आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एफएसएसएआयकडून केवळ दूधापासून तयार केलेल्या ‘पनीर’लाच मान्यता देण्यासाठी मसुदा दुरुस्तीचा प्रस्ताव

Posted On: 24 SEP 2026 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध) विनियम, 2011 मध्ये दुरुस्ती करण्याचा मसुदा प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित दुरुस्तीचा उद्देश ‘पनीर’ म्हणून ॲनालॉग उत्पादनांचे उत्पादन करणे  आणि विक्री प्रतिबंधित करणे, तसेच अशा उत्पादनांचे स्वरूप आणि घटक याबाबत ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, हे सुनिश्चित करणे हा आहे.

प्रस्तावित अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध) दुरुस्ती विनियम, 2026 अंतर्गत विद्यमान विनियमांमधील, विनियम 2.1.1 मध्ये नवीन खंड समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. या नव्या तरतुदीत ‘दुधाव्यतिरिक्त इतर घटकांपासून तयार केलेल्या पनीर’ चा विशेषतः समावेश करण्यात येणार आहे.

प्रस्तावित दुरुस्तीनुसार, ‘दुग्धजन्य पदार्थांच्या संदर्भातील ॲनालॉग’ या श्रेणीअंतर्गत यापूर्वीच परवाना मिळालेले किंवा नोंदणीकृत असलेल्या उत्पादनांच्या नामकरण, लेबलिंग किंवा विपणनासाठी ‘पनीर’ हा शब्द वापरणे बंद करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

प्रस्तावित दुरुस्तीचा उद्देश अन्नपदार्थांचे नामकरण आणि सादरीकरण त्यांच्या स्वरूप व घटकांशी सुसंगत असल्याची खात्री करणे हा आहे. यामुळे ग्राहकांना उत्पादनाबाबत अचूक माहिती मिळून माहितीपूर्ण निवड करणे शक्य होईल.

हे अधिसूचित करण्यात आलेले नियम मसुदा स्वरूपातील असल्याने, एफएसएसएआयने संबंधित भागधारक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून या मसुद्याबाबत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. अधिसूचना असलेल्या राजपत्राच्या प्रती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्याच्या तारखेपासून 60 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून या मसुदा विनियमांबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

हरकती किंवा सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी, एफडीए भवन, कोटला रोड, नवी दिल्ली – 110002 यांच्याकडे पाठविता येतील. तसेच, अधिसूचनेत नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावरही हरकती किंवा सूचना सादर करता येतील.

एफएसएसएआयने अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006 मधील तरतुदींनुसार केंद्र सरकारच्या पूर्वमान्यतेने ही प्रस्तावित दुरुस्ती जारी केली आहे. अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध) विनियम प्रथम 2011 मध्ये अधिसूचित करण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

अधिसूचनेचे अधिकृत राजपत्र खालील दुव्यावर उपलब्ध आहे: https://egazette.gov.in/WriteReadData/2026/276430.pdf

 

* * *

सुवर्णा बेडेकर/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314636) अभ्यागत कक्ष : 7