नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते विमानतळ विकासासाठी चॅलेंज मोड चा प्रारंभ

Posted On: 22 SEP 2026 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026

केंद्रीय हवाई विमान वाहतूक मंत्रालयाने आज उडान (Ude Desh ka Aam Nagrik - UDAN) या योजनेच्या नव्या टप्प्याअंतर्गत देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत 21 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. देशभरातील प्रादेशिक हवाई जोडणीला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल ठरले आहे. यासोबतच हवाई वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचा विकास झालेला नसलेल्या तसेच अशी सेवा नसलेल्या, त्याचबरोबरीने या बाबतीतील अपुऱ्या सेवा असलेल्या प्रदेशांमध्ये हवाई सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हे सामंजस्य करार केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील परस्पर सहकार्याअंतर्गतचा एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहेत.

या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी संबोधित केले. या सामंजस्य करारांच्या माध्यमातून, देशाच्या प्रादेशिक हवाई वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी टीम भारत सज्ज झाली असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित राज्य हाच विकसित भारताचा पाया बनला आहे आणि या वाटचालीत प्रत्येक राज्य समान भागीदार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. नव्याने आखणी केलेल्या उडान या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आगामी 10 वर्षांत 120 नवीन ठिकाणे तसेच आणखी 4 कोटी प्रवाशांना हवाई सेवेशी जोडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली. आता या प्रयत्नात 20 पेक्षा जास्त राज्ये एकत्र आली आहेत, त्यांच्यासोबत केंद्र सरकार या प्रवासाला पुढची दिशा देत असून, देशाच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात एका नवीन अध्यायाची सुरुवात करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, या योजनेअंतर्गत सहभागी राज्ये/केंद्रशासित प्रदेश तसेच उडान योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था असलेल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणादरम्यान एकूण 21 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या निमीत्ताने नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते विमानतळ विकासासाठीच्या चॅलेंज मोड पोर्टलचा (Challenge Mode Portal for Aerodrome Development) प्रारंभही करण्यात आला. यासोबतच उडान योजनेअंतर्गतच्या मार्गांवरील लिलावाच्या (UDAN Route Bidding) पुढच्या टप्प्यासंबंधीच्या योजनेचे दस्तऐवजही (Scheme Document) प्रकाशित करण्यात आले.

चॅलेंज मोडअंतर्गत, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांना समर्पित पोर्टलच्या माध्यमातून उडान योजनेच्या नव्या टप्प्याअंतर्गत धावपट्टी (Airstrips) आणि हेलिपॅड विकसित करण्यासाठीच्या जागा प्रस्तावित करता येणार आहे. यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हवाई जोडणीची क्षमता असलेल्या ठिकाणांचा स्वतः शोध घेणेही शक्य होणार आहे. यासोबतच  स्थानिक गरजांना अनुसरून हवाई वाहतूक पायाभूत सुविधांची उभारणी आणि अद्यतनही करता येणार आहे.

माधुरी पांगे/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313652) अभ्यागत कक्ष : 9