वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
2030 पर्यंत 100 अब्ज अमेरिकी डॉलर द्विपक्षीय व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत आणि रशियाने परस्पर आर्थिक भागीदारीला गती द्यावी : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन
औषधनिर्माण, वाहनाचे सुटे भाग आणि खाद्योत्पादनांच्या क्षेत्रांमध्ये रशियाला भारताकडून होणाऱ्या निर्यात विस्ताराच्या संधींच्या शक्यता पीयूष गोयल यांनी केल्या अधोरेखित
रशियातील उद्योग व्यवसायांनी भारतात उत्पादन घेण्यासाठी इथल्या वापरासाठी सज्ज अशा औद्योगिक कॉरिडॉरचा लाभ घ्यावा : गोयल यांचे आवाहन
Posted On:
10 SEP 2026 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026
भारत आणि रशियाने परस्परांच्या आर्थिक आणि औद्योगिक भागीदारीला गती द्यावी असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. दोन्ही देशांतील उद्योग व्यवसाय क्षेत्राने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापारात 100 अब्ज अमेरिकी डॉलर आणि दोन्ही देशांच्या परस्पर गुंतवणुकीत 50 अब्ज अमेरिकी डॉलरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली इथे ‘इनोप्रॉम इंडिया 2026’ ही परिषद पार पडली. या परिषदेत गोयल यांनी रशियाचे उद्योग आणि व्यापार मंत्री अँटोन अलिकानोव्ह यांच्यासोबत सहअध्यक्षस्थान भूषवले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी ठरवून दिलेली ही उद्दिष्टे दोन्ही देशांची सरकारे आणि उद्योग व्यवसाय क्षेत्राच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी उद्दिष्टे आहेत, असे मतही गोयल यांनी यावेळी व्यक्त केले.
सध्या दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार सध्या सुमारे 60 अब्ज अमेरिकी डॉलरच्या पातळीवर आहे. तो 100 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्यासाठी पुढील चार वर्षांत सुमारे 40 अब्ज अमेरिकी डॉलरची भर घालावी लागेल. यासोबतच दरवर्षी दुहेरी अंकामधील सातत्यपूर्ण वाढ साध्य करावी लागेल असे ते म्हणाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांसोबतच उभय देशांतील व्यवसाय उद्योग क्षेत्राकडूनही तितक्याच मोठ्या प्रमाणात प्रयत्न होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय व्यापारात वैविध्य आणण्याच्या संधींबाबतही गोयल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. भारताची मांस तसेच खाण्यायोग्य मांस उत्पादनांची निर्यात दुपटीने वाढून 36 दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून 97 दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचली आहे. एकंदरीत या वाढीचे प्रमाण सुमारे 170 टक्के आहे अशी माहिती त्यांनी दिली. मासे आणि सागरी उत्पादनांची निर्यात 123 दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून 159 दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली असून, याअंतर्गत सुमारे 30 टक्के वाढ नोंदवली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच खाण्यायोग्य खाद्य भाज्यांची निर्यात देखील 40 टक्क्याने वाढून 38 दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून 54 दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचली असल्याचे ते म्हणाले. कॉफी, चहा आणि मसाल्यांची निर्यात देखील 13 टक्क्यांनी वाढून 116 दशलक्ष अमेरिकी डॉलर झाली आहे, तर गिरणी उद्योग क्षेत्राअंतर्गतची उत्पादनांची निर्यात देखील जवळपास दुप्पट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या आकडेवारीवरून भारतातील शेतकऱ्यांच्या, अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्राच्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उद्योग क्षेत्राद्वारे उत्पादन केलेल्या तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उद्योग क्षेत्रातील निर्यातदारांच्या उत्पादनांना रशियाच्या बाजारपेठेत असलेल्या वाढत्या मागणीची प्रचिती येते असे ते म्हणाले. आतापर्यंत या क्षमतेचा केवळ एक छोटे प्रमाण उपायोगात आणले गेले, असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था या परस्परांना पूरक असल्याचे ते म्हणाले. रशिया हा जागतिक पातळीवर मोठा आयातदार असलेला आणि त्याचवेळी त्या उत्पादनांचा भारत मोठा निर्यातदार असलेली असंख्य उत्पादने आहे, मात्र तरीदेखील भारत अजूनही रशियासाठी मोठा निर्यातदार बनलेला नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. याच अनुषंगाने औषधनिर्माण, वाहनांचे सुटे भाग, ट्रॅक्टर आणि खाद्योत्पादनांच्या क्षेत्रातील संधीच्या शक्यतांचा शोध घेण्याला वाव असल्याची बाब त्यांनी नमूद केली.
दोन्ही देशांमधील गुंतवणुकीच्या शक्यतांबाबतही पीयूष गोयल यांनी आपली मते व्यक्त केली. सध्या भारत आणि रशियातील प्राधान्य क्रमाच्या गुंतवणूक प्रकल्प विषयक यंत्रणा प्रगत उत्पादन, ऊर्जा, खाणकाम, रेल्वे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील 40 प्रत्यक्ष गुंतवणूक प्रकल्पांची चाचपणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच रशियाने त्यांच्याकडील औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेवा, अभियांत्रिकी आणि रेल्वे या क्षेत्रांमधील भारतीय गुंतवणुकीसाठी मार्ग अधिक खुला करावा असे आवाहनही त्यांनी केले. यामुळे 50 अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवणुकीचे उद्दिष्टाला परस्पर सामायिक उद्दिष्टाचे स्वरुप येईल असे त्यांनी सांगितले.
गोयल म्हणाले की, गुंतवणुकीचे ठिकाण निश्चित करताना दोन्ही देशांतील गुंतवणूकदारांना आवश्यक असलेली कायदेशीर निश्चितता उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि रशिया नवीन द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या प्रक्रियेला वेग देत आहेत.
मंत्र्यांनी सांगितले की, दोन्ही देश राष्ट्रीय आणि स्थानिक चलनांमधील व्यवहारांची यंत्रणा मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. शुल्कापेक्षा अनेकदा प्रत्यक्ष व्यवहारातील देयक प्रक्रियेतील अडथळे व्यापाराच्या गतीला अधिक प्रभावित करतात, असे त्यांनी नमूद केले.
गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रासाठीचे स्थान म्हणून भारताची क्षमता अधोरेखित करताना गोयल यांनी सांगितले की, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, औद्योगिक पार्क योजना आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भारत व्यापकता आणि वेगाने विस्तारत असलेला औद्योगिक उत्पादनाचा आधार उपलब्ध करून देत आहे.
भारत आणि रशियाच्या सामर्थ्यांचा एकत्रित वापर झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये अधिक लवचिकता निर्माण करण्यास मदत करतील, असे त्यांनी अधोरेखित केले.
गोयल यांनी सांगितले की, इनोप्रॉम प्रथमच भारतात आयोजित होणे महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक आणि औद्योगिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही मंत्रालये गेल्या काही महिन्यांपासून जवळून काम करत आहेत. रशियाचे उद्योग आणि व्यापार मंत्री अँटोन अलीखानोव्ह यांच्या भारत भेटीमुळे या प्रक्रियेला आणखी वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुवर्णा बेडेकर /निलीमा चितळे/ तुषार पवार/गजेंद्र देवडा /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308947)
अभ्यागत कक्ष : 9