अर्थ मंत्रालय
गुंतवणूक आणि वित्तीय क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सिंगापूर दौरा यशस्वीरित्या संपन्न
Posted On:
12 OCT 2026 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांचा 8 ते 11 ऑक्टोबर 2026 या कालावधीतील सिंगापूरचा अधिकृत दौरा यशस्वीरित्या पार पडला. भारत आणि सिंगापूर यांच्यातील आर्थिक व वित्तीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या दौऱ्यात उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा तसेच जागतिक गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आणि उद्योगक्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींसोबत बैठका झाल्या.
या दौऱ्यादरम्यान सीतारामन यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थरमन षण्मुगरत्नम आणि पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि व्यापार व उद्योगमंत्री गण किम योंग आणि परराष्ट्रमंत्री डॉ. विवियन बालकृष्णन यांच्याशी चर्चा केली.



या बैठकांमध्ये चौथ्या भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने विविध संधींवर चर्चा करण्यात आली.
याशिवाय, भारत-आसियान सहकार्य अधिक बळकट करणे आणि प्रादेशिक आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. 2027 मध्ये सिंगापूरकडे येणाऱ्या आसियानच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर या सहकार्याला विशेष महत्त्व असल्याचे अधोरेखित झाले.
सीतारामन यांनी प्रमुख संस्थात्मक गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आणि जागतिक कंपन्यांच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकाही घेतल्या. यामध्ये मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप (MUFG), सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC), वेलिंग्टन मॅनेजमेंट, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, जीआयसी (सिंगापूर सरकारची गुंतवणूक संस्था), डीबीएस बँक, स्कँडिनेव्हिस्का एन्स्किल्डा बँकेन (SEB), टेमासेक, टीपीजी, एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स, कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट, इंटेल, ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट (BII), आयएचएच हेल्थकेअर आणि बी कॅपिटल यांसारख्या प्रमुख संस्थांचा समावेश होता.
या वित्तीय संस्था आणि जागतिक कंपन्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाने भारतातील ग्राहक बाजारपेठ, स्टार्टअप्स, वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक), प्रगत तंत्रज्ञान (डीप-टेक) आणि आरोग्यसेवा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी विशेष स्वारस्य व्यक्त केले.
या बैठकांमध्ये पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांतील गुंतवणूक आणि वित्तपुरवठ्याच्या संधींचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधा, विशेषतः सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर्स, भारताच्या ऊर्जा संक्रमणासाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अक्षय ऊर्जा, उत्पादन क्षेत्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), व्यापार वित्तपुरवठा, वित्तीय सेवा, अन्नपुरवठा साखळी आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या इतर क्षेत्रांचा समावेश होता.
विमान भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय (एअरक्राफ्ट लीजिंग), ट्रेझरी सेंटर्सची स्थापना आणि भारताच्या वित्तीय बाजारपेठांमध्ये जागतिक गुंतवणूकदारांचा अधिक सहभाग वाढवण्याच्या संधींबाबतही चर्चा करण्यात आली.
उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चांमध्ये भारतात वेगाने विस्तारत असलेल्या सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधींचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत गुंतवणूक, कुशल मनुष्यबळाचा विकास, उद्योगांशी संलग्न प्रशिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील कौशल्यविकास उपक्रम, तसेच बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयांचा समावेश होता.
याशिवाय, अक्षय ऊर्जा, विद्युत वाहनांची वाहतूक व्यवस्था (इलेक्ट्रिक मोबिलिटी), विमानांची देखभाल, दुरुस्ती व दुरुस्तीनंतरची तांत्रिक तपासणी (MRO), अन्नसुरक्षा व अन्नप्रक्रिया उद्योग, शाश्वत वित्तपुरवठा आणि आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांबाबतही चर्चा झाली.
शैलेश पाटील/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322565)
अभ्यागत कक्ष : 4