अर्थ मंत्रालय
सीमापार सोने तस्करीविरूध्द महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई;बांग्लादेशातून तस्करी केलेले 17 कोटी रुपये मूल्याचे सुमारे 12 किलो परदेशी सोने जप्त
Posted On:
23 SEP 2026 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
सीमापार अवैध तस्करीविरुद्धची आपली मोहीम पुढे सुरु ठेवत, महसूल गुप्तचर संचालनालयाने सीमा सुरक्षा दलाशी समन्वय साधून,परदेशातून, भारत- बांग्लादेश मार्गे आणल्या जाणाऱ्या अवैध सोन्याची तस्करी पकडली आणि हे जाळे उद्ध्वस्त केले. पश्चिम बंगाल आणि बिहार मध्ये केलेल्या अशा अनेक कारवायातून, परदेशातून आणलेले सुमारे 12 किलो सोने- ज्याची बाजारात एकूण किंमत 17 कोटी रुपये इतकी आहे, ते सीमेवरच्या विविध ठिकाणांवरुन तसेच रेल्वेगाडीतल्या एका प्रवाशाकडून जप्त केले आहे. भारतात बांग्लादेशच्या छुप्या मार्गाने हे सोने आणण्याची संपूर्ण तस्करी आणि अवैध मार्ग यामुळे उघडकीला आला आहे.
20 आणि 21 सप्टेंबर 2026 रोजी पश्चिम बंगालमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या 161 तुकडीच्या जवानांनी भारत-बांगलादेश सीमेवरील रस्त्याजवळ,बीओपी गोंगरा क्षेत्रांतर्गत परिसरातून परदेशी बनावटीच्या तस्करीच्या सोन्याच्या सुमारे साडे तीन किलो वजनाच्या 27 लडी, बेवारस अवस्थेत ताब्यात घेतल्या. त्यानंतर डीआरआयने पुढील कारवाई करत, सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार हे सोने जप्त केले.

आणखी एका कारवाईत, 21 सप्टेंबर 2026 रोजी बीओपी महाखोला येथे 161 बटालियनच्या सीमा सुरक्षा दलाच्या 161 तुकडीच्या जवानांनी भारत-बांगलादेश सीमेवरील कुंपणाच्या पुढे, हाथखोला गावात हँडपंपजवळ लपवून ठेवलेले 24 कॅरेट परदेशी तस्करीच्या सोन्याच्या, 1.16 किलो वजनाच्या 10 लडी ताब्यात घेतल्या. त्यानंतर डीआरआयने सीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलम 110 अंतर्गत हे सोने जप्त करण्यात आले.
यापूर्वी, 10-11 सप्टेंबर 2026 रोजी, भारत-बांगलादेश सीमेवरील कुंपणाजवळच्या 'बीओपी पथेरघाटा' भागात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी परदेशी बनावटीचे सोने जप्त केले होते; यात सुमारे 5.9 किलो वजनाच्या 48 सोन्याच्या विटांचा समावेश होता. हा साठा नंतर महसूल गुप्तचर संचालनालयाकडे सोपवण्यात आला आणि त्यांनी तो जप्त केला.

पाटण्यात, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी एका रेल्वे प्रवाशाकडून परदेशी बनावटीच्या 15 सोन्याच्या विटा आणि सोन्याचे 4 छोटे तुकडे जप्त केले; याचे एकूण वजन सुमारे 1.71 किलो होते. हे सोने त्याने आपल्या दोन्ही पायांवर गुंडाळलेल्या कापडी 'नी-कॅप्स'मध्ये लपवून ठेवले होते. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, हे सोने बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

बांगलादेश मार्गे होणारी परदेशी बनावटीच्या सोन्याची तस्करी, वाहतूक आणि वितरण यात गुंतलेले जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या समन्वयाने महसूल गुप्तचर संचालनालय करत असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न या कारवाईमधून अधोरेखित होतात.
सुवर्णा बेडेकर/निलिमा चितळे/राधिका अघोर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314213)
अभ्यागत कक्ष : 8