संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाच्या सह्याद्री आणि कुलिश या जहाजांचा 'एडीएमएम-प्लस' सागरी सुरक्षा संयुक्त सहकार्य उपक्रमात सहभाग

Posted On: 27 SEP 2026 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

 

भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका  ‘आयएनएस सह्याद्री’ आणि क्षेपणास्त्र सज्ज कॉर्व्हेट ‘आयएनएस कुलिश’ यांनी फिलीपिन्स येथील सुबिक बे येथे आयोजित 23 व्या ‘एडीएमएम-प्लस’ एक्सपर्ट्स वर्किंग ग्रुप ऑन मेरिटाइम सिक्युरिटी जॉइंट कोऑपरेशन अॅक्टिव्हिटी’ (EWG-MS JCA) मधील आपला सहभाग यशस्वीरीत्या पूर्ण केला. 25 सप्टेंबर 2026 रोजी पार पडलेल्या सांगता समारंभत हा उपक्रम पूर्ण झाला.

हा कार्यक्रम 21 सप्टेंबर 2026 रोजी सबिक येथील 'नेव्हल ऑपरेटिंग बेस' वर पार पडलेल्या उद्घाटन समारंभाने सुरू झाला. फिलीपीन नौदलाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सह–अध्यक्षपद जपानने भूषवले. या उपक्रमाच्या 'हार्बर फेज'मध्ये (बंदर टप्प्यात) शांतता आणि सुरक्षा, आसियान नौदल प्रमुख बैठका आणि गाईडलाइन्स फॉर मेरिटाइम इंटरॅक्शन (ANCM-GMI), वरिष्ठ भरती झालेले अधिकारी  आणि सागरी पर्यावरण संरक्षण या विषयांवर विषय तज्ज्ञांचे वैचारिक आदानप्रदान झाले. यासोबतच विविध क्रीडा स्पर्धा, तसेच आंतरराष्ट्रीय दिन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

22 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय नौदलाच्या सैनिकांनी 'ऑपरेशनल सिंक्रोनायझेशन' (लष्करी समन्वय) आणि 'टेबलटॉप एक्सरसाइज' (तांत्रिक चर्चा व युद्धाभ्यास) मध्ये सहभाग घेतला. यानंतर सागरी टप्प्याचे योग्य नियोजन व समन्वय साधण्यासाठी 'प्री-सेल कॉन्फरन्स' (समुद्र प्रवासापूर्वीची बैठक) पार पडली. याचदरम्यान झांबलेस येथील 'शेफर्ड्स ऑफ द हिल सेंटर'मध्ये एका सामाजिक उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

या युद्धाभ्यासाच्या सागरी टप्प्यात शोध व बचाव कार्य, जललेखन सर्वेक्षण, रुग्ण व वैद्यकीय आपत्कालीन सुटका, डेक लँडिंग पात्रता आणि अडचणीत अडकलेल्या नौकांना मदत करणे यांसारख्या विविध समन्वयी उपक्रमांचा समावेश होता. या सर्व हालचालींमुळे समुद्रातील प्रत्यक्ष कारवायांदरम्यान परस्पर समन्वय आणि एकत्र काम करण्याची क्षमता अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली.

  

'ईडब्ल्यूजी-एमएस जेसीए'च्या यशस्वी आयोजनाने सागरी सहकार्य दृढ करण्यासाठी व्यावसायिक देवाणघेवाण आणि बहुपक्षीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले. यातील भारताचा सहभाग हा 'ॲक्ट ईस्ट पॉलिसी' आणि 'महासागर' (MAHASAGAR - Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या संकल्पनेला अनुसरून प्रादेशिक भागीदारी मजबूत करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा  पुनरुच्चार करतो.

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315626) अभ्यागत कक्ष : 8