जलशक्ती मंत्रालय
हवामान-अनुकूल जलव्यवस्थापन आणि शाश्वत जलसेवा या विषयावर आधारित '9 व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026' ची सांगता.
हवामान-अनुकूल आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी सामूहिक कृतीची गरज सी. आर. पाटील यांनी आयआयडब्ल्यूडब्ल्यू 2026 मध्ये केली व्यक्त
आयआयडब्ल्यूडब्ल्यू 2026 द्वारे जागतिक जल समुदायांना एकत्र आणून नवोन्मेष, ज्ञान आणि शाश्वत (WASH- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य-स्वच्छता) उपाययोजनांमध्ये प्रगती करण्याबाबत विचारमंथन
Posted On:
25 SEP 2026 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप समारंभाने '9 व्या इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक (आयआयडब्लूडब्लू) 2026' ची आज सांगता झाली. दि. 22 ते 25 सप्टेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या "हवामान-अनुकूल जल व्यवस्थापन" या विषयावर आधारित कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी एकत्र जमलेले धोरणकर्ते, सरकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था, विकास भागीदार, संशोधक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी, जल क्षेत्रातील व्यावसायिक, नवोन्मेषक आणि तरुण व्यावसायिकांनी जलसुरक्षेपुढे निर्माण होत असलेली नवी आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यांवर विचारमंथन केले.

उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी, जलसंधारणात लोकसहभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष जमिनीस्तरावर वापर, तसेच आंतरराष्ट्रीय आणि संस्थात्मक सहकार्य दृढ करणे हे तीन मुद्दे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. 2019 मध्ये 'जल जीवन मिशन' सुरू झाल्यापासून त्याचा झालेला परिणाम विशद करताना ते म्हणाले की, घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण समुदायांचे आरोग्य, प्रतिष्ठा आणि जीवनमान उंचावण्यास मदत झाली असून पाणी आणण्यासाठी खर्च होणारा महिलांचा वेळ आणि कष्टही वाचले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) केलेल्या एका पाहणीचा संदर्भ देत ते म्हणाले, या मिशनअंतर्गत पिण्यास सुरक्षित पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे बालमृत्यूंना लक्षणीय प्रमाणात आळा घालण्याची आणि असुरक्षित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याविषयक समस्यांमुळे पडणारा भार कमी करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. 'जल जीवन मिशन'च्या (जेजेएम) पुढील टप्प्यात पुरेसा, नियमित, सुरक्षित आणि शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्याबरोबरच यापुढेही हे लाभ मिळत रहावेत यासाठी समुदाय सहभाग, जलस्रोतांची शाश्वतता आणि योग्य तंत्रज्ञान या घटकांना प्राधान्य देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

समारोप समारंभात बोलताना, जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी, सुरक्षित आणि खात्रीशीर पिण्याचे पाणी, स्वच्छता, स्वच्छ परिसर आणि सांडपाण्याचे प्रभावी व्यवस्थापन यांद्वारे जीवनमानाचा दर्जा सुधारणे हा जलसुरक्षेचा मूळ अर्थ असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'जल जीवन मिशन'मुळे झालेले परिवर्तन स्पष्ट करताना त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या सेवा आता यापुढे सुरक्षित, योग्य, नियमित आणि शाश्वत असतील हे सुनिश्चित करण्याची गरज स्पष्ट केली.

या कार्यक्रमात बोलताना जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी जलसंपदा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याबरोबरच त्यांचा प्रभावी वापर होण्याची आवश्यकता विशेषत्वाने स्पष्ट केली; तसेच, या क्षेत्रातील गुंतवणुकीचा परिणाम अंतिमतः नागरिक, कृषी, अर्थव्यवस्था आणि परिसंस्था यांना दिसून येण्याजोग्या फायद्यांच्या रुपाने दिसून येणे गरजेचे आहे, यावरही त्यांनी भर दिला.

पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित भारत-आफ्रिका ‘WASH’ गोलमेज परिषदेत आफ्रिकेतील 22 देशांचे राजदूत, उच्चायुक्त तसेच वरिष्ठ राजनैतिक प्रतिनिधी सहभागी झाले. याशिवाय विविध विकास भागीदार आणि ‘WASH’ क्षेत्रातील संबंधित भागधारकांनीही परिषदेत सहभाग घेतला.

या गोलमेज परिषदेत क्षमता विकास, पाणी गुणवत्तेवर देखरेख, डिजिटल व्यासपीठे, समुदायाच्या नेतृत्वाखालील उपक्रम, हवामान बदलाला तोंड देण्यास सक्षम पायाभूत सुविधा तसेच अंमलबजावणीतील अनुभवांची देवाणघेवाण यांसारख्या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या संधींचा आढावा घेण्यात आला.
तरुण तांत्रिक व्यावसायिकांचा सहभाग हे या परिषदेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.
समारोपाच्या सत्रात भारतासमोरील बदलत्या जलविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे, स्थानिक समुदाय, वैज्ञानिक संस्था, विकास भागीदार आणि खासगी क्षेत्र यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. IIWW 2026 मधील चर्चांमधून भारताची जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पुराव्यांवर आधारित नियोजन, तंत्रज्ञानातील नवोन्मेष, संस्थात्मक क्षमता बळकट करणे, हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी आणि समुदायाचा सक्रिय सहभाग या बाबींची आवश्यकता स्पष्ट झाली.

भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाच्या नवव्या पर्वाची सांगता चार दिवसीय व्यासपीठातून समोर आलेले ज्ञान, भागीदारी आणि उपाययोजना पुढे नेण्याच्या तसेच जलसुरक्षा, शाश्वत जलसेवा आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास सक्षम समुदायांच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न अधिक बळकट करण्याच्या संकल्पाने झाली.
समारोप समारंभात विविध महत्त्वपूर्ण प्रकाशने, अहवाल, कार्यपद्धतीविषयक प्रोटोकॉल तसेच क्षमता-वृद्धीसाठीची प्रशिक्षण मॉड्यूल्स प्रकाशित करण्यात आली.

9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 ची सांगता जलव्यवस्थापनाचे भवितव्य घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि प्रभावी प्रशासन पद्धतींवर विशेष भर देत झाली.
***
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2315187)
अभ्यागत कक्ष : 8