इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताची अर्धसंवाहक परिसंस्था भक्कम जागतिक सहभाग आणि गुंतवणुकीचे आकर्षण ठरत आहे: अश्विनी वैष्णव
Posted On:
18 SEP 2026 8:19PM by PIB Mumbai
सेमीकॉन इंडिया 2026 च्या दुसऱ्या दिवशी अर्धसंवाहक मूल्य साखळीत 25 प्रमुख घोषणा आणि सहकार्यांची नोंद
सेमीकॉन इंडिया 2026 च्या दुसऱ्या दिवशी अर्धसंवाहक निर्मिती, सामग्री, लॉजिस्टिक्स, चिप डिझाइन, प्रगत पॅकेजिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मनुष्यबळ विकास यासह अर्धसंवाहक मूल्य साखळीच्या विविध घटकांचा समावेश असलेल्या 25 प्रमुख घोषणा आणि सहकार्यांची नोंद झाली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दुसऱ्या दिवशी सहभाग अधिक वाढला आहे. यात भक्कम व्यवसाय-ते-व्यवसाय सहभाग दिसून आला, व्यावसायिक बैठकांमध्ये अनेक करारांवर शिक्कामोर्तब झाले आणि विविध सत्रांना चांगला प्रतिसाद मिळाला. देशस्तरीय गोलमेज परिषदांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जपान आणि सिंगापूरच्या त्यांच्या संबंधित दालनांमधून प्रत्येकी 30 हून अधिक कंपन्यांनी भाग घेतला. याशिवाय दक्षिण कोरिया तसेच बेल्जियम, नेदरलँड्स आणि स्वीडनसह अनेक युरोपीय देशांचाही यात सहभाग होता.

अर्धसंवाहक पुरवठा साखळी मजबूत करण्याविषयी बोलताना, मंत्र्यांनी भारत अर्धसंवाहक मिशन आणि निप्पॉन एक्सप्रेस यांच्यातल्या सामंजस्य करारावर भर दिला. या कराराअंतर्गत, भारताच्या अर्धसंवाहक परिसंस्थेचा विस्तार होत असताना निप्पॉन एक्सप्रेस लॉजिस्टिक्स, वखार, सीमा शुल्क आणि संबंधित पुरवठा-साखळी आवश्यकतांमध्ये आपले कौशल्य प्रदान करेल.


नवी दिल्लीतल्या यशोभूमी येथे 19 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या सेमीकॉन इंडिया 2026 मध्ये 600 हून अधिक सहभागी कंपन्यांचा समावेश आहे आणि सुमारे 50,000 अभ्यागत यामध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे, यात 52 देशांचे प्रतिनिधी, 400 हून अधिक अधिकारी आणि 150 हून अधिक वक्ते उपस्थित रहात आहेत.
***
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2312293)
अभ्यागत कक्ष : 9