही. भारताने आपल्या उद्योगासाठी संधींचा विस्तार करण्याकरिता जागतिक भागीदारांसोबत काम करत असतानाच, आपली स्वतःची तांत्रिक क्षमता वाढवत राहणे आवश्यक आहे. अधिक मजबूत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सार्वजनिक-खाजगी भागीदारी गुंतवणूक, तंत्रज्ञान विकास, पुरवठा साखळीचे एकत्रीकरण आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेशास मदत करू शकते.

तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या गरजा जसजशा विकसित होत जातील, तसतसे पुरोगामी विचारांसाठी खुले राहणे आणि धोरणांमध्ये बदल करणे याच्या महत्त्वावरही मंत्र्यांनी भर दिला. अंतराळ क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले करणे, हे प्रस्थापित सार्वजनिक संस्थांच्या बरोबरीने नवीन कंपन्यांना योगदान देण्यास सक्षम करण्याचे महत्त्व दर्शवते.

भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या विकासाचा पुढील टप्पा हा तांत्रिक क्षमतांना व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतरित करण्यावर अवलंबून असेल. अधिक गुंतवणूक, अपेक्षित मागणी, कार्यक्षम नियामक प्रक्रिया, स्वदेशी क्षमता आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी या स्थित्यंतराच्या केंद्रस्थानी असतील, ज्यामुळे देशाला जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावण्यासाठी स्थान मिळेल.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/राजेश शिरभाते/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324814) अभ्यागत कक्ष : 13