युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पोलंडच्या युवा शिष्टमंडळाचा दुसरा जामसाहेब स्मृती युवा आदान-प्रदान कार्यक्रम
Posted On:
16 OCT 2026 2:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2026
दुसरा जामसाहेब स्मृती युवा आदान-प्रदान कार्यक्रम (Youth Exchange Programme) 7 ते 14 ऑक्टोबर 2026 दरम्यान पार पडला. पोलंडच्या युवा शिष्टमंडळातील 19 सदस्यांनी गुजरात, महाराष्ट्र आणि नवी दिल्लीला भेट दिली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारताचा वैज्ञानिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास दर्शवणाऱ्या संस्थांना भेट दिली तसेच वरीष्ठ भारतीय नेत्यांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2024 मधील पोलंड भेटीदरम्यान या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. भारत पोलंड धोरणात्मक भागीदारीच्या पाच वर्षीय कृती आराखड्याचा (2024-2028) हा एक भाग आहे. याद्वारे दरवर्षी पोलंडमधील युवक भारताला भेट देतात आणि त्यांना भारताचा इतिहास, संस्कृती, संस्था व तत्कालीन विकास समजून घेण्याची संधी मिळते.

गुजरातमधील जामनगर येथील बालाचडी पोलिश बाल शिबीर हे या भेटीचे ठळक वैशिष्ट्य होते. हे शिबीर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महाराजा जाम साहेब दिग्विजयसिंह रणजितसिंह जडेजा यांनी मानवीय दृष्टीकोनातून केलेल्या मदतीच्या स्मरणार्थ आयोजित केले जाते. युद्धाच्या काळात विस्थापित व्हावे लागलेल्या पोलिश बालकांना महाराजांनी आसरा दिला, शिक्षण दिले व आरोग्यसेवा पुरवली. त्यांच्या या मदतीमुळे पोलंडमध्ये त्यांना डोब्री महाराज किंवा चांगला राजा अशी ओळख मिळाली. या भेटीमुळे पोलंडच्या शिष्टमंडळाला इतिहासातील ही अद्वितीय घटना तसेच दोन्ही देशांमधील शाश्वत बंध जाणून घेण्याची संधी मिळाली.
त्यानंतर शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील वळिवडे पोलिश शरणार्थी शिबीर स्मारकाला भेट दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात हजारो पोलिश नागरिकांना भारताने दिलेल्या आश्रयाची आठवण म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे.

बालाचाडी आणि वलीवाडे येथे दिलेल्या भेटीने कठीण काळात पोलिश जनतेला भारताने दिलेली मानवतावादी मदत अधोरेखित केली आणि भारत-पोलंड मैत्रीचा ऐतिहासिक पाया अधिक भक्कम केला.
नवी दिल्ली येथे, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पोलंडच्या युवाप्रतिनिधीमंडळासाठी खास मेजवानीचे आयोजन केले होते. या भेटीमुळे पोलंडहून आलेल्या युवकांना मंत्र्यांशी संवाद साधण्याची, आपापले दृष्टिकोन मांडण्याची आणि युवा विकास व सहभागाबाबत भारताचा दृष्टिकोन जाणून घेण्याची संधी मिळाली. या संवादातून, भारत आणि पोलंडमधील परस्पर सामंजस्य वाढवण्यात आणि संबंध अधिक बळकट करण्यासाठी जनतेमधील देवाणघेवाण किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित झाले.
प्रतिनिधींनी सात दिवसांच्या कालावधीत भारताचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जामसाहेब आणि वलीवाडे कॅम्प स्मारके, गांधीनगर येथील 'दांडी कुटीर' आणि महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमधील 'कीर्ती मंदिर' यांना दिलेली भेट या कार्यक्रमातील काही अविस्मरणीय अनुभवांपैकी एक होते. प्रतिनिधींनी स्नेहपूर्ण आदरातिथ्याची प्रशंसा केली आणि या भेटीचे वर्णन एक समृद्ध अनुभव असे केले, ज्यामुळे भारताविषयी त्यांना अधिक जाणून घेता आले आणि या देशासोबतचे त्यांचे बंध अधिक दृढ केले.

या प्रतिनिधीमंडळाला परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेण्याची आणि त्यांच्याशी भारत-पोलंड संबंधांविषयी तसेच द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यात युवकांमधील देवाणघेवाणीची भूमिका यावर चर्चा करण्याची संधीही मिळाली.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे यशस्वी आयोजन, भारत-पोलंड संबंधांना चालना देण्यात 'युवा मुत्सद्देगिरी' किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करते. तरुणांना सामायिक इतिहास आणि समकालीन भारताशी जोडून, हा कार्यक्रम महाराजा जाम साहेब यांचा वारसा पुढे नेतो आणि दोन्ही देशांमधील चिरंतन मैत्री अधिक दृढ करत आहे.
* * *
नितीन फुल्लुके/सुरेखा जोशी/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324288)
अभ्यागत कक्ष : 6