इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल इंडिया भाषिणीच्या सीईओंचे ‘आयआयएम कलकत्ता’ येथे आयोजित Lattice 2026 मध्ये मार्गदर्शन; लोकसंख्येच्या व्यापक स्तरावर परिणाम घडवून आणण्यासाठी एआय परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित


‘क्षमताविकासाचे दशक’ या संकल्पनेवर कोलकात्यात वार्षिक व्यावसायिक परिषद

Posted On: 12 SEP 2026 7:41PM by PIB Mumbai

 

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता’ (IIM Calcutta)ची वार्षिक व्यावसायिक परिषद ‘Lattice 2026’ आज कोलकाता येथे ‘क्षमताविकासाचे दशक’ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत विद्यार्थी, उद्योगक्षेत्रातील नेते आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिक एकत्र आले होते. वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या परिदृश्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, नवोन्मेष, नेतृत्व तसेच व्यापक परिणाम घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

या परिषदेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून भाषाविषयक तंत्रज्ञान विकसित करून ते व्यापक स्तरावर वापरात आणण्याच्या अनुभवावर त्यांनी आपले विचार मांडले. प्रयोगशाळेतील एआय मॉडेल्स आणि प्रयोगांपासून ते प्रत्यक्ष जगात मोठ्या प्रमाणावर एआयचा स्वीकार व वापर होण्यापर्यंतच्या वाटचालीतील आव्हानांवर त्यांनी विशेष भर दिला.

 

विविधतेने नटलेल्या लोकसंख्येपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवताना येणाऱ्या आव्हानांवर बोलताना अमिताभ नाग यांनी, डिजिटल दरी, भाषिक दरी आणि साक्षरतेची दरी ही परस्परांशी जोडलेली आव्हाने असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञानाने लोकांच्या गरजा आणि त्यांच्या स्थानिक संदर्भांनुसार स्वतःला जुळवून घेतले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवाजाच्या माध्यमाला प्राधान्य देणारे आणि बहुभाषिक तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या विविधतेचा विचार करता, एआय प्रणालींमध्ये भाषा, बोलीभाषा, विषयक्षेत्र आणि संदर्भ यांतील भिन्नता लक्षात घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भाषिणी, उभारण्याच्या अनुभवावर विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, आम्हाला आलेल्या जवळपास सर्वात कठीण समस्या मॉडेलबद्दल कधीच नव्हत्या. त्या बाजारपेठेची रचना, प्रोत्साहनांची रचना, संस्थात्मक रचना आणि परिसंस्थेच्या रचनेबद्दल होत्या. ते पुढे म्हणाले की, विविधता हेच नवीन सर्वसामान्य आहे आणि आपल्याला वेगाने जुळवून घेण्याची गरज आहे.

या चर्चेत तंत्रज्ञानाला वैयक्तिक उत्पादनांच्या पलीकडे नेण्यासाठी भागीदारी, खुली पायाभूत सुविधा, सह-निर्मिती आणि सांघिक कार्य यांच्या भूमिकेवर अधिक प्रकाश टाकण्यात आला. त्यांनी नमूद केले की, नव्याने आलेल्या तंत्रज्ञानासोबत काम करणाऱ्या संस्थांनी संवाद, प्रयोग, विचारमंथन आणि भागीदारीची संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे, तसेच अशी पायाभूत सुविधा तयार करणे आवश्यक आहे जी अनेक सहभागींना एका मोठ्या परिसंस्थेमध्ये योगदान देण्यास सक्षम करेल.

या परिषदेत उदयोन्मुख तंत्रज्ञान, व्यवसाय आणि नेतृत्व यावरही चर्चा झाली, ज्यात सहभागींनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित अर्थव्यवस्थेतील संस्था आणि व्यावसायिकांच्या बदलत्या गरजांवर विचारमंथन केले. क्षमता बांधणीवर भर दिल्यामुळे केवळ तांत्रिक विकासाच्या पलीकडे जाऊन, अर्थपूर्ण स्वीकृतीसाठी आवश्यक असलेली संस्थात्मक आणि परिसंस्थेची क्षमता निर्माण करण्याची गरज दिसून आली.

विद्यार्थ्यांसोबतचा आपला संवाद संपवताना,  नाग यांनी त्यांना वैयक्तिक अनुप्रयोगांच्या पलीकडे पाहण्यास आणि ते तयार करू शकतील अशा मोठ्या प्लॅटफॉर्म, मानके आणि परिसंस्थांचा विचार करण्यास प्रोत्साहित केले. त्याऐवजी विचारा, आपण कोणते परिसंस्थेचे मानक स्थापित करू शकतो आणि कसे? याभोवती नेटवर्क इफेक्ट्स तयार करण्यासाठी आपण इतरांची मदत लवकरात लवकर मिळवू शकतो का? असे ते म्हणाले.

डिजिटल इंडिया भाषिणी विभागाबद्दल (डीआयबीडी)

डिजिटल इंडिया भाषिणी विभाग (डीआयबीडी), जो इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन  अंतर्गत येतो, हा एआय-सक्षम बहुभाषिक डिजिटल समावेशनासाठी भारताचा राष्ट्रीय मंच आहे. भाषिनी 800 हून अधिक सरकारी वेबसाइट्स चालवते, 9 अब्जाहून अधिक एकत्रित एआय इन्फरन्सेस सक्षम केले आहेत, दररोज 24 दशलक्षाहून अधिक एआय इन्फरन्सेसवर प्रक्रिया करते आणि 36 भारतीय मजकूर भाषा, 23 भारतीय आवाज भाषा व ३५ आंतरराष्ट्रीय भाषांना समर्थन देते, ज्यामुळे लँग्वेज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अधिक सुलभ होतात.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309603) अभ्यागत कक्ष : 6