नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते चेन्नई इथे विंडर्जी इंडिया 2026 चे उद्घाटन, 2030 पर्यंत 100 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता विकसित करण्यासाठीचा आराखडा सादर


सप्टेंबर 2026 पर्यंत पवन ऊर्जा क्षमता 59.20 गिगावॅट इतकी झाली – प्रल्हाद जोशी

Posted On: 08 OCT 2026 3:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2026 रोजी चेन्नई येथे विंडर्जी इंडिया 2026 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन झाले.  7 ते 9 ऑक्टोबर 2026 दरम्यान झालेल्या प्रमुख जागतिक पवन ऊर्जा परिषदेचा प्रारंभ या कार्यक्रमाने झाला.

विंडर्जी इंडिया 2026 अंतर्गत जागतिक पवन ऊर्जा परिसंस्थेतील घटक एका मंचावर आले. यामध्ये 20 देशांमधून आलेले 400 प्रदर्शक, 500 शिष्टमंडळे आणि डेन्मार्क, जर्मनी व स्पेनच्या समर्पित दालनांचा समावेश होता.

या कार्यक्रमामधील आपल्या बीजभाषणात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशातील प्रचंड पवन ऊर्जा क्षमता व यातील व्यापक संधी अधोरेखित केल्या. ते म्हणाले, भारताच्या पवन ऊर्जा क्षेत्राने वेगाने प्रगती केली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये 6.05 गिगावॅट या सर्वोच्च वार्षिक क्षमतेच्या पवन ऊर्जा संचांची उभारणी करण्यात आली. आर्थिक वर्ष 2027 मध्ये वार्षिक पवन ऊर्जा संच उभारणीचा हा विक्रम मोडला जाईल असा आम्हाला विश्वास आहे. याद्वारे भारताच्या पवन ऊर्जा वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला जाईल. ही सातत्यपूर्ण प्रगती 2030 पर्यंत 100 गिगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा संचांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा पाया भक्कम करेल आणि भारताच्या पवन ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला गती देईल. 

भारताचे पवन ऊर्जा क्षेत्र शाश्वत विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत 59.20 गिगावॅट क्षमतेच्या संचांची उभारणी झाल्यामुळे भारत 2030 पर्यंत 100 गिगावॅट क्षमतेचे उद्दीष्ट पार करण्याच्या दिशेने निर्धारपूर्वक वाटचाल करत असल्याचे दिसून येते. यातून पवन ऊर्जा निर्मिती व निर्यात यात जगाचे नेतृत्व करण्यासाठीचा भक्कम आधार तयार झाला आहे. 

यावेळी  जमीन उपलब्ध करुन देणे, वेळेत परवाने देणे आणि राइट ऑफ वे (आरओडब्ल्यू) विवादांचा निपटारा याद्वारे पवन ऊर्जा क्षेत्राच्या विकासात आघाडी घेणाऱ्या विविध राज्य सरकारांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.

विंड एनर्जी 2026 या परिषदेचा अर्थपूर्ण सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि नवीन भागीदारीसाठी प्रभावीपणे उपयोग करुन घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. भारताच्या पवन ऊर्जा महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी सरकार, उद्योग क्षेत्र, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक संस्था आणि आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. एकत्रितरित्या भारत संपूर्ण पवन ऊर्जा मूल्य साखळी बळकट करू शकतो, नवोन्मेष व नियुक्ती यांना गती देऊ शकतो आणि पवन उर्जेसाठीचे आघाडीचे जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान बळकट करू शकतो.

***

शैलेश पाटील/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2321823) अभ्यागत कक्ष : 19