नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जहाजांसाठी हरित इंधनाचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या भारतातील पहिल्या बंदर-आधारित इ-मिथेनॉल उत्पादन प्रकल्पाची सुरुवात

Posted On: 26 SEP 2026 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2026

 

हरित ऊर्जेचा निर्यातदार देश बनण्याच्या दिशेने भारताने आज एक मोठे पाऊल उचलले. गुजरातमधील गांधीधाम येथील कांडला मधील दीनदयाळ पोर्ट अथॉरिटी (DPA) येथे देशातील पहिल्या बंदर-आधारित इ-मिथेनॉल (e-methanol) प्रकल्पाची पायाभरणी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली.

दररोज 150 टन उत्पादन क्षमता असलेला हा प्रकल्प इ-मिथेनॉलच्या निर्मितीसाठी अक्षय ऊर्जा, पाणी आणि बायोजेनिक CO2 (जैविक कार्बन डायऑक्साइड) चा वापर करेल. हे इ-मिथेनॉल एक हरित इंधन असून, ते जहाजांद्वारे होणाऱ्या अधिक स्वच्छ व प्रदूषणमुक्त वाहतुकीस सक्षम करेल. तसेच, जगातील सर्वात व्यस्त व्यापार मार्गांपैकी एक असलेल्या आशिया-युरोप आंतरराष्ट्रीय व्यापार महामार्गावरून ये-जा करणाऱ्या जहाजांना या इंधनाचा पुरवठा केला जाईल. हा प्रकल्प भारताला जागतिक सागरी वाहतूक क्षेत्रासाठी हरित इंधनाचा निर्यातदार देश म्हणून तसेच हरित इंधनाचे उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये स्थान निर्माण करून देईल. जगभरातील 1,300 अमेरिकन डॉलर प्रति टन या दराच्या तुलनेत हा प्रकल्प अवघ्या 750 अमेरिकन डॉलर प्रति टन या अत्यंत स्पर्धात्मक दरात हरित मेथॅनॉलची निर्मिती करेल.

हा प्रकल्प 2070 पर्यंत 'निव्वळ शून्य' (Net Zero) कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेला पाठबळ देतो. तसेच, ऊर्जा क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत' या पंतप्रधानांच्या ध्येयाला आणि 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेच्या अंमलबजावणीला गती देणारा ठरेल. भारताच्या सागरी क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. केंद्र सरकारचे येत्या पाच वर्षांत देशाच्या व्यापारी जहाजांच्या ताफ्यात 100 नवीन जहाजांची भर घालण्याचे नियोजन असून, 2047 सालापर्यंत भारताला जगातील अव्वल पाच जहाजांची मालकी असणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे.

   

   

   

 

* * *

माधुरी पांगे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315436) अभ्यागत कक्ष : 6