पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यटन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर भारत आणि इटलीचे एकमत

Posted On: 29 SEP 2026 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2026

 

पर्यटन विषयक भारत-इटली संयुक्त कार्यगटाची दुसरी बैठक 29 सप्टेंबर 2026 रोजी झाली. पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार आणि इटलीच्या पर्यटन मंत्रालयाच्या महासचिव इमॅन्युएला त्रिपी यांच्या सह-अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

या बैठकीला भारताच्या वतीने पर्यटन मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, रोममधील भारतीय दूतावास आणि भारतीय टूर ऑपरेटर्स संघटना अर्थात आयएटीओचे प्रतिनिधी उपस्थित होते. इटलीच्या शिष्टमंडळात पर्यटन मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालय, नवी दिल्लीतील इटलीचा दूतावास आणि इटालियन नॅशनल टुरिझम बोर्ड अर्थात ईएनआयटीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

दोन्ही देशांमधील पर्यटन क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पर्यटनविषयक आकडेवारीची देवाणघेवाण, अल्प परिचित पर्यटनस्थळांचा प्रचार, चित्रपट पर्यटन, पर्यटनस्थळांमधील भागीदारी, कौशल्यविकास आणि क्षमता वृद्धी, तसेच व्यवसाय सहकार्य अधिक वाढवणे, यांचा समावेश होता.

बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, सहकार्याच्या निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये पुढील काम करण्यासाठी दोन्ही देश विशेष तांत्रिक गट स्थापन करणार आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे संबंधित संस्था आणि भागधारकांमध्ये सातत्याने समन्वय साधता येईल.

प्रस्तावित भारत-इटली सांस्कृतिक आणि पर्यटन वर्ष 2027 च्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक देवाणघेवाण वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. पर्यटन क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींचाही आढावा घेण्यात आला. पर्यटन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील सरकारी संस्था आणि पर्यटन उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि इटली कटिबद्ध असल्याचे संयुक्त कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

 

* * *

शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316716) अभ्यागत कक्ष : 7