कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मध्ये महिलाशक्तीने  वेधले लक्ष;विविध कौशल्य क्षेत्रांत 14 युवती 'टीम इंडिया'चे करत आहेत प्रतिनिधित्व 


रासायनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्सपासून ते  आतिथ्य, ब्युटी आणि बेकरीपर्यंतच्या क्षेत्रांत महिला स्पर्धकांनी घडवले भारताच्या विस्तारणाऱ्या कौशल्य क्षेत्राचे दर्शन

Posted On: 25 SEP 2026 5:38PM by PIB Mumbai

 

'वर्ल्डस्किल्स शांघाय 2026' या जागतिक व्यासपीठावर विविध कौशल्य प्रकारांमध्ये 14 तरुणी 'टीम इंडिया'चे प्रतिनिधित्व करत असल्याने विविध व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्य क्षेत्रांमध्ये भारतीय महिलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून आले आहे

या महिला स्पर्धक शांघाय येथे 22 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत होत असलेल्या 48 व्या 'वर्ल्डस्किल्स' स्पर्धेत 63 विविध कौशल्य प्रकारांमध्ये सहभागी होत असलेल्या 70 सदस्यांच्या भारताच्या पथकाचा भाग आहेत.

विशेष म्हणजे, तांत्रिक, विशिष्ट विषयात निष्णात (स्पेशलाईज्ड), सर्जनशील आणि सेवा-केंद्रित अशा विविध प्रकारच्या कौशल्यांच्या क्षेत्रात महिला स्पर्धक भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.

या स्पर्धेत विविध प्रकारच्या कौशल्यातील सहभागाची व्याप्ती पाहता तरुण महिलांना व्यवसायांचे वाढते पर्याय उपलब्ध होत असल्याचे आणि करिअरच्या पारंपरिक रुळलेल्या पायवाटांच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रांतील कौशल्यांमध्ये त्यांचे अस्तित्व वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

'वर्ल्डस्किल्स इंडिया'च्या अधिकृत प्रतिनिधी आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागार, मनीषा सेनशर्मा म्हणाल्या, "वर्ल्डस्किल्स शांघायमधील या तरुणींचा सहभाग भारतातील कौशल्य विकासाच्या क्षेत्रातील उत्साहवर्धक बदलाचे द्योतक आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, त्या ज्या विविध क्षेत्रांतील स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत त्यामध्ये रासायनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि व्हिज्युअल मर्चेंडायझिंगपासून ते आतिथ्य, सौंदर्यसेवा आणि विशेष हस्तकला अशा विविध प्रकारच्या कौशल्यांचा समावेश आहे. कौशल्य ही स्त्री-पुरूष अशा कोणाची मक्तेदारी नसते, हा साधा पण प्रभावी संदेश यातून स्पष्ट होतो. तरुणींना त्यांचा नैसर्गिक कल आणि आकांक्षांनुसार करिअर निवडण्याची संधी, प्रशिक्षण आणि आत्मविश्वास मिळावा तसेच त्यांना जागतिक दर्जाच्या सर्वोच्च स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."

तरुण महिला तांत्रिक, सर्जनशील, आरोग्यसेवा, लॉजिस्टिक्स, आदरातिथ्य आणि सेवा यांसारख्या क्षेत्रांमधील करिअरच्या वाढत्या संधी आजमावत असल्याचे पाहता त्यांचा हा सहभाग भारताच्या कौशल्य विकास परिसंस्थेची क्षितिजे विस्तारत असल्याचे दर्शवितो

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारी (अप्रेंटिसशिप) आणि उद्योगांशी निगडित प्रशिक्षण यामध्ये महिलांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे; त्याचबरोबर, व्यवसायाचे व्यापक पर्याय आणि शाश्वत उपजीविकेचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी देखील मंत्रालयाकडून पाठबळ दिले जात आहे.

शांघाय येथे सुरू असलेली स्पर्धा जसजशी पुढच्या टप्प्यात जात आहे, तसतसा या नव्या पिढीतील तरुण महिलांचा कौशल्ये, तंत्रज्ञान, कारागिरी आणि व्यावसायिक नैपुण्य यांच्या जोरावर करिअर घडवण्याबाबतचा आत्मविश्वास अधिकाधिक प्रकर्षाने प्रकट होत आहे.

***

निलिमा चितळे/मंजिरी गानू/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2315137) अभ्यागत कक्ष : 13