संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिंदी महासागर क्षेत्रात भारत फर्स्ट रिस्पॉन्डर अर्थात आपत्कालीन परिस्थितीत सर्वात आधी प्रतिसाद देणारा, पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून खंबीरपणे उभा आहे : राजनाथ सिंह

Posted On: 29 SEP 2026 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2026

 

हिंदी महासागर क्षेत्रात भारत फर्स्ट रिस्पॉन्डर अर्थात आपत्कालीन परिस्थितीत सर्वात आधी प्रतिसाद देणारा, पसंतीचा सुरक्षा भागीदार तसेच ज्यावर अवलंबून राहता येईल अशा विश्वासार्हतेचे प्रतीक म्हणून खंबीरपणे उभा आहे. या क्षेत्रात आपल्या धोरणात्मक स्थान आणि धोरणात्मक जबाबदारीचा विस्तार होत असल्याचे जग पाहत आहे. आजच्या काळात सागरी क्षेत्रातील वाढती वर्दळ, दिशाभूल करण्याचे वाढते प्रयत्न आणि ग्रे झोन अर्थात संशयास्पद घटनांसारख्या घडामोडींमुळे आपले सागरी क्षेत्र पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक जटील बनले आहे. त्यामुळे आपल्याला आपली देखरेख आणि प्रतिसाद यंत्रणा एका नव्या उंचीवर  नेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. नवी दिल्लीतील नौसेना भवन इथे आज दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर परिषद 2026 च्या दुसऱ्या पर्वाला राजनाथ सिंह यांनी संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय युद्धनौकांचे अस्तित्व आता दक्षिण चीन सागर, भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागरापर्यंत विस्तारले असून, यातून आपल्या ब्लू वॉटर फोर्स अर्थात सागरी क्षेत्रातील सामर्थ्याचे म्हणजे नौदलाच्या क्षमतेची प्रचिती येते असे ते म्हणाले. देशाची धोरणात्मक व्याप्ती आणि प्रादेशिक क्षमतेची  जगाला प्रचिती येईल याची सुनिश्चिती करण्यात भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने नौदलाने केलेले प्रयत्नही त्यांनी अधोरेखित केले. भारतीय नौदलाची युद्धनौका निर्मिती परिसंस्था आता जागतिक मानकांची पूर्तता करू लागली असल्याची बाब त्यांनी नमूद केली. अलीकडेच नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या युद्धनौकांमध्ये 75 टक्क्यापेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आहे. आगामी काळात आपल्याला केवळ आपल्याच गरजा पूर्ण करण्यासोबतच मित्र राष्ट्रांनाही युद्धनौकांची निर्यात करायची आहे असे त्यांनी सांगितले.

सागरी क्षेत्रातील विद्यमान यंत्रणांचे महत्त्वही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. देशाच्या सागरी देखरेख व्यवस्थेत (Maritime Surveillance Architecture) मोठ्या अद्ययावतीकरणाची गरज त्यांनी अधोरेखित केली. सागरी क्षेत्रातून वाहतुकीचे वाढत असलेले प्रमाण आणि गुंतागुंत लक्षात घेऊन, विश्लेषणात्मक क्षमता विस्तारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

ऑल रँक्स, ऑल रोल (सर्व पदे, सर्व भूमिका) या दृष्टिकोनाअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण, भरती आणि नवोन्मेषासाठी नौदलाने केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली. नौदलाने आघाडीवर कार्यरत असलेल्या युद्धनौकांवर आणि विमानांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. नाविका सागर परिक्रमा या सागरी सफरीसह नौदलाच्या विविध नौकानयन मोहिमांमधील महिलांच्या सहभागाचेही त्यांनी कौतुक केले.

या परिषदेदरम्यान राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि लष्कर प्रमुखांशीही संवाद साधला. 29 सप्टेंबर 2026 ते 1 ऑक्टोबर 2026 या कालावधीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कार्यान्वयीन सज्जता, सागरी सुरक्षा आणि भविष्यातील क्षमता विकासाचा आढावा घेण्यासाठी भारतीय नौदलाचे सर्वोच्च नेतृत्व एकत्र आले आहे.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316581) अभ्यागत कक्ष : 10