औषधनिर्मिती विभाग
azadi ka amrit mahotsav

137 कर्करोगाच्या औषधांवरील नफ्याच्या मर्यादेत सुधारणा


सुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील

Posted On: 17 OCT 2026 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026

 

रसायन आणि खते मंत्रालयातील औषध निर्माण विभागांतर्गत येणाऱ्या ‘राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने’ (NPPA) जनहितार्थ 137 ठरवून दिलेल्या बिगर-अनुसूचित कर्करोगविरोधी औषधांवर ‘व्यापार नफा मर्यादा सुसूत्रीकरण’ (ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन - TMR) लागू केले आहे. यामागचा मुख्य उद्देश, व्यापाऱ्यांचा अतिरिक्‍त नफा नियंत्रणात आणणे, कर्करोगावरील उपचार अधिक परवडणारे बनवणे आणि या औषधांची उपलब्धता सुलभ करणे हा आहे. सध्याच्या किमतींच्या रचनेनुसार, या निर्णयामुळे संबंधित कर्करोगविरोधी औषधांचे कमाल किरकोळ मूल्य (MRP) 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

हा निर्णय NPPA ने 2019 मध्ये राबवलेल्या प्रायोगिक TMR उपक्रमाच्या यशावर आधारित आहे. त्या उपक्रमांतर्गत 42 कर्करोगविरोधी औषधांवरील व्यापाराचा नफा कमाल 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला होता. त्यानंतर, बिगर-अनुसूचित कर्करोगविरोधी औषधांच्या 526 ब्रँड्सचे कमाल किरकोळ मूल्य 90 टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. आताचा हा उपक्रम आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (DGHS) अंतर्गत असलेल्या तज्ज्ञ समितीने शिफारस केलेल्या यादीच्या आधारे कर्करोगविरोधी औषधांच्या मोठ्या गटापर्यंत या धोरणाचा विस्तार करतो.

या तज्ज्ञ समितीमध्ये देशभरातील प्रमुख कर्करोगतज्ज्ञ, वैद्यकीय विशेषज्ञ, विविध रुग्णालयांतील तज्ज्ञ आणि शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने सखोल विचारविनिमय करून TMR अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी 137 औषधांची शिफारस केली. ही यादी वेळोवेळी अद्ययावत केली जाईल. समितीने शिफारस केलेल्या औषधांचा विचार करून, 'औषध (किंमत नियंत्रण) आदेश (DPCO), 2013' च्या परिच्छेद 19 नुसार, NPPA ने व्यापाराचा नफा कमाल किरकोळ मूल्याच्या (MRP) 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित केला आहे. यासंदर्भातील 17 ऑक्टोबर 2026 रोजीची राजपत्रित अधिसूचना NPPA च्या https://nppa.gov.in/en या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या उपायामुळे कर्करोगाने ग्रस्त असलेल्या अशा अनेक रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यांना उपचारांच्या अवाढव्य खर्चामुळे वारंवार मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत सर्व उत्पादकांना त्यांच्या सुधारित किमतींची माहिती NPPA ला देणे बंधनकारक असेल. या सुधारित किमती 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील. उत्पादकांनी या सुधारित किमतींची यादी त्यांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करणे आणि ती सर्व किरकोळ विक्रेते तसेच रुग्णालयांपर्यंत व्यापकपणे पोहोचवणे आवश्यक आहे. सर्व किरकोळ विक्रेते आणि रुग्णालयांना  9 नोव्हेंबर 2026 पासून या कमी केलेल्या किमती आकारणे आणि आपापल्या औषध दुकानांमध्ये सुधारित किमती प्रदर्शित करणे अनिवार्य असेल. रुग्णालयांनाही त्यांच्या संकेतस्थळांवर सुधारित किमती ठळकपणे प्रदर्शित कराव्या लागतील. ग्राहक औषधांच्या या सुधारित किमती तपासण्यासाठी 'फार्मा सही दाम' (Pharma Sahi Daam) हे ॲप आणि NPPA च्या संकेतस्थळाचा वापर करू शकतात.

कर्करोगविरोधी औषधांचा मोठा पुरवठा थेट रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना केला जात असल्याने, अंमलबजावणीच्या तारखेपासून अशा औषधांच्या सुधारित किमती लागू करण्याची जबाबदारी त्यांची असेल. उत्पादक, किरकोळ विक्रेत्यांसह वितरक, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्था यांच्याकडून या नियमांचे पालन केले जात असल्याची खात्री करण्यासाठी राज्य औषध नियंत्रक (स्टेट ड्रग कंट्रोलर्स) आवश्यक ती पावले उचलतील.

कर्करोगविरोधी औषधांवर 'ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन' (TMR) लागू करण्याच्या या उपायाचा उद्देश वितरक आणि किरकोळ विक्री साखळीतील अतिरिक्‍त नफ्यावर नियंत्रण मिळवणे हा आहे; तसेच यादरम्यान उत्पादकांचा रास्त महसूल सुरक्षित ठेवणे आणि बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण होण्यास प्रतिबंध करणे हाही यामागील हेतू आहे. रुग्णांना ही औषधे वेळेवर आणि विनाअडथळा उपलब्ध व्हावीत यासाठी औषध कंपन्यांनी अधिसूचित औषधांचे (formulations) उत्पादन आणि पुरवठा सध्याच्याच पातळीवर कायम ठेवणे बंधनकारक असेल.

कर्करोगविरोधी औषधे अधिक परवडणारी आणि सुलभतेने उपलब्ध करून देऊन, हा उपक्रम रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार हलका करण्यास मदत करेल; तसेच कर्करोगाच्या उपचारांची सर्वांना समान उपलब्धता मिळवून देण्याच्या व्यापक सार्वजनिक आरोग्य उद्दिष्टाला पाठबळ देईल.

 

* * *

राधिका अघोर/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324802) अभ्यागत कक्ष : 12