रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
अतिवेगवान राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉरच्या विकासात तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वतता वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
Posted On:
24 SEP 2026 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2026
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) द्रुतगती महामार्गांव्यतिरिक्त इतर हाय स्पीड ॲक्सेस कंट्रोल्ड म्हणजेच अतिवेगवान नियंत्रित प्रवेश असलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे नियोजन आणि डिझाइनसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. देशात जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विकसित करण्याच्या दिशेने ही मार्गदर्शक तत्वे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. हे अतिवेगवान राष्ट्रीय महामार्ग अधिक चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले तसेच नियोजनबद्ध, सुरक्षित, अधिक हरित आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने सक्षम असतील याची सुनिश्चिती करणे हे या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमागचे उद्दिष्ट आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे आगामी सर्व चार आणि सहा पदरी हरितक्षेत्रीय तसेच पूर्व विकसित क्षेत्रीय (ब्राऊनफिल्ड) ‘हाय स्पीड ॲक्सेस कंट्रोल्ड’ राष्ट्रीय महामार्गांना लागू असणार आहेत.
भविष्यातील वाहतुकीसाठी माहितीसाठा आधारित नियोजन
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्वसमावेशक वाहतूक विषयक मूल्यांकन आणि भविष्यातील गरजांना अनुसरून नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. यानुसार वाहतुकीशी संबंधित अंदाज मांडताना, सध्याची आणि इतर मार्गांवरील वळवलेली वाहतूक, तसेच आर्थिक आणि व्यावसायिक उपक्रमांशी जोडलेल्या मालवाहतुकीतील अपेक्षित वाढ विचारात घेतली जाणार आहे.
तंत्रज्ञानावर आधारित बांधकाम
गुणवत्ता, अचूकता आणि देखरेखीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी हाय स्पीड राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामादरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाणार आहे. त्याअनुषंगाने या मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्यावतीने लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तटबंदी तसेच महामार्गाच्या पृष्ठभागाच्या बांधकामासाठी स्वयंचलित आणि ‘इंटेलिजेंट मशिन एडेड कन्सट्रक्शन’ अर्थात कृत्रिम बुद्धमत्तेवर चालणा-या बांधकाम यंत्रांचे तंत्रज्ञान वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नियोजनाच्या टप्प्यापासूनच लँडस्केपिंग आणि पर्यावरणीय उपाययोजना
याअंतर्गत अशा महामार्गांच्या आखणीत ‘लँडस्केपिंग’ म्हणजे भूदृष्याचे नियोजन आणि वृक्षारोपण हा प्रकल्पातील नियोजनाचा एक अविभाज्य भाग म्हणून अंतर्भूत केला जाणार आहे. त्याअनुषंगानेच स्थानिक हवामान, भूप्रदेशाची भौगोलिक रचना आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन वळणमार्ग क्षेत्र, उड्डाणपुलांखालील जागा, दुभाजक आणि इतर योग्य ठिकाणी जमीन वापराचे पर्यावरणीय नियोजन तसेच वृक्षारोपणाचे नियोजन केले जाणार आहे.
उत्कृष्ट सांडपाणी निचरा आणि जल व्यवस्थापन
या मार्गदर्शक तत्वांअंतर्गत सर्वसमावेशक सांडपाणी निचरा नियोजन, हा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR - Detailed Project Report) प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या नियोजनात पावसाच्या पाण्याचा कुठे निचरा केला जाईल तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि सभोवतालच्या परिसरातील पाण्याचे सुरक्षित व्यवस्थापन कसे केले जाईल याची निश्चिती केली जाणार आहे. पावसाच्या पाण्याला नैसर्गिक निचरा नसलेल्या वळणमार्ग क्षेत्रात आणि इतर योग्य ठिकाणी जलसंधारण विषयक उपाययोजनांअंर्गतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
याअंतर्गत जल व्यवस्थापनासाठी रस्त्याखालून जाणारा मार्ग, उड्डाणपूल, सखल मध्यवर्ती दूभाजक आणि इतर सुविधांलगत विशेष व्यवस्था केली जाईल. यामुळे पाणी साचणे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.
ही मार्गदर्शक तत्त्वे देशभरात अधिक सुरक्षित, अधिक शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या अतिवेगवान राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉरच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी ठरणार आहेत.
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314534)
अभ्यागत कक्ष : 12