निती आयोग
नीती आयोगाच्या 'e-FAST India' या उपक्रमाद्वारे भारतातील शून्य-उत्सर्जन मालवाहतुकीला गती देण्यासाठी 'PACT' ची सुरुवात
Posted On:
07 SEP 2026 6:20PM by PIB Mumbai
नवीन ‘ZET (झेट) मार्केटप्लेस’ हा मंच परिसंस्थेतील भागधारकांशी सातत्यपूर्ण संवाद साधून संपूर्ण भारतातील मालवाहतुकीची मागणी एकत्रित करेल. यामुळे शून्य-उत्सर्जन करणाऱ्या ट्रकांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुलभ होऊन त्यांची व्यावसायिक व्यवहार्यता अधिक मजबूत होईल. तसेच, 5 व्या ‘e-FAST इंडिया समीट’ या परिषदेमध्ये व्यवसाय, वित्तपुरवठा आणि चार्जिंगच्या दृष्टीने भागीदारीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हा ‘झेट मार्केटप्लेस’ या मंचामागील उद्देश आहे आणि त्या दृष्टीने तो सादर करण्यात आला आहे.
नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी आज (7 सप्टेंबर 2026) 5 व्या 'e-FAST India Summit 2026' या परिषदेमध्ये 'प्लॅटफॉर्म फॉर ॲग्रीगेटिंग क्लीन ट्रान्सपोर्ट' (PACT-पॅक्ट) या उपक्रमाचे उद्घाटन केले. भारतात शून्य-उत्सर्जन ट्रकचा वापर वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
‘e-FAST India’ मंचांतर्गत पॅक्ट हा एक प्रमुख उपक्रम आहे. माल पाठविणाऱ्या कंपन्या, रसद सेवा पुरवठादार आणि इतर संबंधित घटकांकडून मालवाहतुकीची मागणी एकत्र करून, तिचे निश्चित मालवाहतूक मार्गांवर शून्य-उत्सर्जन ट्रकच्या वापराच्या संधींमध्ये रूपांतर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.माल पाठविणाऱ्या कंपन्या, रसद सेवा पुरवठादार, वाहन उत्पादक, वित्तपुरवठादार, चार्जिंग केंद्रांचे संचालक आणि इतर संबंधित घटकांना एकाच व्यासपीठावर आणून, मालवाहतुकीच्या मागणीबाबत अधिक पारदर्शकता निर्माण करणे, चार्जिंग पायाभूत सुविधांच्या नियोजनाला चालना देणे आणि इलेक्ट्रिक मध्यम व अवजड वाहनांची व्यावसायिक व्यवहार्यता वाढवणे, हे या मंचाचे उद्दिष्ट आहे.
शिखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नीती आयोगाचे सदस्य श्री. राजीव गौबा म्हणाले, “देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता निर्माण करण्यासह त्यासाठी आवश्यक धोरणात्मक यंत्रणा उभारण्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. मात्र, विकासाचा पुढील टप्पा साध्य करण्यासाठी संपूर्ण परिसंस्थेसमोरील आव्हानांवर सहकार्याने मात करण्याची आपली क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. पॅक्ट आणि झेट मार्केटप्लेस च्या प्रारंभामुळे विविध संबंधित घटकांना एका सामायिक मंचावर एकत्र आणण्यात आले आहे. मालवाहतुकीचे विद्युतीकरण वेगाने होत असताना, ई-ट्रकचा व्यावसायिक वापर वाढवण्यासाठी आणि भारतातील पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी नवीन वित्तपुरवठा पद्धती, मालवाहतूक मार्गांवर आवश्यक चार्जिंग सुविधा आणि बाजारपेठेवर आधारित भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे.”
या परिषदेत ‘ZET Marketplace’ देखील सादर करण्यात आले. ई-ट्रक उत्पादक, रसद सेवा पुरवठादार, चार्जिंग केंद्रांचे संचालक, वित्तपुरवठादार आणि तंत्रज्ञान कंपन्यांना जोडणारे हे व्यावसायिक सहकार्याचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून सहभागी संस्थांना आपली उत्पादने सादर करता आली, व्यावसायिक संधी शोधता आल्या आणि शून्य-उत्सर्जन मालवाहतूक प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक भागीदारी विकसित करता आली आहे.
***
माधुरी पांगे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307633)
अभ्यागत कक्ष : 19