कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
यूपीएससी शताब्दी महोत्सव ‘मंथन’: भविष्यासाठी सज्ज अशा नागरी सेवा, नवोन्मेष आणि घटनात्मक मूल्यांवर भर
Posted On:
30 SEP 2026 8:53PM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आपल्या संस्थात्मक प्रवासाची 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज नवी दिल्ली भारत मंडपम इथे ‘मंथन’ या दोन दिवसांच्या शताब्दी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि प्रख्यात वक्ते सहभागी झाले आहेत. नागरी सेवांची बदलती भूमिका, सार्वजनिक प्रशासनातील नवकल्पना आणि लोकसेवेचा आधार असलेल्या संस्थात्मक मूल्यांवर या वेळी सखोल विचारमंथन करण्यात येत आहे.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना, यूपीएससीचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी विश्वास, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान या तीन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे आयोगाच्या पुढील टप्प्यातील प्रवासाचा दृष्टिकोन मांडला. आपल्या घटनात्मक भूमिकेसाठी मूलभूत असलेली तत्त्वे जपत, संस्थांनी बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
डॉ. अजय कुमार म्हणाले की, जे कायमस्वरूपी जपायचे आहे, त्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते बदल आयोगाने स्वीकारले पाहिजेत. तंत्रज्ञान आणि परीक्षा पद्धती काळानुसार बदलू शकतात; मात्र गुणवत्ता, निष्पक्षता आणि समान संधी ही मूलभूत घटनात्मक तत्त्वे कायमस्वरूपी राहिली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षांनी आयोगाच्या कामाची व्याप्ती आणि विविधता अधोरेखित केली. यूपीएससी दरवर्षी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रांपासून ते अर्थशास्त्र व संरक्षण क्षेत्रापर्यंतच्या विविध विषयांचा समावेश असणाऱ्या सुमारे 250 वेगवेगळ्या भर्ती प्रक्रिया राबवते, असे त्यांनी सांगितले. भरती प्रक्रियेसाठी लागणारे व्यापक नियोजन स्पष्ट करताना, त्यांनी हेदेखील अधोरेखित केले की यूपीएससीचे परीक्षा वेळापत्रक 18 महिने आधीच तयार केले जाते.
भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना डॉ. अजय कुमार यांनी भर्ती व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची रूपरेषा मांडली. यामध्ये राज्य लोकसेवा आयोगांसोबत सहकार्य वाढवण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धतींची आदानप्रदान सुलभ करण्यासाठी 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (उत्कृष्टता केंद्र) स्थापन करण्याच्या प्रस्तावित योजनेचा समावेश आहे. याशिवाय, 100 महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णयांचा संग्रह तयार करण्यासाठी 'नालसार' (NALSAR), हैदराबादसोबत केलेल्या भागीदारीचाही त्यांनी उल्लेख केला.
परीक्षा सुधारणांबाबतही अध्यक्षांनी भाष्य केले. उमेदवारांनी पाठ केलेले किंवा कोचिंगद्वारे तयार केलेले मॉडेल उत्तरे जशीच्या तशी लिहिण्याऐवजी, त्यांची तर्कक्षमता, उत्स्फूर्त विचार करण्याची क्षमता आणि संदिग्ध परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याच्या गुणांचे मूल्यमापन करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. तसेच, परीक्षेची पारदर्शकता व सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी डिजिटल ई-प्रवेशपत्र आणि फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळखण्याची प्रणाली) यांचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शताब्दी विचारमंथन सत्रांच्या पहिल्या सत्राचे आयोजन “विकसित भारतात नागरी सेवांची भूमिका” या विषयावर करण्यात आले. यूपीएससीच्या सदस्य सुमन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हे सत्र झाले. या सत्रात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस. राजा सुब्रमणी, राज्यसभा खासदार आणि माजी परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन शृंगला तसेच उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष संजय श्रीनेत सहभागी झाले.
दुसऱ्या सत्रात मुख्य भाषण करताना पंतप्रधानांचे प्रधान सचिव-2 शक्तिकांत दास यांनी यूपीएससीला “लोकसेवेचे प्रवेशद्वार” असे संबोधत, निवड प्रक्रियेत सचोटी, निष्पक्षता यांप्रती आयोगाच्या अखंड निष्ठेचे कौतुक केले. सरकारने सुरू केलेल्या प्रमुख प्रशासकीय उपक्रम आणि नवकल्पनांवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच विकसित भारताच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठीच्या धोरणात्मक मार्गदर्शनाची रूपरेषाही त्यांनी मांडली.
***
राधिका अघोर/सोनाली काकडे/आशुतोष/वैभवी जोशी/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317382)
अभ्यागत कक्ष : 8