नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशाच्या स्वच्छ ऊर्जा दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्यवर्ती भूमिका बजावणे सुरूच ठेवेल: श्रीपाद येस्सो नाईक


सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने भागधारकांच्या बैठकीसह आपला 15 वा स्थापना दिवस केला साजरा

Posted On: 21 SEP 2026 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026

"सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा 15 वर्षांचा प्रवास हा जागतिक नवीकरणीय ऊर्जा संक्रमणातल्या भारताच्या वाढत्या नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे," असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक यांनी आज सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड( एसईसीआय) च्या 15 व्या स्थापना दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने देशाच्या स्वच्छ ऊर्जा दृष्टिकोनावर सातत्याने काम केले आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने महामंडळ आपली मध्यवर्ती भूमिका बजावणे सुरूच ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मयंक तिवारी आणि आयनॉक्सजीएफएल समूहाचे अध्यक्ष विवेक जैन यांच्यासह नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातले इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना एसईसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आकाश त्रिपाठी म्हणाले की, सर्व भागधारकांसोबत जवळून काम करून आणि बाजाराच्या गरजांनुसार नावीन्यपूर्ण बदल घडवून आणत, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नवीन संधी खुल्या करण्यासाठी महामंडळ  कटिबद्ध आहे. ही 15 वर्षे एसईसीआयचे समर्पण आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने राष्ट्राच्या सामूहिक इच्छाशक्तीचा पुरावा आहेत. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही आमच्या सर्व भागधारकांचे आभारी आहोत.

या भागधारकांच्या बैठकीत “हरित रेणूंच्या माध्यमातून उद्योगाची पुनर्कल्पना” आणि “बदलते ऊर्जा परिदृश्य: वितरित नवीकरणीय ऊर्जा आणि नवीन ऊर्जेच्या बाजारपेठा” या दोन संकल्पनांवर आधारित सत्रांचा समावेश होता, यामध्ये धोरणकर्ते, उद्योगपती  आणि वित्तीय संस्था भारताच्या ऊर्जा संक्रमणाला आकार देणाऱ्या उदयोन्मुख संधी आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आल्या.

“हरित रेणूंच्या माध्यमातून उद्योगाची पुनर्कल्पना” या पहिल्या सत्रात कार्बन उत्सर्जन कमी करण्यास कठीण असलेल्या क्षेत्रांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि औद्योगिक वाढीसाठी नवीन मार्ग निर्माण करण्यात हरित हायड्रोजन आणि त्याच्या उप-उत्पादनांच्या भूमिकेचा शोध घेण्यात आला. या सत्रात देशांतर्गत उत्पादनाच्या संधी आणि उदयोन्मुख उपयोगांसह, मोठ्या प्रमाणावर हरित रेणू बाजारपेठा विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले धोरणात्मक पाठबळ, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा यावर चर्चा करण्यात आली.

“बदलते ऊर्जा परिदृश्य: वितरित नवीकरणीय ऊर्जा आणि नवीन ऊर्जेच्या बाजारपेठा” या दुसऱ्या सत्रात भारतातल्या वितरित नवीकरणीय ऊर्जेच्या विकसित होत असलेल्या भूमिकेचे परीक्षण करण्यात आले. चर्चेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ग्राहकांचा वाढता सहभाग, वितरित ऊर्जा संसाधनांचे एकत्रीकरण आणि उदयोन्मुख बाजार यंत्रणा, तसेच त्यांचे प्रभावी एकत्रीकरण सुलभ करण्यासाठी आणि नवीकरणीय ऊर्जेच्या विस्ताराला पाठिंबा देण्यासाठी आवश्यक असलेले धोरण तसेच नियामक आराखडे यांचा समावेश होता. 

एसईसीआयने राष्ट्राच्या सेवेची 15 वर्षे पूर्ण केली असताना, तिची एकत्रित कामगिरी  पाहता तृतीय-पक्ष विकासकांच्या माध्यमातून 41 गीगावॉटहून अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमता कार्यान्वित करण्यात आली आहे, बाजारात सुमारे 3.6 लाख कोटींची एकत्रित गुंतवणूक आणि  विविध वीज वितरण कंपन्या आणि ग्राहकांसोबत 67 गीगावॉटहून अधिक क्षमतेचे वीज विक्री करार करण्यात आले आहेत. कंपनी आपल्या प्रकल्पांसह वेगाने विस्तार करत आहे आणि ऊर्जा साठवण, हरित हायड्रोजन तसेच संबंधित क्षेत्रांना चालना देण्यासाठी सक्रिय आहे.

20 सप्टेंबर 2011 रोजी स्थापन झालेली एसईसीआय ही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक नवरत्न कंपनी आहे. राष्ट्रीय सौर मोहिमेसाठी समर्पित अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून तिची सुरुवात झाली आणि आता ती नवीकरणीय ऊर्जेवर लक्ष केंद्रित करणारी सार्वजनिक क्षेत्रातली आघाडीची संस्था बनली असून, तिची व्याप्ती संपूर्ण नवीकरणीय ऊर्जा परिसंस्थेत पसरलेली आहे.

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2313131) अभ्यागत कक्ष : 9