दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 'इंडिया मोबाईल काँग्रेस 2026' मध्ये 'एआय फॉर गुड लॅब' कार्यशाळेचे केले उद्घाटन
एआयचे खरे मोजमाप मॉडेलच्या आकाराद्वारे होणार नसून त्यामुळे सुधारलेल्या मानवी जीवनांची संख्येद्वारे होईल": केंद्रीय मंत्री सिंधिया
ग्लोबल साऊथमध्ये एआय धोरण आणि त्याचा प्रभाव यातील दरी जोडण्यासाठी भारताची आयटीयू सोबत पायलट देश म्हणून भागीदारी
Posted On:
09 OCT 2026 6:17PM by PIB Mumbai
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्ली येथील 'इंडिया मोबाईल काँग्रेस' 2026 मध्ये दळणवळण मंत्रालयाचा दूरसंचार विभाग आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयू) यांनी संयुक्तपणे आयोजित "एआय फॉर गुड लॅब वर्कशॉप: फ्रॉम स्ट्रॅटेजी टू इम्पॅक्ट" चे उद्घाटन केले. या महत्त्वाच्या प्रसंगाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) जागतिक धोरणात्मक चर्चांमधून प्रत्यक्ष अंमलबजावणी, स्थानिक उपाय आणि मानवकेंद्रित विस्ताराकडे नेण्यातील एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित केला.

"जिनेव्हा ते नवी दिल्ली असा 'एआय फॉर गुड लॅब'चा हा प्रवास कृत्रिम बुद्धिमत्तेने जागतिक चर्चांकडून स्थानिक उपायांकडे, तांत्रिक शक्यतांकडून मानवी प्रभावाकडे आणि धोरणाकडून विस्ताराकडे, स्वतः केला पाहिजे अशा प्रवासाचेच प्रतिबिंब आहे, असे उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सांगितले. एआयची महत्त्वाकांक्षा आणि एआयचा प्रभाव यातील दरी ही कौशल्ये, कॉम्प्युट, डेटा, संस्था आणि कनेक्टिव्हिटी द्वारे जोडली जाते. अंतिमतः, कृत्रिम बुद्धिमत्तेचे खरे मापदंड तिच्या मॉडेल्सचा आकार किंवा तिच्या अल्गोरिदमची जटिलता ही नसून, त्यामुळे सुधारलेल्या मानवी जीवनांची संख्या असेल, " असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या "सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय" या मार्गदर्शक तत्त्वाचा पुनरुच्चार केला. जगभरात सुमारे 2.2 अब्ज लोक अजूनही इंटरनेटपासून वंचित आहेत, हे लक्षात घेऊन तंत्रज्ञानाने डिजिटल दरीचे रुपांतर एआय दरीमध्ये होणार नाही याची खात्री करत मानवी संधींचा विस्तार केला पाहिजे, त्या एकाच ठिकाणी केंद्रित करू नयेत, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या संबोधनादरम्यान, सिंधिया यांनी 10,000 कोटींहून अधिक रुपयांच्या इंडियाएआय मिशन अंतर्गत भारताच्या देशांतर्गत एआय क्षमता आणि डिजिटल पायाभूत सुविधांना चालना देणाऱ्या महत्वपूर्ण टप्प्यांची विस्तृत माहिती दिली. संगणकीय पायाभूत सुविधांच्या आघाडीवर, जागतिक सरासरी खर्चाच्या अंदाजे एक-तृतीयांश दरात 38,000 हून अधिक उच्च क्षमतेचे जीपीयू म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स समाविष्ट करण्यात आले आहेत आणि आणखी 20,000 जीपीयू जोडले जात आहेत. ओपन डेटा आणि प्रतिभेच्या बाबतीत, एआय कोश प्लॅटफॉर्म, कृषी, आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रांमधील डेटासेट आणि सार्वभौम मॉडेल्स खुले करत आहे. एआय कौशल्य प्रसारात भारत सध्या जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर असून भारतीय डेव्हलपर्सनी गिटहब(GitHub) वरील दहा किंवा अधिक स्टार्स असलेल्या ओपन-सोर्स एआय प्रकल्पांमध्ये अंदाजे 5.2% योगदान दिले आहे.

याव्यतिरिक्त, संचार साथी सारख्या एआय आणि डेटा ॲनालिटिक्स साधनांच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रातील नवनवीन शोधांना विश्वासाची जोड दिली जात आहे. या साधनांमुळे 7.14 कोटींहून अधिक बनावट मोबाईल कनेक्शन्स खंडित करणे, 35 लाखांहून अधिक हरवलेले हँडसेट शोधणे आणि 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संभाव्य आर्थिक फसवणूक रोखणे शक्य झाले आहे. प्रमाणीकरणाला पाठिंबा देण्यासाठी, भारताच्या टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सेंटरने (टीईसी ) एआयची निष्पक्षता, मजबुती आणि घटनेची नोंद यांसारख्या बाबींचा समावेश असलेली राष्ट्रीय मानके विकसित केली आहेत, तसेच आयटीयू-टी (आयटीयू -टी) च्या जागतिक मानकांशी सुसंगत राहण्यासाठी एआय प्रमाणीकरणावर एक राष्ट्रीय कार्यगट स्थापन केला आहे.

या सत्रांमध्ये संस्थात्मक सहभाग, प्राधान्य क्षेत्रांमधील तैनाती आणि ग्लोबल साउथमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी एक ठोस आराखडा निश्चित करण्यावर विधायक चर्चा झाली. शेवटच्या नागरिकापर्यंत उपाययोजना पोहोचवण्यापूर्वी निष्पक्षता, मजबुती आणि सुरक्षितता यांची पडताळणी करून प्रयोगांना पाठिंबा देण्यासाठी एआय सँडबॉक्सच्या आवश्यकतांबाबत भागधारकांमध्ये एक सामायिक समज निर्माण झाली.
***
सोनाली काकडे/शैलेश पाटील/सुषमा काणे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2321666)
अभ्यागत कक्ष : 14