रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सीएसएमटी मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान नव्या सेवेअंतर्गत रेल्वेगाडीला केले रवाना


गणेशोत्सवादरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी 370 हून जास्त विशेष रेल्वेगाड्या चालवणार : अश्विनी वैष्णव

Posted On: 03 SEP 2026 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2026

 

मुंबई आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव; केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यानच्या नवीन ट्रेनच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

ही नवीन रेल्वे सेवा मुंबई आणि कोकणातील अनेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान सुमारे 510 किमीचे अंतर व्यापून एक महत्त्वपूर्ण थेट रेल्वे संपर्क सुविधा उपलब्ध करेल. ठिकठिकाणी असलेल्या थांब्यांच्या  विस्तृत जाळ्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होईल.

नवीन रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गरज भासल्यास ही संख्या 370 गाड्यांपर्यंत वाढवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक रेल्वे सेवा, विशेषतः आगामी गणेशोत्सवाच्या काळात सुरू झाल्याने, महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड आनंद झाला आहे, असे केंद्रीय मंत्री  पीयूष गोयल यांनी सांगितले. ही नवीन सेवा म्हणजे केवळ आणखी एका  ट्रेनचा शुभारंभ नसून कोकण प्रदेशाच्या विकास प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे  गोयल यांनी नमूद केले. ही नवी रेल्वेसेवा मुंबई आणि कोकण दरम्यान सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देऊन लाखो कुटुंबांना जोडण्यास मदत करेल, यावर  गोयल यांनी भर दिला.

या मार्गावरून मालवाहतूक वाढल्याने मच्छीमार आणि इतर स्थानिक उत्पादकांना त्यांचा माल मुंबईत अधिक वेगाने पोहोचवता येईल, असे  गोयल पुढे म्हणाले. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे कोकणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि  कामाच्या शोधात तरुणांचे होणारे स्थलांतर कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुधारित रेल्वे संपर्कव्यवस्थेमुळे मुंबईतील उच्च शिक्षणाच्या संधी आणि आरोग्य सेवा कोकणातील लोकांसाठी अधिक सुलभ होतील, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की ही नवीन सेवा कोकणवासीयांसाठी तसेच गणेशोत्सवाच्या काळात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी आणि भाविकांसाठी एक मोठी भेट आहे.

शिंदे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, वंदे भारत रेल्वेगाडी आणि देशभरातील रेल्वे जाळ्याचा विस्तार यांसारख्या अनेक प्रमुख रेल्वे कामगिरींवर प्रकाश टाकला. त्यांनी विशेषतः 741 किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याची नोंद घेतली. ते म्हणाले की, या उपक्रमामुळे अधिक पर्यावरणपूरक प्रवास शक्य झाला आहे आणि गाड्यांचा वेगही वाढला आहे.

ही रेल्वेगाडी सीएसएमटीहून रात्री 11:55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:15 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी सावंतवाडी रोडहून 5:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:40 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या सोयीस्कर वेळापत्रकामुळे प्रवाशांना मुंबईहून कोकणाकडे रात्रभर प्रवास करून पहाटे मुंबईला परतणे शक्य होईल.

ही गाडी दररोज गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस म्हणून धावेल.

कोकणभर व्यापक जोडणी

ही सेवा खालील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल:

  • दादर
  • ठाणे
  • पनवेल
  • पेण
  • रोहा
  • माणगाव
  • वीर
  • खेड
  • चिपळूण
  • सावर्डा
  • आरवली रोड
  • संगमेश्वर रोड
  • रत्नागिरी
  • अडवली
  • विलवडे
  • राजापूर रोड
  • वैभववाडी रोड
  • नांदगाव
  • कणकवली
  • सिंधुदुर्ग
  • कुडाळ
  • सावंतवाडी रोड

पर्यटन आणि प्रादेशिक विकासाला चालना

या नवीन सेवेमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील पर्यटन स्थळांपर्यंत रेल्वेने पोहोचण्याची सोय सुधारेल. त्यामुळे कोकण प्रदेशातील पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. वाढलेल्या संचारसंपर्कामुळे पर्यटकांचा प्रवास सुलभ होईल, तसेच स्थानिक पर्यटन-संबंधित व्यवसाय आणि सेवांसाठी अधिक संधी निर्माण होतील.

सण, सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवाशांच्या मागणीत लक्षणीय वाढ होत असल्याने या गाडीमुळे विशेषतः अतिरिक्त प्रवास क्षमता उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ही सेवा एलएचबी रेकद्वारे चालवली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायक प्रवासी डबे मिळतील.

मुंबईची क्षमता आणि महाराष्ट्राची संपर्क व्यवस्था वृद्धिंगत करणारे प्रमुख रेल्वे प्रकल्प

मुंबई उपनगरीय रेल्वे जाळ्याबद्दल बोलताना वैष्णव यांनी क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी अनेक मोठी कामे हाती घेण्यात येत असल्याचे सांगितले. मुंबईत सध्या सुमारे 18,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

12-डब्यांच्या रेल गाड्यांसाठी बनवलेले फलाट टप्प्याटप्प्याने वाढवून त्यावर 15-डब्यांच्या गाड्यांची सोय केली जात आहे, असे मंत्री  वैष्णव यांनी स्पष्ट केले. या उपक्रमांमुळे उपनगरीय रेल्वे प्रणालीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुधारेल, असे ते म्हणाले.

मुंबईची गरज विनाविलंब पूर्ण करण्यासाठी 238 नवीन एसी लोकल ट्रेन रेक्सनाही मंजुरी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. पहिल्या एसी लोकल ट्रेनची डिलिव्हरी 2027 मध्ये सुरू होईल, अशी घोषणा त्यांनी केली. यामुळे नवीन पिढीच्या, वातानुकूलित लोकल ट्रेन्स, वाढलेली क्षमता आणि सुधारित प्रवासी सुविधा मुंबई उपनगरीय रेल्वे प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरबद्दल बोलताना वैष्णव म्हणाले की, पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर हे देशासाठी एक मोठे सामर्थ्य आहे. दोन्ही मालवाहतूक कॉरिडॉर आता 100 टक्के पूर्ण झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या नवीन पूर्व-पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या घोषणेचाही उल्लेख त्यांनी केला. दनकुनी ते सुरत या नवीन कॉरिडॉरची रचना अशा पद्धतीने केली जात आहे की त्याद्वारे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना रेल्वे जोडणी मिळेल, तसेच हा कॉरिडॉर वर्धा आणि नाशिक बंदराकडे जाईल, ज्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि ग्रामीण विकासासाठी एक मजबूत जाळे उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाची वेगाने प्रगती होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पातील बीकेसी आणि ठाणे यांना जोडणाऱ्या समुद्राखालच्या रेल्वे बोगद्याच्या बांधकामांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या बोगद्याच्या कामासाठी दोन टनेल बोरिंग मशीन्स कार्यरत असून त्यापैकी एक विक्रोळी आणि घणसोली येथून काम करत आहेत.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर; महाराष्ट्र शासनाचे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

 

* * *

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306497) अभ्यागत कक्ष : 16