युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
एनएसडीएफ, एसएआय ने भारतातील मुष्टियुद्ध परिसंस्था मजबूत करण्यासाठी इंडियन ऑईलसोबत केली भागीदारी
केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे देशात सर्वसमावेशक मुष्टियुद्ध परिसंस्था उभारण्याचे आवाहन
भारतीय मुष्टियुद्ध परिसंस्थेला दोन वर्षांत ₹40 कोटींचे प्रोत्साहन; गुणवत्ता शोध, खेळाडू विकास, प्रशिक्षक आणि क्रीडा विज्ञानाला चालना देण्यासाठी इंडियन ऑईलकडून गुंतवणूक
डीपीईच्या सामाईक सीएसआर विषयक आराखड्यात क्रीडा क्षेत्राचा समावेश झाल्यानंतर सामंजस्य करारावर करण्यात आली स्वाक्षरी
Posted On:
13 OCT 2026 5:42PM by PIB Mumbai
भारतातील मुष्टियुद्ध क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (एनएसडीएफ), भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांनी एकत्रितपणे भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत नवोदित गुणवंत खेळाडूंचा शोध घेणे आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची कामगिरी उंचावणे यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित ‘खेलो इंडिया’ योजनेला मंजुरी दिली आहे.

या योजनेत नमूद केल्यानुसार, देशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) योग्य आणि नियोजनबद्ध वापर महत्त्वाचा आहे, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले.
डॉ. मांडविया म्हणाले, “सुधारित खेलो इंडिया योजनेअंतर्गत सरकार आणि कंपन्यांमधील सहकार्य अधिक मजबूत होत आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून होणारे असे सहकार्य देशात एक सक्षम क्रीडा व्यवस्था उभारण्यास मदत करेल.”

सार्वजनिक उद्यम विभागाच्या (डीपीई) सामाईक सीएसआर आराखड्यात क्रीडा क्षेत्राचा स्वतंत्र विषय म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कंपन्यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या भागीदारीअंतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन पुढील दोन वर्षांत 40 कोटी रुपये देणार आहे. या निधीचा उपयोग गुणवंत खेळाडूंचा शोध घेणे, त्यांना प्रशिक्षण देणे, क्रीडा विज्ञानाची मदत घेणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळवून देणे यासाठी केला जाईल. तसेच, मुष्टियुद्ध अकादमी अधिक सक्षम करणे आणि प्रशिक्षक, पंच आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचे कौशल्य वाढवणे यावरही भर दिला जाईल.
डॉ. मांडविया पुढे म्हणाले, “या सामंजस्य करारामुळे क्रीडा क्षेत्राच्या विकासात कंपन्यांचा सहभाग वाढेल. केवळ बॉक्सिंगमध्येच नव्हे, तर प्रत्येक खेळाच्या विकासासाठी कंपन्यांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे. खेळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला आर्थिक आणि इतर मदतीची गरज असते. पुढे खेळाच्या विकासासाठी आवश्यक व्यवस्था तयार झाली की, तो स्वयंपूर्ण होतो आणि त्यात गुंतवणूकही आपोआप वाढू लागते.”

“केवळ आर्थिक मदत देऊन चालणार नाही, तर बॉक्सिंगच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक व्यवस्था उभारली पाहिजे. यासाठी गुणवंत खेळाडूंचा शोध घेणे, त्यांना आवश्यक साहित्य पुरवणे, क्रीडा विज्ञानाची मदत घेणे, चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच प्रशिक्षक आणि पंचांना प्रशिक्षण देणे यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे,” असे डॉ. मांडविया यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या या सामंजस्य कराराचा उद्देश, इंडियन ऑईलचा सीएसआर निधी, क्रीडा विकासासाठी साधनसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा विकास निधीची (एनएसडीएफ) भूमिका आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या तांत्रिक ज्ञानाचा एकत्रितपणे उपयोग करून घेणे, हा आहे.
या करारांतर्गत मुष्टियोद्ध्यांना दर्जेदार प्रशिक्षण, वैज्ञानिक मार्गदर्शन, चांगल्या प्रशिक्षण सुविधा आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

भारतीय मुष्टियुद्ध क्षेत्रासाठी ही भागीदारी महत्त्वाच्या वेळी झाली आहे. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय मुष्टियोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 3 कांस्यपदके अशी एकूण 6 पदके जिंकली.
उदयोन्मुख खेळाडूंपासून ते उच्च दर्जाच्या मुष्टियोद्ध्यांपर्यंत सर्वांना प्रगतीच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देणे आणि भारताच्या या यशाची घोडदौड कायम ठेवणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
***
Sonali Kulkarni / Ashutosh Save / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322995)
अभ्यागत कक्ष : 6