उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 38 व्या पुणे महोत्सवाचे उद्घाटन


“कोणत्याही देशाने आपला इतिहास आणि आपल्या नायकांचे बलिदान कधीही विसरता कामा नये”: उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींकडून छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशाचे स्मरण

Posted On: 18 SEP 2026 8:02PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुण्यात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच इथे 38 व्या पुणे महोत्सवाचे उद्घाटन केले.

या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

कोणत्याही देशाने आपला इतिहास आणि आपल्या नायकांचे महान बलिदान कधीही विसरता कामा नये, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर वारशाचे स्मरण करताना ते म्हणाले की, हिंदू धर्म आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या जतन-संवर्धनातले त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. तंजावर इथल्या सरस्वती महाल ग्रंथालयात मराठा शासकांमुळे तमिळ साहित्यिक कलाकृतींचे जतन करण्यात आले आहे,  हे नमूद करत त्यांनी महाराष्ट्र आणि तमिळनाडू मधल्या दृढ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला.

त्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांनाही अभिवादन केले.

पुण्याच्या वाढत्या जागतिक स्वरूपाचे कौतुक करताना, उपराष्ट्रपतींनी उद्घाटन सत्रातल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाची विशेष प्रशंसा केली. सुमारे 20 देशांतल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक गणेश पूजन कार्यक्रमात भाग घेतल्याचे नमूद करत त्यांनी याचे वर्णन “वसुधैव कुटुंबकम्” या भावनेचे एक सुंदर रूप म्हणून केले.

पुणे शहराने आपली सांस्कृतिक ओळख जपत शिक्षण, उद्योग, क्रीडा, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल निर्मिती, पर्यटन आणि फलोत्पादनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून स्थान निर्माण केले आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. पुण्याची "महोत्सवांचे शहर" अशी ओळख निर्माण करण्यात पुणे महोत्सवाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगत त्यांनी याचे संस्थापक सुरेश कलमाडी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.

या महोत्सवात तरुण आणि उदयोन्मुख कलाकारांना संधी दिली जात असल्याचं कौतुक करून, उपराष्ट्रपतींनी 'उगवते तारे' आणि 'इंद्रधनु' यांसारख्या कार्यक्रमांचा विशेष उल्लेख केला. तसेच, महिला कलाकारांना त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी 'महिला महोत्सवा'चीही प्रशंसा केली.

भारताच्या सांस्कृतिक वारशाशी नाळ जोडून ठेवण्याच्या गरजेवर भर देत, सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, विकासासोबतच वारशाचे जतन होणे देखील  आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकासही  आणि वारसाही' (विकास भी, विरासत भी) या संकल्पनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, आधुनिकता आणि तांत्रिक प्रगती साधताना परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचा बळी देण्याची गरज नाही.

विकसित भारताच्या संकल्पनेत केवळ आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधाच नाहीत तर सभ्यतेच्या वारशात रुजलेला सर्वसमावेशक आणि समतावादी समजही अंतर्भूत आहे असे उपराष्ट्रपती म्हणाले. पुणे महोत्सवासारख्या उत्सवांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, स्थानिक प्रतिभा आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी अखंड एकता, सलोखा आणि सेवाभाव कायम राहावा यासाठी श्री गणेशाच्या चरणी  प्रार्थना केली; तसेच 'पुणे फेस्टिव्हल'च्या माध्यमातून  भारताच्या संमिश्र संस्कृतीचा उत्सव साजरा होत राहील, यातून  युवा प्रतिभेला प्रेरणा मिळेल, महिलांचे  सक्षमीकरण होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे  हे कार्य अविरत सुरू राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची भारतीय चित्रपटसृष्टी  आणि कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत,  उपराष्ट्रपतींनी त्यांना  ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला.

***

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2312282) अभ्यागत कक्ष : 7