कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
शांघाय येथे जागतिक कौशल्य स्पर्धा-2026 सुरू; स्पर्धेत भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कौशल्य पथकाचा सहभाग
भारतीय संघाच्या 70 स्पर्धकांनी उद्घाटन सोहळ्याला लावली हजेरी, 63 कौशल्य प्रकारांच्या स्पर्धेत होणार सहभागी
Posted On:
23 SEP 2026 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
शांघाय येथे आज जागतिक कौशल्य स्पर्धा-2026 ची सुरुवात झाली. या स्पर्धेत भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे 70 युवा स्पर्धकांचे पदक या स्पर्धेत सहभागी झाले असून हे स्पर्धक वेगवेगळ्या 63 कौशल्य प्रकारांच्या स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहेत. या चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल संध्याकाळी पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात जगभरातील पथकांसोबत भारतीय संघाने देखील 'परेड ऑफ नेशन्स'मध्ये भाग घेतला.
शांघाय वर्ल्ड एक्स्पो कल्चरल सेंटर येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्यात 65 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील सुमारे 1,400 स्पर्धक सहभागी झाले. तिरंगा ध्वज हाती घेऊन भारतीय पथकाने टाळ्यांच्या कडकडाटात मैदानात प्रवेश केला. याप्रकारे 48व्या जागतिक कौशल्य स्पर्धेची औपचारिक सुरुवात झाली.
48व्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे शांघाय येथे अधिकृतपणे उद्घाटन झाले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या स्पर्धेसाठी पाठवलेले शुभेच्छा पत्र उद्घाटन समारंभात वाचून दाखवण्यात आले.
राष्ट्रीय कौशल्य संघटनेचे (एनएसओ) महासंचालक दिलीप कुमार म्हणाले की, " अनेक महिन्यांची अथक तांत्रिक तयारी, वारंवार केलेला सराव, तज्ज्ञ आणि उद्योग भागीदारांकडून मिळालेल्या निकट मार्गदर्शनानंतर आपले स्पर्धक शांघाय येथे पोहोचले आहेत. आम्हाला यांचा अभिमान आहे की, 70 उमेदवारांपैकी 14 उमेदवार आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) आहेत. स्पर्धेच्या चार दिवसांच्या काळात स्पर्धकांना अचूकता, संयम आणि सातत्यपूर्ण कामगिरी यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. संपूर्ण प्रतिनिधी मंडळ टीम इंडियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे."
वर्ल्डस्किल्स इंडियाच्या अधिकृत प्रतिनिधी आणि एमएसडीईच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागार मनीषा सेन शर्मा म्हणाल्या, "आजपासून स्पर्धेला सुरुवात होत असताना जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धकांशी आपल्या क्षमतांची तुलना करण्याची, जागतिक स्तरावरील स्पर्धकांकडून शिकण्याची आणि भारताच्या कौशल्य विकास परिसंस्थेतून उदयास येणाऱ्या प्रतिभेची क्षमता प्रदर्शित करण्याची संधी भारतीय स्पर्धकांना मिळत आहे."
यावर्षी टीम इंडियाचा सहभाग हा व्याप्ती आणि आवाका या दोन्हीमध्ये एक महत्त्वपूर्ण वाढ दर्शवतो. प्रथमच, भारत 11 नवीन कौशल्य प्रकारांमध्ये स्पर्धा करणार आहे.
उद्घाटन सोहळ्यातील संचलनातून भारतीय पथकाच्या उपस्थितीने देशाच्या कौशल्य विकास परिसंस्थेची विविधता आणि सामर्थ्य प्रतिबिंबित केले. राज्य सरकारे, क्षेत्रीय कौशल्य परिषदा, प्रशिक्षण संस्था, उद्योग भागीदार, तज्ञ आणि मार्गदर्शक यांच्या पाठिंब्याने, स्पर्धकांनी कठोर निवड प्रक्रिया आणि अनेक महिन्यांचे विशेष प्रशिक्षण, सघन सराव आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची तयारी पूर्ण करून प्रगती केली आहे.
वर्ल्डस्किल्स इंटरनॅशनल या संस्थेकडून दर दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टतेसाठी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेतून तरुण व्यावसायिकांना तांत्रिक कौशल्य, अचूकता, सर्जनशीलता, कारागिरी आणि नवोन्मेष प्रदर्शित करण्याची तसेच जागतिक मानकांच्या आधारावर आपल्या क्षमतांचे मूल्यमापन करण्याची संधी मिळते.
आज सकाळी 9:00 वाजता शांघाय येथील राष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्रात कौशल्य स्पर्धा सुरू झाल्या असून त्या 26 सप्टेंबरपर्यंत चालतील, त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी समारोप सोहळा होईल.







निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314189)
अभ्यागत कक्ष : 10