नवी दिल्लीत 12 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2026 या कालावधीत डिझायनर ॲटेलियर या डिझायनर कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत भारताचा समृद्ध वस्त्रोद्योग वारसा, पारंपरिक हस्तकला आणि आधुनिक डिझाईन्सचा संगम साधला गेला आहे. नवी दिल्लीतील जनपथ इथल्या जवाहर व्यापार भवनमधील भारतीय मध्यवर्ती कुटीर उद्योग महामंडळाच्या (CCIC) संकुलात हे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10:00 ते सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत खुले असणार आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे महासंचालक (वस्त्रोद्योग) आणि केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळाचे अध्यक्ष अखिलेश कुमार तसेच केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिमल गोपालाचारी यांच्या हस्ते, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
देशाच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाला प्रोत्साहन देणे आणि देशाची विविध हस्तकला परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या अस्सल हातमाग तसेच हाताने विणलेल्या उत्पादनांच्या वापराला चालना देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामुळे कारागीर आणि विणकरांना त्यांच्या कलाकृती जगासमोर मांडण्यासाठी तसेच ग्राहकांशी थेट जोडले जाण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
या प्रदर्शनात पारंपरिक तंत्रज्ञान, स्वदेशी हस्तकला आणि आधुनिक डिझाईन यांचा मिलाफ साधला असून, त्याअंतर्गत हातमागाचे सुबक विणकाम, पारंपरिक छपाई, आधुनिक शैली आणि डिझायनर संग्रहांचे सादरीकरण मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पारंपरिक तसेच आधुनिक फॅशन प्रेमींसाठी विविध प्रकारच्या कलाकृतीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आगामी सण आणि लग्नसराईच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना देखील वैशिष्ट्यपूर्ण भारतीय वस्त्रे आणि हस्तनिर्मित फॅशनचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासोबतच हा उपक्रम देशभरातील विणकर, कारागीर आणि हस्तकलेशी जोडलेल्या समुदायालाही पाठबळ देणारा ठरला आहे.
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर