पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
Pre-COP31 मध्ये अनुकूलन, शमन आणि अंमलबजावणीची साधने यांकडे समप्रमाणात लक्ष देण्याचे भारताचे आवाहन
ऑस्ट्रेलिया, फिजी आणि तुवालू यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होत असलेल्या UNFCCC च्या Pre-COP31 बैठकांमध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ सहभागी
Posted On:
06 OCT 2026 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026
फिजी येथे नेत्यांच्या पूर्ण सत्राला आज संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी COP31 च्या दिशेने वाटचाल करत असताना अनुकूलन, शमन आणि अंमलबजावणीच्या साधनांवर समप्रमाणात लक्ष देण्याचे आवाहन केले.

विविध देशांमध्ये अर्थपूर्ण आणि शाश्वत हवामान कृतीसाठी समानता आणि सामायिक परंतु भिन्न जबाबदाऱ्या व संबंधित क्षमता (CBDR-RC) या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला .
हवामान कृतीसाठी 'सर्वांसाठी एकच उपाय' (one-size-fits-all) असा दृष्टिकोन असू शकत नाही यावर यादव यांनी भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की, त्या-त्या क्षेत्रातील उद्भवणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी स्थानिक अभ्यास आणि मूल्यमापन अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपायांमुळेच, आवश्यक असलेले शमन व अनुकूलन उपाय आणि त्यासाठी लागणारी संसाधने कोणती असावीत, हे स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भारताला आपल्या विशाल समुद्रकिनाऱ्यामुळे आणि बेटांमुळे पॅसिफिक द्वीपसमूह देशांसमोरील आव्हानांची पूर्ण जाणीव आहे. भारताने आपल्या प्रमुख संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सागरी विज्ञानाच्या क्षेत्रात व्यापक ज्ञान-आधार आणि नैपुण्य विकसित केल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताने किनारपट्टीच्या असुरक्षिततेचे मूल्यांकन, किनारपट्टी बदलांचे नकाशे तयार करणे, सागरी प्रादेशिक योजनांचा विकास, किनारपट्टीच्या भागांसाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना आणि नील अर्थव्यवस्थेची क्षमता विकसित करणे यांबाबतीत ज्ञान आणि कौशल्य विकसित केले आहे असे यादव यांनी अधोरेखित केले. भारत किनारपट्टीचे निरीक्षण, पूरस्थितीचे मूल्यांकन, चक्रीवादळ आणि तीव्र हवामानाचा पूर्व-इशारा, तसेच हवामान-जोखीम मूल्यांकनासाठी आपली अवकाश परिसंस्था, पृथ्वी-निरीक्षण क्षमता आणि अवकाश-आधारित अनुप्रयोगांचा वापर करत आहे असे ते म्हणाले. हे ज्ञान आणि कौशल्य आपल्या पॅसिफिक भागीदारांसोबत सामायिक करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
भारत आपल्या पॅसिफिक भागीदारांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे आणि आरोग्य व कल्याण, नवीकरणीय ऊर्जा, लवचिक पायाभूत सुविधा, पूर्व-इशारा यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान, कृषी व क्षमता निर्मिती यांसारख्या क्षेत्रांत त्यांच्याबरोबर काम करत आहे असे ते म्हणाले.

'प्री-कॉप'(Pre-COP) ही संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक हवामान बदल परिषदेपूर्वी काही आठवडे आयोजित केली जाणारी एक पूर्वतयारी बैठक आहे; जी या वर्षी नोव्हेंबरमध्ये तुर्कीमधील अंताल्या येथे होणार आहे.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319846)
अभ्यागत कक्ष : 14