वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि निर्बंध वाढत होते, तेव्हा भारताने संवाद, विश्वास आणि व्यापाराचे पूल बांधायला सुरुवात केली: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल


1 ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्याचा आणि 7 टक्क्यांहून अधिक वृद्धीदर कायम राखण्याचा भारताला विश्वास : पीयूष गोयल

Posted On: 08 OCT 2026 2:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत 31 व्या सीआयआय पार्टनरशिप समिटच्या पूर्वावलोकन बैठकीला  संबोधित केले. ते म्हणाले, “जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि  निर्बंध वाढत होते, तेव्हा भारताने संवाद, विश्वास आणि व्यापाराचे पूल बांधायला सुरुवात केली.” त्यांनी नमूद केले की भारताने गेल्या वर्षी 863 अब्ज डॉलर्सची निर्यात नोंदवली आणि चालू वर्षात 1 ट्रिलियन डॉलर्सची निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ 2.5 ते  3  टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, आणि जागतिक अर्थव्यवस्था धक्क्यांसाठी असुरक्षित आहे आणि जागतिक वृद्धीदर 3 टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत ही निर्यात जवळपास 16  टक्के वाढ दर्शवते.

गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की भारत 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करेल. त्यांनी नमूद केले की हे उद्दिष्ट केवळ सरकारनेच नाही, तर भारतातील जनता आणि उद्योगांनी निश्चित केले आहे, ज्यामध्ये 63 दशलक्ष एमएसएमई, मोठे व लघु उद्योग, जागतिक क्षमता केंद्रे आणि सुमारे 250,000 स्टार्टअप्सचा समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या पूर्वावलोकन बैठकीला केंद्रीय मंत्र्यांबरोबरच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. ही 'पार्टनरशिप समिट' 12  आणि 13  नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे आयोजित केली जाणार आहे.

या परिषदेत विविध देशांना सहभागी होण्याचे आवाहन करताना गोयल म्हणाले की हा कार्यक्रम 'भारताच्या विकासगाथेकडे विकास, संधी आणि भागीदारीच्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी उपलब्ध करून देईल.

यावेळी गोयल यांनी  सरकारप्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25  वर्षे पूर्ण केल्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्याचाही उल्लेख केला, जो  7 ऑक्टोबर 2001  रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झाला आणि 26  मे 2014 पासून भारताचे पंतप्रधान म्हणून अविरतपणे सुरू आहे.

देशाला खऱ्या अर्थाने एक शक्तिशाली राष्ट्र बनवणे, देशाचे प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त करून देणे आणि 2047 सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या अखंड सेवाकार्याचे आणि निष्कलंक कारकीर्दीचे मुख्य ध्येय होते, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2047 सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाच्या माध्यमातून  140 कोटी भारतीयांची सामूहिक वचनबद्धतेला पुढे नेत आहेत. देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक बालकाची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करणे, हाच या मोहिमेचा उद्देश आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले होते. तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर लोकांची सेवा कशी करता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवले, असे गोयल म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हाच गेल्या 25 वर्षांतील पंतप्रधानांच्या कामकाजाचा मुख्य आधार आणि कणा राहिला आहे, असे त्यांनी सांगितले.

देशाने केलेले सर्व मुक्त व्यापार करार तसेच इतर करारांअंतर्गत देशातील संवेदनशील क्षेत्रांचे पूर्णतः रक्षण केले असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याअंतर्गत विशेषतः भारतीय शेती, मच्छीमार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या हिताचे रक्षण केले गेले आहे. त्याच वेळी, या करारांमुळे कृषी उत्पादने, सागरी उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी बनवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीसाठी नव्या संधी उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या करारांमुळे परकीय देशांना आणि कंपन्यांना भारतात येऊन गुंतवणूक करण्याची संधी मिळू लागली आहे, तसेच जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेच्या विकासात सहभागी होता येत आहे, ही बाब त्यांनी नमूद केली.

सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार 4 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतका आहे. 2047 सालापर्यंत 30 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचण्याची क्षमता देशाच्या अर्थव्यवस्थेत आहे असे ते म्हणाले. देशाचा युवा वर्ग आणि इथली लोकसंख्या महत्त्वाकांक्षी आहे, यासोबतच स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी उत्तम जीवनमान साध्य करण्याची लोकांची इच्छा आहे, या बाबींवरही त्यांनी विशेष भर दिला.


माधुरी पांगे/सुषमा काणे /तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2320923) अभ्यागत कक्ष : 4