संरक्षण मंत्रालय
संरक्षण सचिव 12 ते 15 ऑक्टोबरदरम्यान सायप्रस आणि ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार
Posted On:
10 OCT 2026 4:08PM by PIB Mumbai
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह 12 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सायप्रस आणि ग्रीसच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांबरोबर होणाऱ्या चर्चेत सागरी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी सायप्रसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सायप्रसच्या संरक्षण मंत्रालयातील समपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, तेथील वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत. मे 2026 मध्ये सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिल्यानंतर, दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला अधिक गती मिळाली आहे. या दौऱ्यात भारत आणि सायप्रस यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ आणि व्यापक करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. विशेषतः सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या दोन्ही देशांच्या सामायिक बांधिलकीवर या दौऱ्यात भर असेल.
या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह ग्रीसमधील वरिष्ठ संरक्षण अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
ग्रीसचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री फेब्रुवारी 2026 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली होती. या उच्चस्तरीय भेटी आणि चर्चांमधून भारत आणि ग्रीस यांच्यातील संरक्षण आणि सामरिक क्षेत्रातील वाढते सहकार्य अधोरेखित होते. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात महत्त्वपूर्ण सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, युरोपीय महासंघातील भागीदार देशांबरोबर संरक्षण आणि सामरिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या भारताच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
***
शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2321843)
अभ्यागत कक्ष : 15