वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी थायलंडचे उपपंतप्रधान आणि वाणिज्य मंत्री सुफाजी सुथुमपून यांची घेतली भेट


भारत आणि थायलंडदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणे, व्यावसायिक संबंध अधिक दृढ करणे आणि एआयटीआयजीए पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठीच्या उपायांवर चर्चा

Posted On: 09 SEP 2026 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर 2026

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे थायलंडचे उपपंतप्रधान आणि वाणिज्य मंत्री सुफाजी सुथुमपून यांची भेट घेतली.

दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ करणे, व्यावसायिक संधींचा विस्तार करणे आणि दोन्ही देशांमधील बिझनेस-टू-बिझनेस  संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करून भारत-थायलंड आर्थिक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली.

भारत आणि थायलंडदरम्यान व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी, तसेच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारात संतुलित आणि शाश्वत वाढ साधण्यासाठी विविध क्षेत्रांत अधिक सहकार्य करण्याबाबत आणि संयुक्तपणे उपाययोजना विकसित करण्याबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. व्यावसायिक जाळे मजबूत करण्यासाठी, उद्योगांमधील व्यापक सहकार्याला चालना देण्यासाठी आणि उद्योगांना नव्या बाजारपेठांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि थायलंडमधील व्यापार प्रोत्साहन उपक्रम अधिक बळकट करण्यावरही त्यांनी चर्चा केली.

दोन्ही बाजूंनी आसियान-भारत वस्तू व्यापार कराराच्या (एआयटीआयजीए अर्थात आसियान-इंडिया ट्रेड इन गुड्स ॲग्रीमेंट) पुनरावलोकनाच्या प्रगतीबाबत विचारांची देवाणघेवाण केली आणि भारत-थायलंड संयुक्त व्यापार समिती (जेटीसी- जॉईंट ट्रेड कमिटी) च्या माध्यमातून निश्चित कालमर्यादेत द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक दृढ करण्याच्या गरजेवर भर दिला.  यामुळे दोन्ही देशांतील व्यवसायांना अधिक बाजारपेठ उपलब्ध होऊन नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, ही गोष्‍ट उभय बाजूंनी मान्य केली.

दोन्ही मंत्र्यांनी अंतराळ तंत्रज्ञान, शीतसाखळी वाहतूक व्यवस्था (कोल्ड-चेन लॉजिस्टिक्स), अन्न प्रक्रिया आणि नवोन्मेष, आरोग्य आणि आरोग्य-संवर्धन आणि व्यापार तसेच गुंतवणूक प्रोत्साहन यासह विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या थाई व्यवसायांच्या प्रतिनिधीमंडळालाही संबोधित केले.

भारत आणि थायलंड यांच्यात दीर्घकाळापासून सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आर्थिक संबंध असून, दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारीही आहे.

दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार करण्यासाठी आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत. सध्याच्या द्विपक्षीय यंत्रणांनी व्यापार सुलभ करणे, बाजारपेठ प्रवेशाचे मुद्दे सोडवणे आणि प्रादेशिक तसेच जागतिक पुरवठा साखळींसोबतचे संबंध मजबूत करण्याच्या गरजेवरही भर दिला आहे.

या बैठकीने आर्थिक सहभाग अधिक सखोल करणे, व्यावसायिक भागीदारी मजबूत करणे आणि एक मजबूत, संतुलित आणि परस्पर फायदेशीर व्यापार तसेच गुंतवणूक संबंध निर्माण करण्याच्या भारत आणि थायलंडच्या सामायिक कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308529) अभ्यागत कक्ष : 9