संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय सशस्त्र सेनांचे पथक 'काजिंद-2026' या संयुक्त सैनिक सरावासाठी रवाना

Posted On: 28 SEP 2026 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयोजित 'काजिंद' (KAZIND) या भारत-कझाकस्तान संयुक्त लष्करी सरावाच्या नवव्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांचे 60 सदस्यांचे पथक आज कझाकस्तान मधील ओस्केमेन येथे रवाना झाले. भारतीय पथकात मुख्यत्वे गढवाल रायफल्सच्या एका बटालियनसह इतर दले आणि सेवांचे सैनिक, तसेच भारतीय हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे. कझाकस्तानच्या सशस्त्र दलांकडूनही प्रामुख्याने त्यांच्या भूदलाचे तेवढ्याच क्षमतेचे पथक या सरावात सहभागी होणार आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आदेशानुसार, दहशतवादविरोधी संयुक्त कारवाया करण्यासाठी दोन्ही दलांची परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि त्यांची संयुक्त क्षमता अधिक मजबूत करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

निम-शहरी आणि डोंगराळ भागात दहशतवादविरोधी संयुक्त कारवायांवर 'काजिंद-2026' या सरावाचा मुख्य भर असेल. यामध्ये संयुक्त नियोजन व त्याची अंमलबजावणी, हवाई गतिशीलता, मानवरहित हवाई प्रणाली आणि ड्रोनविरोधी यंत्रणेचा एकत्रित वापर या बाबींना विशेष प्राधान्य दिले जाईल. या सरावात सहभागी होणारी पथके दहशतवादी कारवायांना संयुक्तपणे प्रत्युत्तर देणे, छापे टाकणे, शोधून नष्ट करण्याची मोहीम, वेढा घालून शोध घेणे, हेलिपॅड व लँडिंग साइट्स सुरक्षित करणे, आणि विशेष हेलिकॉप्टर-आधारित मोहिमा यांसारख्या विविध युद्धकौशल्यांचे एकत्र प्रशिक्षण घेतील.

या सरावाअंतर्गत नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी सुलभ व्हावी, यासाठी 'संयुक्त कमांड पोस्ट' तसेच माहिती व देखरेख केंद्र स्थापन केले जाईल. या प्रशिक्षणाचा शेवट एका सर्वसमावेशक मूल्यांकन सरावाने होईल; ज्यामध्ये दोन्ही दले काल्पनिक दहशतवादी धोक्याविरुद्ध आधी सराव केलेल्या रणनीती, तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींचा संयुक्तपणे वापर करतील.

'काजिंद-2026' हा सराव दोन्ही देशांना एकमेकांच्या युद्धकौशल्याचा आणि लष्करी अनुभवाचा लाभ घेण्याची संधी देईल, तसेच यामुळे दोन्ही सैन्यांमधील व्यावसायिक संबंध, परस्पर विश्वास आणि बंधुभाव अधिक दृढ होईल. हा सराव भारत आणि कझाकस्तानमधील लष्करी सहकार्य आणखी मजबूत करेल आणि प्रादेशिक शांतता, स्थैर्य व सामूहिक सुरक्षेसाठी दोन्ही राष्ट्रांची असलेली कटिबद्धता अधिक अधोरेखित करेल. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316294) अभ्यागत कक्ष : 11