कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
डीएआरपीजीचे सचिव यांनी 84 मंत्रालये/विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत विशेष मोहीम 6 च्या तिसऱ्या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले
मंत्रालये/विभागांनी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले: इंडिया पोस्टद्वारे डिजी पोस्ट, ई-कचरा संकलन मोहिम, वेस्ट टू वेल्थ कलाकृती आणि तक्रार निवारण मदत कक्ष
प्रमुख मंत्रालये/विभागांनी त्यांच्या संलग्न, अधीनस्थ आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक दिवसीय विशेष मोहिम राबवली
सोशल मीडिया आणि पीआयबीच्या निवेदनांद्वारे मोहिमेचा व्यापक प्रचार; विशेष मोहीम 6 ला गती मिळत आहे
Posted On:
15 OCT 2026 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाला नोडल विभाग म्हणून नियुक्त करून सरकारने सुरू केलेल्या विशेष मोहीम 6 ने लक्षणीय गती घेतली आहे. 30 सप्टेंबर 2026 रोजी तयारीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, अंमलबजावणीचा टप्पा 2 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू झाला असून तो 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू राहील. अंमलबजावणीच्या पहिल्या दोन आठवड्यांत, शासनातील विविध मंत्रालये/विभागांनी स्वच्छता आणि प्रलंबित बाबींच्या निपटाराची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण, नागरिक-केंद्रित आणि शाश्वत उपक्रम हाती घेऊन उल्लेखनीय उत्साह दाखवला आहे.
स्वच्छता आणि प्रलंबित बाबींच्या निपटार्यासाठीच्या विशेष मोहीम 6 च्या नोडल अधिकाऱ्यांसोबतची तिसरी बैठक, डीएआरपीजीच्या सचिव, निवेदिता शुक्ला वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली, मोहिमेच्या अंमलबजावणीच्या टप्प्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला 84 मंत्रालये/विभाग, त्यांचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि क्षेत्रीय कार्यालयांचे प्रतिनिधित्व करणारे 600 हून अधिक अधिकारी 240 हून अधिक ठिकाणांहून आभासी पद्धतीने (व्हर्च्युअली) उपस्थित होते. बैठकीदरम्यान, डीएआरपीजीचे अतिरिक्त सचिव, पुनीत यादव यांनी सुरू असलेल्या मोहिमेच्या प्रगतीचे सादरीकरण केले आणि मंत्रालये/विभागांनी हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवर प्रकाश टाकला.
यावर्षीच्या मोहिमेचे एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे समर्पित एक-दिवसीय मोहिम, ज्याअंतर्गत प्रमुख मंत्रालये/विभाग त्यांच्या सर्व संलग्न आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये आणि क्षेत्रीय आस्थापनांमध्ये एकाच दिवशी स्वच्छता आणि विल्हेवाट लावण्याचे उपक्रम हाती घेतात. या समर्पित एक-दिवसीय उपक्रमाचा प्रभाव विशेष मोहिम 6 च्या व्यापकतेत स्पष्टपणे दिसून येतो, ज्यामध्ये विविध मंत्रालये/विभागांची क्षेत्रीय कार्यालये मोहिमेच्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत.
नाविन्यपूर्ण उपक्रम: मंत्रालये/विभागांनी नेहमीच्या स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन मोहिमेदरम्यान अनेक नाविन्यपूर्ण आणि नागरिक-केंद्रित उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
नागरिक-केंद्रित सेवा: टपाल विभागाने डिजीपोस्ट हा उपक्रम सुरू केला आहे, ही एक अद्वितीय फिजीटल मेल सेवा आहे, ज्याअंतर्गत गुजरात पोलिसांनी जारी केलेले वाहतूक ई-चलन डिजिटल स्वरूपात पाठवले जातात आणि नागरिकांना प्रत्यक्ष पोहोचवले जातात. संरक्षण विभागाने तक्रार निवारणासाठी ई-छावनी हेल्पडेस्कची स्थापना केली, तर रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या समस्या आणि सार्वजनिक सहभागावर युवक,विद्यार्थी आणि प्रवाशांना सहभागी करून घेण्यासाठी रेल जन युवा संवाद आयोजित केला.
ई-कचरा व्यवस्थापन: कोळसा मंत्रालयाने एमसीएलच्या मुख्यालयात एक ई-कचरा किऑस्क उभारला आणि आपल्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ई-कचरा संकलन मोहीम राबवली. खाण मंत्रालयाने कपात करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा या दृष्टिकोनांतर्गत टाकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत वस्तूंची जबाबदारीने विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जीपीओए-3 इमारतीमध्ये एक ई-कचरा संकलन स्टॉल उभारला. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत, आयआयआयटी अलाहाबाद येथे कालबाह्य ई-कचरा वेगळा करून विल्हेवाटीसाठी गोळा करण्यात आला आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने ई-कचरा संकलन मोहीम आयोजित केली.
कचऱ्यातून संपत्ती: टाकून दिलेल्या साहित्याचे रूपांतर कला आणि उपयुक्त उत्पादनांमध्ये केले जात आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या चमच्यांपासून आणि कागदापासून मोराची मूर्ती, तसेच टाकून दिलेल्या संगणकाच्या भागांपासून आणि घरातील कचऱ्यापासून री-बॉट या रोबोटची मूर्ती तयार केली. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे संग्रहालयात वेस्ट टू आर्ट पार्क विकसित केले, आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने टाकून दिलेल्या ई-कचऱ्यापासून एक कार्यरत चरखा बनवला.
नोंदी, सर्वसमावेशकता आणि स्वच्छता: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाने कालबाह्य झालेल्या नोंदींचे तुकडे करून त्या काढून टाकण्याचे काम हाती घेतले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने प्रश्नमंजुषेवर आधारित स्वच्छता जागरूकता सत्रानंतर कामगारांना स्वच्छता किटचे वाटप केले, आणि गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील आसाम रायफल्सने सामुदायिक सहभागातून कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेला प्रोत्साहन दिले.
या मोहिमेचा छापील, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाद्वारेही व्यापक प्रचार केला जात आहे, ज्यामध्ये मंत्रालये/विभाग #SpecialCampaign6 या हॅशटॅगखाली सोशल मीडियावर नियमितपणे आपल्या उपक्रमांची माहिती देत आहेत आणि पीआयबी निवेदने जारी करत आहेत.
नितीन फुल्लुके/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323853)
अभ्यागत कक्ष : 11