वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरणाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 OCT 2026 4:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आज वाहतूक आणि लॉजिस्टिक्सच्या व्यापक क्षेत्रांतर्गत संशोधन, नियोजन, मूल्यांकन, देखरेख आणि प्रभाव मूल्यांकन अधिक मजबूत करण्यासाठी एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण (आयटीएलए) नावाच्या विशेष  हेतू संस्थेच्या  स्थापनेला मंजुरी दिली.

विविध वाहतूक-संबंधित मंत्रालये आणि संस्थांमधील विखंडित नियोजन आणि अंमलबजावणीमुळे निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन आव्हानांना सामोरे जाण्याचा या मंजुरीचा उद्देश आहे. एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण अधिक समन्वय आणि बहु-मार्गी एकात्मतेला चालना देऊन, भारतातील वाहतूक संबंधी पायाभूत सुविधांच्या विकासाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि परिणामकारकता वाढवेल अशी अपेक्षा आहे.

आयटीएलए ची प्रमुख भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील:

  • राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था: एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स नियोजन, संशोधन, प्रकल्पांचे मूल्यमापन व देखरेख, धोरणात्मक सहाय्य आणि डेटा ॲनालिटिक्स (माहितीचे विश्लेषण) यांसाठी आयटीएलए ही सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करेल.
  • दीर्घकालीन राष्ट्रीय वाहतूक बृहत आराखडा : आयटीएलए दहा किंवा त्याहून अधिक वर्षांच्या नियोजनाचा कालावधी असलेला  एक सर्वसमावेशक 'राष्ट्रीय वाहतूक बृहत आराखडा  तयार करेल; यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदरे व जहाजबांधणी, नागरी विमान वाहतूक, अंतर्गत जलमार्ग, किनारपट्टीवरील जहाजवाहतूक, शहरी गतिशीलता आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांचा समावेश असेल.
  • एकात्मिक नियोजन आराखडा: 'राष्ट्रीय वाहतूक बृहत आराखडा 'समवेत सुसंगतता व समन्वय सुनिश्चित करण्यासाठी आणि मल्टिमोडल  पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी, आयटीएलए  परिवहन मंत्रालयांच्या अल्पकालीन क्षेत्रीय योजना (सुमारे 5 वर्षांच्या) आणि वार्षिक योजनांचे मूल्यांकन करेल.
  • प्रमुख प्रकल्पांचे तांत्रिक मूल्यांकन: 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च असलेल्या केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे तांत्रिक मूल्यांकन आयटीएलए करेल.  आर्थिक मूल्यांकन मात्र विद्यमान आर्थिक मूल्यांकन यंत्रणांद्वारेच सुरु राहील.
  • देखरेख आणि प्रभाव मूल्यांकन : आयटीएलए  500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल, समस्या निवारणासाठी एक समन्वित यंत्रणा प्रदान करेल  आणि या प्रकल्पांच्या अंमलबजावणी पश्चात परिणामांचे मूल्यमापन करेल.
  • राष्ट्रीय परिवहन डेटा भांडार (NTDR): आयटीएलए  उदा. GSTN ई-वे बिल, FASTag, वाहन, GPS-आधारित प्रणाली, शहरी वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि इतर संबंधित डेटाबेससह  विविध स्रोतांकडून वाहतूक आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित डेटा संच मिळवून एक एकत्रित परिवहन डेटा भांडार तयार करेल. तसेच, नियोजन, देखरेख आणि प्रभावाच्या मूल्यांकनासाठी डेटा विश्लेषण (उदा.फ्रेट फ्लो /O-D विश्लेषण) करेल.
  • राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण (2022) चा आढावा आणि अद्ययावतीकरणासाठी सल्ला आणि सहाय्य करणे.
  • लॉजिस्टिक्स क्षेत्रात क्षमता निर्मिती , प्रशिक्षण आणि कौशल्य विकास
  • वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांमध्ये संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे.

आयटीएलएची स्थापना मल्टिमोडल वाहतूक व्यवस्था मजबूत करून, पायाभूत सुविधांची कार्यक्षमता सुधारून, लॉजिस्टिक्स खर्च कमी करून आणि भारताची जागतिक लॉजिस्टिक्स स्पर्धात्मकता वाढवून भारताचे व्हिजन 2047 साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आयटीएलए संशोधन, नियोजन, बिग डेटा एकत्रीकरण, प्रकल्प देखरेख आणि मूल्यमापन यासाठी संस्थात्मक क्षमता निर्माण करेल, तसेच क्षमता बांधणी आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन  देईल.

निलिमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319592) अभ्यागत कक्ष : 6