पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि नायजेरियाच्या उपराष्ट्रपतींची भेट

Posted On: 13 SEP 2026 6:13PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान नायजेरियाचे  उपराष्ट्रपती काशिम शेट्टीमा मुस्तफा, यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती काशिम शेट्टीमा मुस्तफा,  हे नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नायजेरियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. या शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार; उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक; दळणवळण, नवोन्मेष आणि डिजिटल तंत्रज्ञान; मानवतावादी व्यवहार आणि दारिद्र्य निर्मूलन; महिला व्यवहार; तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागांचे मंत्री सहभागी झाले आहेत.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि नायजेरिया संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा भागीदारी, कृषी, आरोग्य तसेच डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चेत विशेष भर देण्यात आला. भारत आणि नायजेरिया धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान मोदी आणि उपराष्ट्रपती शेट्टीमा मुस्तफा यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवरही विचारांची देवाणघेवाण केली. यामध्ये जागतिक दक्षिणेकडील देशांच्या प्राधान्यक्रमांचा आणि चिंतांचा समावेश होता. अधिक प्रतिनिधित्व असलेल्या, सर्वसमावेशक आणि बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बहुपक्षीय मंचांवरील सहकार्य बळकट करण्याच्या आणि एकत्रितपणे काम करण्याच्या महत्त्वावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.

नायजेरियासोबतची भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि आफ्रिकेसोबतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताची सातत्यपूर्ण वचनबद्धता पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अधोरेखित केली. नायजेरियातील क्षमता निर्माण आणि आर्थिक विकासासाठी भारताच्या विकासविषयक अनुभवाचे तसेच भारताच्या योगदानाचे उपराष्ट्रपती शेट्टीमा मुस्तफा यांनी कौतुक केले.

भारत आणि नायजेरिया या दोन्ही देशांनी अधिक मजबूत आणि भविष्याभिमुख भागीदारी उभारण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा या बैठकीत पुनरुच्चार केला. ही भागीदारी दोन्ही देशांमध्ये तसेच व्यापक ग्लोबल साउथमधील शांतता, समृद्धी आणि विकासासाठी योगदान देईल.

***

राधिका अघोर/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2309848) अभ्यागत कक्ष : 8