गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईत द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई इथे आयोजित गणेश ज्ञानार्थी प्रदर्शनाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईला शक्य ते सर्व पाठबळ आणि सहकार्य पुरवत असून, भविष्यातही ते असेच सुरु राहील
आगामी काळात द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई भारतीय ज्ञान परंपरेची ध्वजवाहक बनून संपूर्ण देशात या परंपरेचा प्रसार करेल
महाराष्ट्राच्या भूमीतील ऊर्जेत सरस्वतीची ऊर्जा सामावलेली आहे, द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवीन टीमने या ज्ञानसंपदेचा विस्तार केला पाहिजे
ज्ञानाचे डिजिटायझेशन करून ते देशभरातील ग्रंथालयांसोबत सामायिक केले पाहिजे, यासोबतच आपला वारसा जतन करणाऱ्या संस्था आणि ग्रंथालयांसाठी एक सामायिक मंच विकसित केला पाहिजे
एशियाटिक सोसायटी ही ज्ञान भारतम या राष्ट्रीय हस्तलिखित अभियानाशीही जोडलेली आहे, या संस्थेने गावागावांमध्ये विखुरलेले ज्ञान आणि हस्तलिखिते संकलित करून संशोधनाची व्यवस्था उभारली पाहिजे
आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात भारताला जगात सर्वोत्तम बनवण्याचे बीज याच हस्तलिखितांमध्ये सामावलेले आहे, या विषयावरच्या संशोधनाला सातत्याने नवी दिशा दिली पाहिजे
दीर्घकाळ लोकांवर राज्य करण्यासाठी भारताच्या व्यवस्था समजून घेणे हाच इंडोलॉजीचा (भारताविषयीचे ज्ञान) उद्देश होता, तर भारतीय ज्ञान परंपरेचा उद्देश हा कायम जगाचे कल्याण असाच होता
नालंदाचे ग्रंथालय जाळले जाऊ शकते, मात्र श्रुती आणि स्मृतीच्या परंपरेतून लोकांच्या मनात रुजलेले ज्ञान कोणीही कधीही नष्ट करू शकत नाही
Posted On:
13 SEP 2026 5:44PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईत द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे आयोजित गणेश ज्ञानार्थी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अमित शाह यांनी संबोधित केले. आपण गृहमंत्री म्हणून नव्हे, तर हजारो वर्षांची भारतीय ज्ञान परंपरा पुढे नेण्याच्या चळवळीतील एक सक्रीय व्यक्ती म्हणून एशियाटिक सोसायटीला भेट देण्यासाठी आलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ही भारतीय ज्ञान परंपरेची ध्वजवाहक बनेल आणि संपूर्ण देशभरात या परंपरेचा प्रसार करेल, असा विश्वास अमित त्यांनी व्यक्त केला.
जो देश आपल्या स्मृती, इतिहास, मूल्ये, भाषा, ऐतिहासिक दस्तऐवज आणि परंपरांचे रक्षण करू शकत नाही, तो देश कितीही शक्तिशाली असला तरी त्याचा ऱ्हास होण्यास फार वेळ लागत नाही, मात्र जो देश आपल्या स्मृती, इतिहास, परंपरा, मूल्ये, ऐतिहासिक नोंदी, भाषा आणि व्याकरणाचे रक्षण करतो, तो कितीही वर्षे गुलामगिरीत राहिला तरी त्याला कोणीही खऱ्या अर्थाने गुलाम बनवू शकत नाही ही बाब त्यांनी नमूद केली. भारताकडे जगाला मार्गदर्शन करू शकेल असा ओजस्वी ज्ञानसाठा होता, अनेक शक्तींनी हे ज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही, असे त्यांनी सांगितले. नालंदाचे ग्रंथालय जाळता येते, त्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर भस्मसात करता येते की कित्येक महिने त्यातून धूर निघत राहतो, त्याचे राखेत रूपांतर केले जाऊ शकते, मात्र लोकांच्या मनात श्रुती आणि स्मृतीच्या रूपात रुजलेले ज्ञान कोणीही नष्ट करू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, पराभव झाल्यावर संयमाने पुढे जाणे आणि विजय मिळाल्यावर ज्यांना आपण जिंकले आहे त्यांच्या स्मृती नष्ट न करता त्यांना आपल्या परंपरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करणे, ही आपल्या देशाची संस्कृती आहे. ते म्हणाले की, खरे ज्ञान कधीही कोणत्याही विचारसरणीचे गुलाम नसते. ज्ञान ही स्वतःच एक विचारसरणी आहे; जर ते कोणत्याही प्रकारे बांधले गेले, तर ज्ञानाचा मूळ अर्थच बदलतो. ज्ञान मुक्त आणि निर्बंधमुक्त असावे, तसेच त्याचा प्रसारही मुक्त आणि निर्बंधमुक्त असावा. त्यामुळे, एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली यात अडकून पडण्यापेक्षा, आज आपल्यासमोर असलेले ज्ञान आणि संग्रह यांचा वापर करून महान भारत कसा घडवता येईल, याकडे आपण पाहिले पाहिजे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, एशियाटिक सोसायटी समजून घेण्यासाठी इंडोलॉजी अर्थात भारताविषयीचे ज्ञान ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. मुद्राशास्त्र, शिलालेखशास्त्र, आकारविज्ञान, इतिहास, पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, धर्मशास्त्र आणि व्याकरण — या सर्वांचा मिळून इंडोलॉजी हा विषय तयार होतो. याचा उद्देश भारतीय ज्ञानपरंपरेसारखा नव्हता; भारतीय ज्ञानपरंपरेचे ध्येय हे जग आणि विश्वाचे कल्याण हे असते. त्या काळात, या भूमीतील लोकांवर दीर्घकाळ राज्य करण्यासाठी येथील व्यवस्था समजून घेणे हा त्याचा उद्देश होता. शाह म्हणाले की, जेव्हा एखादी बाह्य शक्ती एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करते, तेव्हा ती एकतर तिचा अभ्यास करते किंवा तिची व्याख्या करते. या दोन्हींमध्ये मूलभूत फरक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अभ्यास करते, तेव्हा ती त्या संस्कृतीचा स्वीकारही करते आणि स्वतःमध्येही बदल घडवून आणते. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती तिची व्याख्या करते, तेव्हा त्या व्याख्येचा उद्देश काय आहे, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. इंडोलॉजी ही संज्ञा अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीच्या काळात हा धोका कायम होता.
अमित शाह म्हणाले की, भारताचे ज्ञान भारताच्या आवाजात लिहिले जात नव्हते. ते वसाहतवादी दृष्टिकोनाच्या भाषेत लिहिले जात होते; ज्याचा उद्देश समाजात सामूहिक न्यूनगंड निर्माण करणे आणि आपल्या लोकांचा आत्मविश्वास कमी करणे हा होता. जेव्हा लोकांचा आत्मविश्वास कमी असतो, तेव्हा दीर्घकालीन गुलामगिरीविरुद्ध प्रतिकार करण्याची भावना निर्माण होत नाही. गृहमंत्री म्हणाले की, ज्ञानाच्या या भांडाराचा अर्थही त्याच दृष्टिकोनातून लावला गेला होता, परंतु आज देश स्वतंत्र झाला आहे. स्वातंत्र्याला ऐंशीहून अधिक वर्षे उलटून गेली आहेत. सरकार बदलले आहे, एशियाटिक सोसायटीची समितीही बदलली आहे; आणि आता असा विश्वास वाटतो की ज्ञानाचा हा साठा विश्व, जग आणि देश यांच्या कल्याणासाठी वापरला जाईल—आणि हे सुनिश्चित करणे ही त्या संस्थेच्या नवीन समितीची जबाबदारी आहे.

भारतीय ज्ञान परंपरेची उद्दिष्टे समजून घेत, या ज्ञानाचा विस्तार देशभर आणि जगभरात कसा करता येईल व त्याला कशी मान्यता मिळवून देता येईल याचा विचार केला पाहिजे असे शाह म्हणाले. भारतरत्न पंडित पांडुरंग वामन काणे यांच्या साहित्यावर आधारित 'काणे समग्र'चा (साहित्यकृतींचा) संग्रह केला पाहिजे आणि त्यातील प्रत्येक शब्द भावी पिढ्यांसाठी तयार केला पाहिजे, जेणेकरून नवीन पिढी घडवता येईल. या संस्थेमध्ये अशाप्रकारचे अमूल्य संग्रह उपलब्ध आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
ब्रिटिशांनी ज्ञान आणि सत्ता यांची सांगड घातली. देशात अनेकदा असे म्हटले जाते की इतिहास पुसला जातो आहे. मात्र, या अभ्यासकांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे अमित शाह म्हणाले. वसाहतवाद संपवण्याची प्रक्रिया म्हणजे इतिहास पुसून टाकणे नव्हे. त्याचा अर्थ इतिहास पुन्हा पूर्ण आणि विश्वासार्ह स्वरुपात तसेच भारतीय दृष्टीकोनातून लोकांसमोर मांडणे असा आहे. ही वसाहतवाद मुक्तीची प्रक्रिया आहे आणि घडलीच पाहिजे. वसाहतवाद मुक्ती म्हणजे काहीतरी मिटवून टाकणे नव्हे. वसाहतवाद मुक्ती म्हणजे जगाच्या कल्याणासाठी सत्य जगासमोर मांडणे. आज आपण वसाहतवादमुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. ते म्हणाले, एशियाटिक सोसायटी, मुंबई कडे महाभारत, जैन कल्पसूत्र आणि दुर्मीळ बौद्ध ग्रंथांची चित्रे व हस्तलिखिते आहेत, जी खूप आधीच जगासमोर यायला हवी होती.
महाराष्ट्र ही सारस्वतांची भूमी आहे. या भूमीत सरस्वतीचे श्रेष्ठत्व आणि महत्त्व अंतर्भूत आहे, असे सांगत, एशियाटिक सोसायटी, मुंबई च्या नव्या चमूकडून येथील ज्ञान संपदा अधिक विस्तारली जाण्याची अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली. हा विस्तार तीन उद्दीष्टांनी व्हावी. एशियाटिक सोसायटीचा विस्तार व्हावा आणि येथे उपलब्ध असलेली हस्तलिखिते भारत सरकारने सुरू केलेल्या ज्ञान भारतम् राष्ट्रीय हस्तलिखिते उपक्रमाशी पूर्णपणे जोडली गेली पाहिजेत. एशियाटिक सोसायटीने संपूर्ण महाराष्ट्रातील गावांहून आणि अभ्यासकांच्या घरांतून प्राचीन दस्तावेज गोळा करण्याची मोहीम राबवावी आणि ती ज्ञान भारतम् हस्तलिखित सर्वेक्षणाशी जोडण्याच्या शक्यतेचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. इथे उपलब्ध सर्व हस्तलिखितांशी संबंधित सर्व विभागांसाठी ज्ञान भारतम् उपक्रमाअंतर्गत संशोधनाच्या सुविधांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हस्तलिखितांमध्ये नमूद असलेल्या अफाट ज्ञानावर संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता या ज्ञानामद्ये आहे. त्यांनी नमूद केले की ज्ञान भारतम् हस्तलिखित उपक्रमाच्या पहिल्या अनौपचारिक बैठकीत, एक जैन मुनी असे म्हणाले की, देशाला आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रांत जागतिक पातळीवर सर्वोत्तम बनवण्याचे बीज या हस्तलिखितांमध्ये दडलेले आहे. त्यामुळेच याविषयी संशोधन करण्यासाठी योग्य व्यवस्था निर्माण केली जावी.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संस्थेला सक्षम करण्याविषयीच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार एशियाटिक सोसायटी मुंबईला सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करत आहे आणि भविष्यातही करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरातील आणि प्रत्येक राज्यातील अशा प्रकारच्या संस्था एशियाटिक सोसायटी मुंबईला जोडल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून देशभरातल्या विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी येथील ज्ञान उपलब्ध होईल, असेही शाह यांनी सांगितले.
***
शैलेश पाटील/राधिका अघोर/तुषार पवार/राजेश शिरभाते/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2309853)
अभ्यागत कक्ष : 4