संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस त्रिशूल ब्रिटनमधील प्लायमाऊथ येथे दाखल; कोंकण 2026 या नौदल सरावात घेणार सहभाग

Posted On: 11 OCT 2026 1:34PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाची गाईडेड मिसाइल स्टेल्थ फ्रिगेट INS त्रिशूल ब्रिटनमधील प्लायमाऊथ येथे दाखल झाली आहे. हे जहाज ब्रिटनच्या रॉयल नेव्हीसोबत होणाऱ्या   कोंकण -26 या नौदल सरावात सहभागी होणार आहे.

भारत आणि ब्रिटन यांच्यात दरवर्षी आयोजित केला जाणारा द्विपक्षीय सागरी सराव  कोंकण  -26 हा दोन्ही देशांमधील दृढ सागरी भागीदारीचा पुरावा आहे. गेल्या 2 दशकांमध्ये या सरावाची व्याप्ती आणि त्यातील काठिण्य पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या माध्यमातून दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये सागरी मोहिमांदरम्यान परस्पर समन्वय आणि सामंजस्य अधिक दृढ झाले आहे. सुरुवातीपासूनच  कोंकण  सराव हा दोन्ही नौदलांमधील सहकार्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला असून, सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी दोन्ही नौदलांची वचनबद्धता यातून अधोरेखित होते.

ब्रिटनमधील प्लायमाऊथच्या सागरी क्षेत्रात हा सराव 08 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत 2 टप्प्यांत आयोजित करण्यात येत आहे.

बंदरावरील टप्प्यात व्यावसायिक स्तरावरील विविध संवाद, एकमेकांच्या जहाजांना भेटी, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नागरिकांना जहाज पाहण्यासाठी खुले ठेवण्याचा समावेश आहे.

समुद्रातील टप्प्यात हवाई, पृष्ठभागावरील आणि पाण्याखालील अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये अतिशय अवघड स्वरुपाच्या सागरी मोहिमांचा सराव केला जाणार आहे. यामध्ये दोन्ही नौदलांच्या विमानांचे एकमेकांच्या जहाजांवर उतरण्याचे सराव, गोळीबार सराव, हवाई संरक्षण सराव, अतिशय अवघड  नौकानयन  आणि पाणबुडीविरोधी सराव यांचा समावेश असेल. यामुळे या वर्षीच्या  कोंकण  सरावाची व्याप्ती आणि अधिक वाढणार आहे.

सुरक्षित, खुले आणि मुक्त सागरी क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी भारत आणि ब्रिटन यांची सामायिक वचनबद्धता या सरावातून पुन्हा अधोरेखित होत आहे. तसेच, भारत-ब्रिटन व्हिजन 2035 मध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचेही हा सराव प्रतीक आहे.

उत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण आणि परस्पर सामंजस्य वाढवून  कोंकण  -26 हा सराव दोन्ही नौदलांची आव्हानात्मक सागरी परिस्थितीत एकत्रितपणे आणि प्रभावीपणे कार्य करण्याची क्षमता अधिक मजबूत करेल. भारतीय आणि ब्रिटिश नौदलांमधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध तसेच सागरी शांतता आणि सुरक्षिततेप्रति असलेली सामायिक बांधिलकी यांचे हा सराव प्रतीक आहे.

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321975) अभ्यागत कक्ष : 5