संरक्षण मंत्रालय
एनसीसीच्या 20 महिला कॅडेट्सनी ‘अपराजिता -पारंग ला 2026’ हा अति उंचावरील लॉन्ग ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला
Posted On:
16 SEP 2026 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2026
नॅशनल कॅडेट कोर्प्सचा (एनसीसी ) एक प्रमुख साहसी उपक्रम असलेल्या ‘अपराजिता - पारंग ला 2026’ या अखिल भारतीय महिलांच्या अति उंचावरील लॉन्ग ट्रेकची सांगता 16, सप्टेंबर 2026 रोजी लडाखमधील कारझोक येथे झाली. या कार्यक्रमात एनसीसीचे महासंचालक लेफ्टिनेंट जनरल वीरेंद्र वत्स आणि संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव दीप्ति मोहिल चावला यांनी ट्रेक पूर्ण करणाऱ्या चमूचे स्वागत केले. या मोहिमेदरम्यान, देशभरातून निवडलेल्या 20 एनसीसी महिला कॅडेट्सच्या चमूने ‘पारंग ला’ खिंड (5,578 मीटर) पार केली; जी हिमाचल प्रदेशातील स्पीती खोऱ्याला लडाखमधील चांगथांग प्रदेशाशी जोडते.
सुमारे 30 दिवसांमध्ये 250 किलोमीटरचे अंतर कापणाऱ्या या मोहिमेचा मार्ग हिमनद्या, बर्फाच्छादित प्रदेश आणि नद्यांच्या खोऱ्यांसह उंच पर्वतीय भागांतून गेला होता. अधिकारी, प्रशिक्षक, वैद्यकीय कर्मचारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सोबतीने, या चमूने हिमाचल प्रदेशातील 'किब्बर' ते लडाखमधील 'कारझोक' असा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. या ट्रेकला 18,ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली होती.
याप्रसंगी बोलताना, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल कॅडेट्स आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सांघिक भावना आणि सहनशक्ती विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

साहसी उपक्रमांमध्ये युवा महिलांचा सहभाग वाढवणे आणि त्यांना अति उंचावरील आव्हानात्मक परिस्थितीचा अनुभव मिळावा या उद्देशाने या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, देशाच्या विविध भागांमधील कॅडेट्सना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे हा देखील यामागचा उद्देश होता.
नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310865)
अभ्यागत कक्ष : 8