अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बेकायदेशीर गांजा तस्करी विरोधात डीआरआयने देशभरात राबवलेल्या मोहिमेत सुमारे 740 किलो गांजा आणि चरस जप्त, 13 जणांना अटक

Posted On: 09 SEP 2026 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

अमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात गुप्तचर माहितीच्या आधारे कारवाईला गती देत,  महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गेल्या पंधरवड्यात देशभरात आठ महत्त्वपूर्ण मोहिमा राबवल्या. या कारवाईत सुमारे 740 किलो गांजा (गांजा/उच्च-क्षमतेचा हायड्रोपोनिक गांजा) आणि चरस जप्त करण्यात आले, आणि एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार 13 जणांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या मालामध्ये 709.6 किलो गांजा, 24.5 किलो उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजा आणि 5 किलो चरस, याचा समावेश आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारे डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी 08.09.2026 रोजी राबवलेल्या एका मोहिमेत, रायपूरजवळच्या  जुन्या धमतरी मार्गावर विशाखापट्टणमहून येणारे दोन ट्रक अडवले. या वाहनांची कसून तपासणी केल्यावर, ट्रकच्या लोडिंग क्षेत्रात ठेवलेल्या 10 गोण्यांमध्ये लपवलेली गांजा असल्याचा संशय असलेली 61 पाकिटे जप्त करण्यात आली. क्षेत्रीय तपासणीत तो गांजा असल्याचे आढळून आले. या कारवाईत एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत दोन ट्रकसह एकूण 375.95 किलो गांजा जप्त करण्यात आला आणि चार जणांना अटक करण्यात आली.

रायपूर येथे ट्रक आणि 375.95 किलो गांजा जप्त

यापूर्वी, 26.08.2026 रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी रायपूरजवळ अडवलेल्या एका ट्रकमध्ये लपवून ठेवलेला सुमारे 124 किलो गांजा जप्त केला होता. या कारवाईत एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत ट्रक जप्त करण्यात आला आणि एका व्यक्तीला अटक करण्यात आली.  

रायपूर : ट्रकसह 124 किलो गांजा जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे 05-06.2026 रोजी केलेल्या आणखी एका कारवाईत, पाटण्याजवळ औरंगाबाद-पाटणा महामार्गावर एक ट्रक अडवला. या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांवर हल्ला झाला. यावेळी एक अधिकारी जखमी झाला, तर ट्रकचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहनाची झडती घेतल्यावर चालकाच्या केबिनच्या मागे एक गुप्त पोकळी आढळली, ज्यातून गांजा असलेली 90 पाकिटे जप्त करण्यात आली. या कारवाईत एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत एकूण 140.5 किलो गांजा आणि ट्रक जप्त करण्यात आला.

01/02.09.2026 रोजी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी पंजाबमधील लुधियानाजवळ एक संशयित वाहन अडवले आणि कारची झडती घेतली. या कारवाईत सुमारे 69 किलो वजनाची गांजाची 67 पाकिटे जप्त करण्यात आली. ही पाकिटे वाहनात पाय ठेवण्याच्या जागेखाली खास तयार केलेल्या पोकळीत लपवण्यात आली होती. प्रतिबंधित वस्तू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे संबंधित वाहन जप्त करण्यात आले आणि एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत दोन जणांना अटक करण्यात आली.

03.09.2026 रोजी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, गोरखपूर रेल्वे स्थानकावर अमरनाथ एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींना अडवले. वैयक्तिक झडतीदरम्यान सुमारे 5 किलो चरस जप्त करण्यात आले, हे चरस दोन प्रवाशांनी नी-कॅप्सच्या सहाय्याने आपल्या मांडी भोवती गुंडाळले होते आणि साडीमध्ये लपवले होते. तपासातून असे आढळून आले की, हे चरस नेपाळमधून तस्करी करून आणले गेले होते. हस्तगत केलेले चरस जप्त करण्यात आले आणि तिन्ही व्यक्तींना एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली.

याव्यतिरिक्त, गेल्या 15 दिवसांत, तीन वेगवेगळ्या मोहिमांच्या मालिकेत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी हनोई, व्हिएतनाम आणि बँकॉक, थायलंड येथून हैदराबाद आणि बेंगळुरू विमानतळांवर आलेल्या 3 प्रवाशांना अडवले. या कारवाईत एकत्रितपणे अंदाजे 24.6 किलो उच्च क्षमतेचा गांजा जप्त केला. एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत तीन जणांना अटक करण्यात आली.

कारवाईच्या या मालिकेतून रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांनी होणारी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यावर असलेला महसूल गुप्तचर संचालनालयाचा सातत्यपूर्ण भर दिसून येतो. यामध्ये वाहनांमधील विशेष कप्पे, गुप्त जागा आणि प्रवाशांच्या सामानामध्ये लपवून आणलेल्या अमली पदार्थांच्या साठ्यांचाही समावेश आहे.  


नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308259) अभ्यागत कक्ष : 7