वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अपेडाच्या माध्यमातून तामिळनाडूतील 1.755 मेट्रिक टन सेंद्रिय पामिरा गूळ पावडरची बल्गेरियाला निर्यात


भारतातील पारंपारिक पामिरा गूळ पावडर आता बल्गेरियन बाजारपेठेत उपलब्ध होणार

Posted On: 16 OCT 2026 12:06PM by PIB Mumbai

केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या कृषी आणि प्रक्रिया-युक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) द्वारे 15 ऑक्टोबर 2026 रोजी तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील गोबीचेट्टीपलायम येथून बल्गेरियातील ‘वर्ना’ शहराकडे 1.755 मेट्रिक टन सेंद्रिय पामिरा गूळ पावडरची पहिली निर्यात खेप रवाना करण्यात आली. ही गूळ पावडर NPOP आणि EU द्वारा प्रमाणित आहे.

ही खेप भारताच्या पारंपरिक 'पामिरा' आधारित उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या आणि देशाच्या सेंद्रिय निर्यात उत्पादनांच्या श्रेणीत विविधता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हे उत्पादन इरोड येथील ‘मेसर्स वेलबीइंग फूड्स’ (M/s Wellbeing Foods)ने चेन्नई येथील ‘मेसर्स चेट्टी एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ (M/s Chetty Exports Private Limited) च्या सहकार्याने तयार करून निर्यात केले जात आहे. चेन्नई बंदरावरून सागरी मार्गे ही खेप पाठवली जाईल. बल्गेरियास्थित 'मेसर्स सो लाईफ लिमिटेड' (M/s Sow Life Ltd) ही परदेशातील आयातदार आणि वितरक कंपनी आहे.

तामिळनाडूत ताडापासून पारंपरिकपणे बनवल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता बळकट करणे आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या उत्पादकांसाठी नवीन संधी निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत 137 एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात असून, यामुळे शेतकऱ्यांना विस्तारित बाजारपेठ उपलब्ध होईल आणि निर्यातभिमुख मूल्य साखळ्यांचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमतीत सुमारे 15-22% वाढ दिसून आली आहे, तर उत्पादकांसाठी ही वाढ 17% इतकी आहे. यामुळे सहभागी शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यास आणि शाश्वत उपजीविकेला हातभार लागण्यास मदत होणार आहे.

ताडाच्या फुलातील मकरंदापासून बनवलेल्या गुळाची पावडर हा पारंपरिक भारतीय गूळ असून त्यामध्ये मूल्यवर्धनाची आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात स्वीकारला जाण्याची क्षमता आहे. शुद्धीकरण केलेल्या साखरेला पर्याय असलेल्या या गुळामध्ये व्हिटॅमिन्स व खनिजद्रव्यांसह अन्य पोषक तत्त्वे आहेत.

पारंपरिक पद्धतीने ताडापासून तयार केलेली उत्पादने दीर्घकाळापासून तमिळनाडूच्या कृषी व सांस्कृतिक जीवनाचा भाग आहेत. या स्रोतापासून निर्यातक्षम उत्पादने विकसित केल्यास बाजारपेठ विस्तारण्याची संधी मिळेल आणि याची उत्पादकांना व मूल्यसाखळीला मदत होईल.

अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी हिरवे निशाण दाखवून या मालवाहतुकीचा प्रारंभ केला. या समारंभाला अपेडाच्या सचिव डॉ. शाश्वती बोस, अपेडाचे वरीष्ठ अधिकारी, निर्यात कंपन्यांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय भागीदार, धान उत्पादक शेतकरी आणि निर्यात मूल्यसाखळीशी संबंधित इतर भागधारक उपस्थित होते. भारताची कृषी निर्यात भक्कम करण्यासाठीचे एकत्रित प्रयत्न याद्वारे अधोरेखित झाले.

प्रमाणित सेंद्रिय व मूल्यवर्धित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी बाजारपेठ विकसित करणे, दर्जा उंचावणे व भारतीय उत्पादक आणि परदेशी ग्राहक यांच्यात समन्वय साधण्याचे काम अपेडा सातत्याने करत आहे. ताडापासून बनवलेल्या सेंद्रिय गूळ पावडरीची बल्गेरियामधील निर्यात झाल्यामुळे नवनवीन बाजारपेठा खुल्या होतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भाराच्या पारंपरिक उत्पादनांचे स्थान मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.  

***

NitinFulluke / SushamaKane / SurekhaJoshi

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324258) अभ्यागत कक्ष : 9