सांस्कृतिक मंत्रालय
नवी दिल्लीतील 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' येथे आज 'ब्रिक्स नाट्य महोत्सव 2026' ला प्रारंभ
या महोत्सवाच्या निमित्ताने नऊ ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांच्या वैविध्यपूर्ण नाट्य परंपरा एकत्र पहायला मिळणार
Posted On:
12 OCT 2026 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
'सामायिक कथा, सामायिक भविष्य' अशी संकल्पना असलेल्या 'ब्रिक्स नाट्य महोत्सव 2026' ला आज नवी दिल्लीतील 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' (NSD) येथे प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ब्रिक्स देशांच्या विविध नाट्य परंपरा, समकालीन सादरीकरण पद्धती आणि सामायिक सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडेल. भारताच्या 2026 च्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आयोजित हा महोत्सव 12 ते 14 ऑक्टोबर 2026 दरम्यान होत आहे. यामध्ये ब्रिक्सचे नऊ सदस्य आणि भागीदार देशांमधील नाट्यकर्मी, अभ्यासक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक प्रतिनिधी एकत्र येणार आहेत.

नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी समाप्तीनंतर, भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखालील हा महोत्सव आणखी एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम ठरला आहे. यात भारत, थायलंड, इंडोनेशिया, रशिया, इराण, व्हिएतनाम, दक्षिण आफ्रिका, कझाकस्तान आणि इथिओपिया या देशांचा सहभाग आहे. या महोत्सवाने नाट्यकलेच्या सामायिक माध्यमातून कलात्मक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

या उद्घाटन समारंभाला भारत सरकारचे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभाला भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल; परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (आर्थिक संबंध) आणि 2026 साठी भारताचे 'ब्रिक्स शेरपा' सुधाकर दलेला; तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी हे उपस्थित होते. तसेच या उद्घाटन सोहळ्याला सहभागी देशांचे राजदूत आणि मिशन प्रमुख देखील उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले: “आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा काळात आज आपण एकत्र आलो आहोत. अशा वेळी आपण एकत्र आलो आहोत, जेव्हा राष्ट्रांना परस्परविरोधी हितसंबंधांमध्ये समन्वय साधणे अधिकाधिक आवश्यक झाले आहे, तेव्हा परस्पर सामंजस्य आणि विधायक संवादासाठीची जागा पूर्वीपेक्षा अधिक मौल्यवान झाली आहे.”

“ज्याप्रमाणे राजनैतिक संबंध राष्ट्रांना वाटाघाटी करण्यास सक्षम करतात आणि आर्थिक सहकार्य त्यांना समृद्ध होण्यास मदत करते, त्याचप्रमाणे संस्कृती समाजांना एकमेकांना समजून घेण्यास सक्षम बनवते. संस्कृती राजकीय सीमांच्या पलीकडे जाणारे संबंध निर्माण करते. आपला इतिहास, भाषा आणि परंपरा भिन्न असल्या तरी, याच विश्वासामुळे ब्रिक्स नाट्य महोत्सवाला केवळ सादरीकरण कलेच्या पलीकडे विशेष महत्त्व प्राप्त होते,” असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
महोत्सवाच्या उद्घाटन दिनी आसिफ अली लिखित 'समुद्र मंथन' हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाची संकल्पना, दिग्दर्शन आणि संगीताची धुरा एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांनी वाहिली. हे नाटक एनएसडी परिसरातील अभिमान सभागृहात सादर करण्यात आले.
महोत्सवातील नाट्यप्रयोग नवी दिल्लीतील विविध ठिकाणी सादर केले जातील. यामध्ये एनएसडी’ची अभिमान आणि सम्मुख सभागृहे, कमानी सभागृह, एलटीजी सभागृह आणि मेघदूत थिएटर यांचा समावेश आहे. या नाट्यप्रयोगांची तिकिटे बुक-माय-शो'वर प्रति तिकीट 200 दराने उपलब्ध असतील. त्यामुळे प्रेक्षकांना नाट्य आणि सादरीकरणाच्या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
या महोत्सवात सहभागी देशांमधील राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि अग्रगण्य नाट्य संस्था सहभागी होत आहेत. रशियाचे प्रतिनिधित्व दोन नाट्यगट करत आहेत. भारत दोन नाट्यप्रयोग सादर करणार आहे, तर इतर सहभागी देश आपल्या विविध भाषा, सांस्कृतिक दृष्टिकोन, नाट्यपरंपरा आणि समकालीन सर्जनशील अभिव्यक्ती दर्शविणाऱ्या कलाकृती सादर करतील. महोत्सवाच्या निवडक कार्यक्रमात अभिजात, समकालीन आणि प्रायोगिक नाटकांसह नाट्यकलेच्या विविध शैलींचा समावेश आहे.
भारताने 2026 साठी ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले असून, ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी’ (Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability) ही यंदाच्या अध्यक्षपदाची संकल्पना आहे. या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी लोककेंद्रित दृष्टिकोनाला प्राधान्य देण्यात आले आहे.
या अध्यक्षपदाच्या अंतर्गत, ब्रिक्सच्या सांस्कृतिक कार्यप्रवाहात सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांमधील सहकार्य, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता विकसित करण्यासह शाश्वत विकासाला चालना देण्यात संस्कृतीची भूमिका या बाबींना प्राधान्य दिले जात आहे. नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून जिवंत रंगमंचीय सादरीकरणांद्वारे कलात्मक देवाणघेवाण, सांस्कृतिक संवाद आणि लोकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ केले जात असून, हा महोत्सव ब्रिक्सच्या या प्राधान्यक्रमांना पूरक ठरत आहे.
कलात्मक सहभाग आणि व्यावसायिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रत्येक नाट्यप्रयोगानंतरच्या सकाळी दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या सहभागातून संवादात्मक कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. कलात्मक दृष्टिकोन, सादरीकरणाच्या परंपरा, अभिनयाच्या विविध पद्धती आणि रंगमंचीय तंत्रे या विषयांवर आधारित या सत्रांमध्ये चर्चा, प्रेक्षकांशी संवाद आणि सामूहिक उपक्रमांचा समावेश असेल. या माध्यमातून आंतरसांस्कृतिक शिक्षण, ज्ञानाची देवाणघेवाण आणि दीर्घकालीन सहकार्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
विविध कथा आणि सादरीकरणाच्या परंपरांच्या माध्यमातून, ब्रिक्स नाट्य महोत्सवाचा उद्देश प्रत्येक संस्कृतीची स्वतंत्र ओळख अधोरेखित करण्यासोबतच ब्रिक्स सदस्य देशांमधील परस्पर सामंजस्य आणि सहकार्य अधिक दृढ करणे, हा आहे.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), ही 2026 च्या ब्रिक्स नाट्य महोत्सवाच्या आयोजनासाठी नोडल संस्था म्हणून कार्यरत आहे. सहभागी देशांमधील नाट्यसंस्था आणि रंगकर्मींना एकत्र आणून, कलात्मक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सहकार्य अधिक दृढ करणे, हे या महोत्सवाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

2026 चा ब्रिक्स नाट्य महोत्सव हा केवळ उत्कृष्ट नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करणारा महोत्सव नसून, सांस्कृतिक संवाद, व्यावसायिक देवाणघेवाण आणि लोकांमधील परस्पर सहभागासाठीचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. ब्रिक्स सहकार्याच्या व्यापक उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून विविध देशांतील कथा, कलाकार आणि प्रेक्षक रंगभूमीच्या माध्यमातून एकत्र येतात. यामुळे विविध संस्कृतींमधील परस्पर सामंजस्य अधिक दृढ होण्यास मदत होते, तसेच भविष्यातील सातत्यपूर्ण सहकार्यासाठी नव्या संधी निर्माण होतात.
माधुरी पांगे/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर /वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322532)
अभ्यागत कक्ष : 5