रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
दिव्यांगजन आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना त्यांच्या वाहनांसाठी मोफत फास्टॅग देण्याच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा
पात्र दिव्यांग व्यक्तींसाठी हायवे टोल प्रक्रिया अधिक सोपी आणि सुटसुटीत करणे, हा नवीन नियमांचा उद्देश
Posted On:
01 OCT 2026 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2026
नागरिकांचे राहणीमान सुलभ करण्यासाठी आणि दिव्यांगांना/ पीडब्लूडी अर्थात शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना टोलशी संबंधित प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी पात्र दिव्यांगजन लाभार्थ्यांसाठीच्या सवलतीतल्या फास्टॅगच्या वाटप आणि नूतनीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केंद्र सरकारने सुधारणा केली आहे. या सुधारित नियमावलीचा उद्देश पात्र दिव्यांगजन वाहनांसाठी सवलत असलेला फास्टॅग जारी करणे आणि त्याचे नूतनीकरण करण्यामध्ये अधिक एकसमानता आणणे हा आहे त्यामुळे वारंवार करावी लागणारी कागदपत्रांची औपचारिकता कमी होतील. हे नवीन मार्गदर्शक नियम 2 ऑक्टोबर 2026 पासून लागू होतील.
या नियमांनुसार, शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांच्या वापरासाठी खास डिझाइनने तयार केलेल्या वाहनांना, तसेच दिव्यांगजन या मालकी प्रकाराखाली नोंदणीकृत असलेल्या वाहनांना, वैध दिव्यांगत्व प्रमाणपत्र, युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी (यूडीआयडी) कार्ड किंवा इतर लागू असलेल्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेल्या दिव्यंगत्वाच्या टक्केवारीच्या आधारावर सवलत असलेला फास्टॅग जारी दिला जाईल.
पूर्वीच्या मार्गदर्शक नियमांनुसार दिव्यांगजनांसाठी सवलत असलेल्या फास्टॅगचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक होते. मात्र, नवीन मार्गदर्शक नियमांनुसार, सवलत असलेल्या फास्टॅगची वैधता आता नोंदवलेल्या दिव्यंगत्वाच्या टक्केवारीवर ठरवली जाईल. 70% ते 100% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना जारी केलेला फास्टॅग 5 वर्षांसाठी वैध असेल, तर 40% ते 70% पेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना जारी केलेला फास्टॅग 3 वर्षांसाठी वैध असेल. राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 च्या तरतुदींचे पालन आणि पात्रता कायम असण्याच्या अटीवर, या मुदतीनंतर सवलत असलेल्या फास्टॅग चे नूतनीकरण केले जाऊ शकते.
या सुधारित तरतुदींचा उद्देश राष्ट्रीय महामार्ग टोल प्रणाली पात्र दिव्यांगजन लाभार्थ्यांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि वापरण्यास सोपी बनवणे हा आहे; तसेच टोल सवलती या ठरवून दिलेल्या नियमांनुसार आणि पात्रतेच्या गरजांनुसारच दिल्या जातील याची हमी हा देखील या सुधारित तरतुदींचा हेतू आहे.
* * *
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2317907)
अभ्यागत कक्ष : 5