रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चिंतन शिबीर 2026 चे उद्घाटन, भविष्यासाठी सज्ज महामार्ग पायाभूत सुविधांसाठी कार्यसूची केली निश्चित
गतिशक्तीने 'प्रगति' हे दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे मार्गदर्शक सूत्र; एकात्मिक नियोजन, सुरक्षित आणि हरित महामार्ग,रस्ते सुरक्षा, टोल सुधारणा आणि गुणवत्तापूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेवर भर
Posted On:
05 OCT 2026 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,5 ऑक्टोबर 2026
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुजरात येथे एकता नगर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, टेंट सिटी 2 इथे “चिंतन शिबीर 2026 – महामार्ग पायाभूत सुविधांवरील राष्ट्रीय परिषद”चे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्याने भारताच्या महामार्ग पायाभूत सुविधा मजबूत करण्याबाबतच्या दोन दिवसांच्या विशेष विचारमंथनाला दिशा मिळाली. “गतिशक्तीने प्रगति” या ब्रीदवाक्याखाली आयोजित या चिंतन शिबिरात महामार्ग विकास, प्रकल्प अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांच्या वितरणाशी संबंधित मुख्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यांचे वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अंमलबजावणी संस्था आणि इतर हितधारक एकत्र आले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनीही या उद्घाटन सत्रात आपले विचार व्यक्त केले.

चिंतन शिबीर केंद्र आणि राज्यांसाठी एकत्र विचार करण्यासाठी, प्रत्यक्ष कार्यस्थळावरील अनुभव सामायिक करण्यासाठी आणि महामार्ग विकासातील उदयोन्मुख आव्हानांवर व्यावहारिक उपाययोजनांसंदर्भात एकत्र काम करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करत आहे, असे उद्घाटन सत्राला संबोधित करताना गडकरी यांनी सांगितले. देशभरातील प्रकल्प अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांचे परिणाम सुधारण्यासाठी विविध राज्यांनी स्वीकारलेल्या यशस्वी पद्धती सामायिक केल्या पाहिजेत, त्यांचे मूल्यांकन केले पाहिजे आणि जिथे योग्य असेल तिथे त्यांची पुनरावृत्ती केली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

महामार्ग विकास हा गुणवत्ता, सुरक्षा, गती आणि जागतिक दर्जाच्या मानकांवर केंद्रित राहिला पाहिजे,याकडे गडकरींनी लक्ष वेधले. त्यांनी योग्य सर्वेक्षणे, अलाइनमेंट नियोजन, भूसंपादन, उपयुक्तता स्थलांतर आणि वेळेवर वैधानिक मंजुऱ्यांसह सविस्तर प्रकल्प अहवाल देण्याच्या टप्प्यावर पूर्व नियोजन आणि पूर्वतयारीवर अधिक भर देण्याचेही आवाहन केले. सुरुवातीच्या टप्प्यात उत्तम पूर्वतयारी केल्याने विलंब कमी होण्यास, खर्चातील वाढ टाळण्यास आणि महामार्ग प्रकल्पांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.

रस्ते सुरक्षेचा समावेश महामार्ग नियोजन आणि प्रकल्प आराखड्यात सुरुवातीपासूनच केला पाहिजे, असे गडकरी यांनी अधोरेखित केले. नियोजन आणि बांधकामाच्या टप्प्यादरम्यान अपघातप्रवण ठिकाणे लक्षात घेतल्यामुळे आणि योग्य सुरक्षा उपायांचा समावेश केल्याने सुरक्षित महामार्ग निर्माण होण्यास आणि रस्ते अपघात कमी करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गडकरी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीमधील महामार्ग विषयक पायाभूत सुविधांचे महत्त्वही अधोरेखित केले. आधुनिक महामार्गांच्या माध्यमातून शहरे, गावे, बंदरे, बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रांदरम्यान सुरळीत दळणवळण जोडणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अशा अद्ययावत जोडणीमुळे व्यापार, गुंतवणूक, रोजगार आणि एकूणच आर्थिक घडामोडीना पाठबळ मिळते असे ते म्हणाले. देशाच्या विकासाच्या वाढीसाठी तसेच वाहतुक व्यवस्थेच्या गरजांनुसार योग्य वेळेत पायाभूत सुविधांची उभारणी होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्र सरकार, राज्ये सरकारे आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.


या दोन दिवसीय चिंतन शिबिरात महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित सत्रे होणार आहेत. या सत्रांच्या माध्यमातून अंमलबजावणी प्रक्रियेतील आव्हानांवर उपाययोजना, सर्वोत्तम कार्यपद्धतींचे आदानप्रदान करणे तसेच अधिक कार्यक्षम महामार्ग विकसित करण्यासाठी व्यवहार्य आणि अनुकरण करता येईल अशा स्वरुपाच्या उपाययोजनांच्या शक्यता तपासणे हा या सत्रांचा मुख्य उद्देश आहे.

गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच बांधकाम आणि देखभाल खर्च कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, नवोन्मेषी बांधकाम पद्धती आणि किफायतशीर साहित्याचा व्यापक वापर करायला पाहिज असे आवाहनही गडकरी यांनी केले. राज्ये आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी नवोन्मेषी तसेच त्या त्या क्षेत्राना अनुसरून आखलेल्या उपाययोजना परस्परांसोबत सामायिक कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. महामार्गांचे बांधकाम आणि देखभालीमध्ये संशोधन आणि तंत्रज्ञानांचा अंतर्भाव असावा, यासोबतच सातत्यपूर्ण सुधारणाही कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले.

शाश्वतता आणि पर्यावरणीय जबाबदारी हा या चिंतन शिबिरातील कार्यक्रमपत्रिकेचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. याच अनुषंगाने पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी योग्य पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा अवलंब करण्यासोबतच नवोन्मेषी तसेच पुनर्वापर केलेल्या साहित्याचा अधिक वापर करण्यावर भर देण्याची गरजही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. याच संदर्भाने या उद्घाटन सत्रादरम्यान पर्यावरण आणि वन्यजीवांच्या बाबतीत होणारे नुकसान कमी करण्याच्या उपाययोजना या विषयावरील दस्तावेजाचे प्रकाशनही करण्यात आले.

यावेळी नितीन गडकरी यांनी महामार्ग प्रवासाची कार्यक्षमता आणि सुलभता सुधारण्याच्या उद्देशाने केलेल्या तंत्रज्ञानाधारित सुधारणांची माहिती दिली. यानिमित्ताने त्यांनी फास्टॅग वार्षिक पास तसेच मल्टी-लेन फ्री फ्लो सारख्या उपाययोजनांची माहिती दिली.
या क्षेत्रातील सर्व भागधारकांनी अधिक सुरक्षित, उच्च दर्जाच्या आणि भविष्यासाठी सज्ज महामार्ग पायाभूत सुविधांच्या उभारणीकरता एकत्रितपणे काम करावे आणि याद्वारे विकसित भारताचा संकल्प साकार करण्यात योगदान द्यावे असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.
निलिमा चितळे/शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319150)
अभ्यागत कक्ष : 8