लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली


केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर मान्यवरांनीही महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना वाहिली आदरांजली

‘आपल्या नेत्यांचा परिचय’ या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना लोकसभा अध्यक्षांनी केले मार्गदर्शन

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे आयुष्य आणि आदर्श यातून प्रेरणा घेण्याचे लोकसभा अध्यक्षांचे युवकांना आवाहन

युवकांनी आपल्या आयुष्यात सत्य, अहिंसा, साधेपणा, शिस्त आणि कठोर कर्तव्यनिष्ठा यांचा अंगीकार करुन विकसित भारत घडवावा

नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात, देशभरातून आलेल्या 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना केले अभिवादन

Posted On: 02 OCT 2026 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार नितीन नबीन, खासदार, माजी खासदार  आणि इतर मान्यवरांनी आज त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करत, अभिवादन केले. लोकसभा सचिवालयाचे महासचिव, उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनीही दोन्ही नेत्यांना पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले.

यावेळी, ‘आपल्या नेत्यांचा परिचय’ या कार्यक्रमांतर्गत, संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात देशाच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी युवकांना महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातून, आदर्शांतून आणि सार्वजनिक सेवेच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच, आपल्या आयुष्यात, दृढनिश्चय, शिस्त आणि जबाबदारीची भावना  अशा गुणांचा अंगीकार करत विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याचेही आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमासाठी आलेल्या युवकांचे स्वागत करत लोकसभा अध्यक्ष म्हणाले की,  ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात त्यांची उपस्थिती ही भारताच्या लोकशाही आणि संवैधानिक वारशाशी स्वतःला जोडण्याची एक संधी आहे. महात्मा गांधी यांच्या जीवनातून सत्य, नैतिकता, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या सामर्थ्याची प्रचिती येते, असेही बिर्ला यावेळी म्हणाले.  ज्या काळात जगातील बहुतांश भाग वसाहतवादी राजवटीखाली होता, त्या काळात सत्य आणि अहिंसेवर आधारित चळवळ स्वातंत्र्याच्या लढ्याला दिशा देऊ शकते, हे महात्मा गांधींनी दाखवून दिले. त्यांच्या याच विचारांनी आणि तत्त्वज्ञानाने नंतर जगभरातील स्वातंत्र्य आणि न्यायाच्या चळवळींना प्रेरणा दिली. महात्मा गांधींच्या शिकवणीचा उल्लेख करताना त्यांनी युवकांना त्यांचे जीवन आणि विचारांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. त्यांच्या जीवनाचा आणि तत्त्वज्ञानाचा जितका अधिक सखोल अभ्यास केला जाईल, तितकीच प्रतिकूल परिस्थिती आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठीची  अंत:प्रेरणा, धैर्य आणि नवा दृष्टिकोन मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साध्या साध्या साधनांच्या माध्यमातूनही लोकांच्या जीवनात आणि मनात दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणता येते, हीच शिकवण आपल्याला महात्मा गांधींच्या आयुष्यातून मिळते, असे त्यांनी सांगितले. आत्मपरीक्षण, शिस्त, चिकाटी आणि ध्येयाप्रती दृढनिश्चय  ही त्यांच्या जीवनकार्याची अविभाज्य वैशिष्ट्ये होती आणि आजच्या युवकांसाठीही ती तितकीच प्रासंगिक आहेत, असे बिर्ला यावेळी म्हणाले. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा उल्लेख करताना बिर्ला यांनी त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा, उच्च आदर्श, कर्तव्यभावना आणि निर्णय घेण्यातील ठामपणा अधोरेखित केला. त्यांनी शास्त्रीजींच्या `जय जवान, जय किसान` या  एका आव्हानात्मक काळात देशाला दिशा देणाऱ्या आणि राष्ट्रीय तसेच अन्न सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या  प्रेरणादायी घोषणेची आठवण करून दिली. ते म्हणाले की, आजच्या युवकांकडे तंत्रज्ञान, ज्ञान आणि प्रचंड संसाधने उपलब्ध असली तरी केवळ या गोष्टींमुळे उद्दिष्टे साध्य होण्याची खात्री मिळत नाही. संयम, नैतिक आचरण, शिस्त, दृढनिश्चय आणि प्रयत्नांमधील सातत्य हे देखील तितकेच आवश्यक आहे. त्यांनी युवकांना आपल्या ध्येयावर ठाम राहण्याचे आणि निराशा, थकवा किंवा अपयशांमुळे आपला संकल्प कमकुवत होऊ न देण्याचे आवाहन केले. त्यांनी नमूद केले की, सामाजिक जबाबदारी ही युवकांच्या वाटचालीच्या केंद्रस्थानी असली पाहिजे आणि त्यांचे उद्दिष्ट केवळ वैयक्तिक यश मिळवणे हे नसून देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये योगदान देणे हे देखील असले पाहिजे. त्यांनी आपल्या ज्ञानाचा, ऊर्जेचा आणि क्षमतेचा वापर एका नवीन आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी आणि नेतृत्वासाठी करण्याचे आवाहन युवकांना केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना बिर्ला यांनी उपस्थितांना या कार्यक्रमाचा संदेश आणि प्रेरणा त्यांच्या शाळांमध्ये, समुदायांमध्ये आणि ते जिथे कुठे जातील तिथे घेऊन जाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, त्यांनी या ऐतिहासिक संविधान सभेच्या सभागृहातून नवीन प्रेरणा, ऊर्जा आणि आत्मविश्वासाने आणि आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी तसेच राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी एका नवीन वचनबद्धतेसह बाहेर पडले पाहिजे.

देशाच्या विविध भागांतून आलेल्या 500 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि ऐतिहासिक संविधान सभा सभागृहात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना वाहण्यात आलेल्या पुष्पांजली आदरांजलीचे ते साक्षीदार झाले. निवडलेल्या 36 तरुण स्पर्धकांनी या दोन्ही राष्ट्रीय नेत्यांचे जीवन, आदर्श, विचार आणि योगदान यावर आपले विचार मांडले, तसेच त्यांचे जीवन भारत आणि जगभरातील पिढ्यांना कसे प्रेरित करत आहे याबद्दलचे आपले आकलन सामायिक केले.

तत्पूर्वी सकाळी लोकसभा अध्यक्षांनी राजघाट आणि विजय घाट येथे जाऊन अनुक्रमे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली.

***

शैलेश पाटील/राधिका अघोर/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2318469) अभ्यागत कक्ष : 7